Thursday, 16 October 2025

सोलापूर, मराठवाड्यातील आपदग्रस्तांसाठी शिवाजी विद्यापीठाकडून मदत रवाना

सोलापूर, मराठवाड्यातील आपदग्रस्तांसाठी शिवाजी विद्यापीठाकडून मदत रवाना करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले, गजानन पळसे, डॉ. संदीप पाटील, डॉ. सचिन चव्हाण, सुजीत मुंडे, सुरेखा आडके आदी


कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: महाराष्ट्रात सोलापूरसह मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्तीकाळात आपद्ग्रस्तांसाठी शिवाजी विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली व सातारा या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधून तीन टेम्पो शिधा, कपडे व अन्य जीवनावश्यक सामग्री रवाना करण्यात आली. आज कोल्हापूर जिल्ह्यातून निघालेल्या टेम्पोला कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी शुभेच्छा देऊन रवाना केले.

सोलापूर, मराठवाड्यातील आपद्ग्रस्त नागरिकांना मदतीसाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पुढाकार घेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत विशेष मदत संकलन मोहीम राबविली. या मोहिमेत तीनही जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील एन.एस.एस.चे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातून अन्नधान्य, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच शैक्षणिक साहित्य संकलित केले. या संकलित मदतीमध्ये ५७५ किलो गहू, २९६ किलो ज्वारी, २५७ किलो तांदूळ, २० किलो मूगडाळ, ५० किलो हरभरा डाळ, ७० किलो साखर, १०० किलो रवा, १०० किलो आटा, २० किलो गूळ, २० किलो शेंगदाणे, १० बॉक्स साबण, १० बॉक्स तेलाच्या बाटल्या, १० बॉक्स मारी बिस्कीट, १० बॉक्स पार्ले बिस्कीट, १२ पाकिटे ग्लुकोज डी, १५ पोती कपडे, भांडी आणि वह्या यांचा समावेश आहे. संकलित साहित्य राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सोलापूर व मराठवाडा भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे आपद्ग्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे.

कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले की, आपत्तीच्या काळात युवकांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दाखवलेली तत्परता व सहानुभूती अभिमानास्पद आहे. हा उपक्रम सेवेमध्येच शिक्षणया राष्ट्रीय सेवा योजनेच्या तत्त्वज्ञानाला साजेसा ठरला असून, समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखवलेली बांधिलकी व एकात्मतेचा भाव कौतुकास पात्र ठरला आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे नियोजन विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी केले.

आज मदत रवाना करीत असताना डॉ. चौगुले यांच्यासह उपकुलसचिव गजानन पळसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. सचिन चव्हाण, सुजित मुंडे, सुरेखा आडके आणि एनएसएस विभागातील प्रशासकीय सेवक उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment