Monday, 6 October 2025

महामानवांप्रती कृतज्ञतेने कुलगुरू, प्र-कुलगुरूंनी केली कारकीर्दीची सांगता

 











कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसाची सांगता महामानवांप्रती कृतज्ञता व्यक्त करून केली.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या पदाचा पाच वर्षांचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यांच्या बरोबर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचाही अवधी समाप्त होत आहे. आज अखेरच्या दिवशी ज्यांच्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो, त्या महामानवांना अभिवादन करून या दोघांनीही कृतज्ञता व्यक्त करून आजच्या अखेरच्या दिवसाची सुरवात केली.

आज सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी बिंदू चौकातील हुतात्मा स्मारकासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यालाही पुष्प वाहून त्यांनी अभिवादन केले. कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ आणि दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा येथेही भेट देऊन शाहू महाराजांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली. तेथून कावळा नाका येथील छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यालाही पुष्प वाहून अभिवादन केले.

तेथून विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा, कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांनाही पुष्प वाहून त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर होते.

दरम्यान, आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त केल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, ज्येष्ठ व्यावसायिक बाळ पाटणकर, विविध अधिकार मंडळांचे आजी-माजी सदस्य, संस्थाचालक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजातील विविध मान्यवर, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा समावेश राहिला.

No comments:

Post a Comment