Saturday, 4 October 2025

शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयडिया लॅब’साठी

मेनन समुहातर्फे ५० लाखांचा सामाजिक दायित्व निधी

स्कूल ऑफ इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे स्थापन होणार अत्याधुनिक लॅब

 

शिवाजी विद्यापीठात स्थापित होणाऱ्या आयडिया लॅबसाठी ५० लाख रुपयांच्या दायित्व निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना मेनन समुहाचे चेअरमन सचिन मेनन. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे शिक्षक आणि मेनन समुहाचे वरिष्ठ अधिकारी. 

कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई.)- आयडिया लॅब’ (आयडिया डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन अँड एप्लीकेशन लॅब) स्थापित करण्यासाठी येथील मेनन समुहातर्फे सामाजिक दायित्व निधी (सी एस आर) अंतर्गत ५० लाख रुपयांच्या भरीव निधीचा धनादेश आज मेनन समुहाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सचिन मेनन यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे काल (दि. ३) सायंकाळी हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी सचिन मेनन म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ हे असे ठिकाण आहे, जिथे तरुण मने घडवली जातात. उद्योग जगतातील लोक म्हणून आम्ही व्यवसायासाठी योग्य परिसंस्था तयार करू शकतो, परंतु खरी शैक्षणिक आणि विषयानुषंगिक जडणघडण फक्त विद्यापीठच करू शकते. स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून बाहेर पडणारे विद्यार्थी उद्योग क्षेत्राशी थेट जुळवून घेऊ शकतील, तसेच उद्योग जगतातील घडामोडींचा अचूक वेध घेऊ शकतील, या दृष्टीने आयडिया लॅब अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. ही लॅब या भागातील सर्वाधिक गुणवत्तापूर्ण होण्याकरिता मेनन समूह सदैव विद्यापीठासोबत राहील. ही आयडिया लॅब येणाऱ्या भविष्यकाळात सर्जनशीलता आणि नवोपक्रम यातील सर्वोच्च मानबिंदू प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. मेनन यांनी कुलगुरू डॉ. शिर्के तसेच प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या कार्यकाल पूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आयडिया लॅबसाठी इतका भरीव निधी प्रदान करून विद्यापीठाप्रती जो विश्वास दर्शविला, त्याबद्दल श्री. मेनन यांच्यासह मेनन समुहाला धन्यवाद दिले. ते म्हणाले, मेनन समूह आपल्या कार्यक्षेत्रात कायमच अग्रेसर राहिला आहे. लॅबच्या ऍडव्हायझरी कौन्सिलच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा निर्माण करता येतील. या आयडिया लॅबच्या निमित्ताने मेनन समुहाचे शिवाजी विद्यापीठाशी जोडले जाणे, उद्योग क्षेत्र आणि समाज या दोहोंच्या उन्नतीमध्ये भरीव योगदान देणारे राहील, असा विश्वास व्यक्त केला.

स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. आयडिया लॅब समन्वयक डॉ. पी. डी. पाटील यांनी आयडिया लॅबची उद्दिष्टे, प्रस्तावित सुविधा तसेच ध्येयधोरणे यांची माहिती दिली. लॅबचे सह-समन्वयक डॉ. एस. बी. चव्हाण यांनी आभार मानले.

कार्यक्रमास प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. एस. डी. डेळेकर, क्वालिटी ऑफिसर सुभाष माने, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे हर्षवर्धन पंडित उपस्थित होते. मेनन समुहातर्फे कार्यकारी संचालक शरण्या मेनन, देविका मेनन, निवेदिता मेनन, समुहाचे प्रेसिडेंट आर. डी. दीक्षित, व्हाईस प्रेसिडेंट अमित देशपांडे व मिलींद धोपेश्वरकर, प्रमोद सूर्यवंशी, अनिल पुरोहित, योगेश देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment