Wednesday, 1 October 2025

भगतसिंग यांच्या क्रांतीकार्यामध्ये मानवतेचा विचार: प्रतीक पाटोळे

शिवाजी विद्यापीठात भगतसिंग जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्रतीक पाटोळे. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. दत्तात्रय मचाले


कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांच्या क्रांतीकार्यामध्ये मानवतेचा विचारच अग्रणी होता. तो आपण समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन तरुण व्याख्याते प्रतीक पाटोळे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पाटोळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील होते.

श्री. पाटोळे म्हणाले, शहीद भगतसिं यांना घरातूनच क्रांतीकार्याचा वारसा लाभला. लहानपणीच ते ब्रिटीशांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करीत. त्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढताना फक्त क्रांतीकार्याचा विचार दिला नाही, तर मानवतेच्या विचारही नवीन पिढीला दिला. आपल्यासारख्या तरूण विद्यार्थी, विद्यार्थिनीनी भगतसिं, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतीकारकांचे कार्य वाचून ते आत्मसात करावे. हेच विचार आपल्याला आणि देशाला पुढे नेतील.

डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले की, भगतसिं हे राष्ट्रीय विचारांचे होते. त्यांनी नेहमीच राष्ट्रीय विचार, मूल्यांना पाठिंबा दिला. देशातील सामान्यातील सामान्य लोकांचा विचार भगतसिंगांच्या मनी होता. अणि हाच विचार तरुण पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अवनीश पाटील म्हणाले, भगतसिंगांनी क्रांती या शब्दाला एक नवा आयाम दिला. त्यांच्या क्रांतीमध्ये सर्वसमावेशक विचार होता. त्याद्वारे त्यांनी नव्या समाजनिर्मितीचे स्वप्न पाहिले होते. भगतसिंगांनी जागतिक क्रांतीचे विचार फक्त वाचले नाहीत, तर ते आत्मसात केले आणि त्या मार्गाने पुढील वाटचाल केली. तरुणांचे संघटन करून त्यांनी त्यांच्यामध्ये क्रांतीचा विचार आणि बुद्धीप्रामाण्यवाद रुजविला. तरुणांनी हा विचार आत्मसात करुन आपले व्यक्तिमत्व विचारशील करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. दत्तात्रय मचाले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. कार्यक्रमास संशोधक विद्यार्थी, एम. ए.चे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment