Thursday, 26 May 2022

विद्यापीठाचे माजी विद्यार्थी न्यायमूर्तीपदी नियुक्त होणे अभिमानास्पद: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात न्या. अमित बोरकर यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत विद्यापीठाचे अधिकारी.

न्या. अमित बोरकर यांना ग्रंथभेट देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.


न्या. अमित बोरकर यांचा शिवाजी विद्यापीठात सत्कार

कोल्हापूर, दि. २६ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या अमित बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणे, ही विद्यापीठ परिवाराबरोबरच समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अमित बोरकर यांचा आज शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या न्या. बोरकर यांनी विद्यापीठाच्या वकीलांच्या पॅनलवरही अत्यंत प्रभावी पद्धतीने काम केले. आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्यांनी न्यायमूर्ती पदापर्यंत झेप घेतलेली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा विद्यापीठ परिवारास अभिमान वाटतो.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाचे वकील म्हणून काम केल्यानंतर पुढे न्यायमूर्ती होण्याची एक परंपरा निर्माण झालेली आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयही त्यास अपवाद राहिलेले नाही. त्यातही न्या. बोरकर हे कोल्हापूरचेच आणि विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा आनंद वेगळा आहे.

न्या. बोरकर सत्कारास उत्तर देताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान सदैव माझ्या मनात आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचा वकील म्हणून काम करण्याची संधी लाभली, ही बाबही महत्त्वाची ठरली. हे काम करीत असताना विद्यापीठ प्रशासनाचे आणि सर्वच अधिकाऱ्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. विद्यापीठाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती हे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गुणवैशिष्ट्य मला भावले. विद्यापीठाच्या या चमूने यापुढील काळातही अशाच पारदर्शकतेने कार्यरत राहावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते न्या. बोरकर यांचा शाल, श्रीफळ, विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विधी अधिकारी अॅड. अनुष्का कदम यांनी आभार मानले.

कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी श्रीमती विभा अंत्रेडी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 24 May 2022

महाराष्ट्र के रंग; पंजाब के संग!

 

पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा २७पासून सांस्कृतिक दौरा

कोल्हापूर, दि. २४ मे: आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव या संयुक्त निमित्ताने विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संघ येत्या २७ मे पासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजादी का अमृत महोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव या निमित्ताने विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रम घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत यापूर्वी दि. ७ एप्रिल २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा एक संघ पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला. १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान  झाले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देवी तालाब मंदिर तसेच करतारपुर येथील जंग ए आजादी मेमोरियल, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग व वाघा बॉर्डर अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. याशिवाय शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा असलेले लोकनृत्य, लावणी, सुगम गायनमूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड आदी महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित पंजाबमधील विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले.

या सांस्कृतिक आदानप्रदानाचा पुढचा टप्पा म्हणून आता पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा संघ येत्या २७ मे रोजी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात येत आहे. दि. २७ ते ३१ मे २०२२ या काळात ही टीम शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच येथील परंपरा आदींचा अभ्यास करणार आहे. पंजाबमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शिवाजी विद्यापीठात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. पंजाबच्या टीममध्ये ५१ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये विद्यार्थी, तज्ञ प्रशिक्षक आणि विद्यापीठाचे अधिकारी यांचा समावेश आहे. विद्यापीठातील चार दिवसाच्या वास्तव्यामध्ये हे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परिसर, कणेरी मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मोतीबाग तालीम, कोल्हापुरी चप्पल लाईन, रंकाळा आदी परिसरात भेटी देऊन कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भांची माहिती जाणून घेणार आहेत. याशिवाय पंजाबची लोकसंस्कृती, लोकनृत्य, लोकगीते तसेच पारंपारिक कला प्रकार येथील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजावेत यासाठी पंजाबचे विद्यार्थी तेथील स्थानिक कलाप्रकार विद्यापीठात सादर करणार आहेत. यातून कोल्हापूरकरांना पंजाबच्या लोककलेची, लोकपरंपरेची आणि लोकसंस्कृतीची ओळख होण्यास मदत होणार आहे.  याचबरोबर शिवाजी विद्यापीठ संघाने पंजाबमध्ये सादर केलेला कलाविष्कार  विद्यापीठातील विद्यार्थी,  शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, शहरवासीय यांना पाहता यावा यासाठी महाराष्ट्राची लोकधारा, मुकनाटय, देशभक्तीपर लघुनाटिका,  महाराष्ट्रीयन वाद्यवृंद, भारतीय वाद्यवृंद, राग यमन कल्याण मधील विविध गायकांनी गायलेल्या विविध गाण्यांचे मुखडे असलेला कार्यक्रम इ. सादरीकरण शिवाजी विद्यापीठाचा संघ सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण दि. ३० व ३१ मे, २०२२ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये  केले जाणार आहे.


या उपक्रमाचा सविस्तर कार्यक्रम असा-








‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमास

काश्मीर विद्यापीठात प्रारंभ

 

श्रीनगर येथे स्तुति सातदिवसीय प्रशिक्षण उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार एस.एस. कोहली. समोर सहभागी शिक्षक व संशोधक विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकारातून देशव्यापी उपक्रम

 श्रीनगर/ कोल्हापूर, दि. २४ मे २०२२: केंद्र सरकारच्या स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण  भारतातून किमान दहा हजार तज्ज्ञ प्रशिक्षित व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार एस.एस. कोहली यांनी व्यक्त केली.

भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि काश्मीर विद्यापीठ, श्रीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुति (सिनर्जिस्टीक ट्रेनिंग प्रोग्राम युटिलाइझिंग दि सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास काल, सोमवारी (दि. २३) श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठात प्रारंभ झाला. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून स्तुति उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. त्यातील हा दुसरा उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. कोहली बोलत होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काश्मीरच्या उपराज्यपालांचे सल्लागार आर.आर. भटनागर, काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निलोफर खान, काश्मीर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तलत अहमद, अनंतनाग येथील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. शाकील रामशो आदी उपस्थित होते.

या सात दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात १५० प्राध्यापक व विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. २९ मे पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत वरिष्ठ तज्ज्ञ प्राध्यापक अत्याधुनिक वैज्ञानिक साधने व उपकरणे यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने येथील सैफ-सीएफसी केंद्राचे प्रमुख व स्तुति उपक्रमाचे समन्वयक डॉ. आर.जी. सोनकवडे हे काश्मीर येथे उपस्थित राहून कार्यक्रमाचे संयोजन पाहात आहेत.

‘नॅनोसायन्स’च्या दोन विद्यार्थिनींना

परदेशांत पीएच.डी. संशोधनाची संधी

 

रेश्मा शिंगटे
अपराजिता कदम


दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांकडून भरघोस विद्यावेतनासह निवड

कोल्हापूर, दि. २४ मे: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील अपराजिता ज्ञानेश्वर कदम (रा. अपशिंगे, सातारा) आणि रेश्मा शिवाजी शिंगटे (रा. जैनवाडी, सोलापूर) या विद्यार्थिनींची अनुक्रमे दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया येथील जागतिक क्रमवारीत अव्वल विद्यापीठांमध्ये पीएच.डी. संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यासाठी त्यांना भरीव विद्यावेतनही मिळणार आहे.

जगातील कोविड-१९चा प्रलयकारी संसर्ग ओसरत असताना विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची कवाडे आता पुन्हा नव्याने खुली होत आहेत. विद्यापीठाच्या नॅनोसायन्स अधिविभागातील अपराजिता कदम आणि रेश्मा शिंगटे या विद्यार्थिनींनी सन २०२१मध्येच त्यांची एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना ही परदेशी संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. अपराजिता यांची दक्षिण कोरियातील जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या सुंगक्युनक्वान विद्यापीठात (Sungkyunkwan University) वार्षिक अब्ज ५६ लाख कोरियन वोन (अंदाजे रुपये १० लाख) इतक्या विद्यावेतनासह तर रेश्मा यांची ऑस्ट्रेलियातील जागतिक क्रमवारीत १९३व्या स्थानी असलेल्या वोलन्गाँ विद्यापीठामध्ये (University of Wollongong) वार्षिक २८,८५४ ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे रुपये १६ लाख) इतक्या भरघोस विद्यावेतनासह पीएच.डी. संशोधनासाठी प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थिनींना त्यांचे अधिविभागातील संशोधन प्रकल्प मार्गदर्शक, डॉ. आरिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. किरणकुमार शर्मा शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Monday, 23 May 2022

राजर्षी शाहूंविषयीच्या चित्रप्रदर्शनातून कोल्हापूर स्कूलचा जागतिक दर्जा अधोरेखित: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित 'राजर्षी शाहू चित्र प्रदर्शन व स्पर्धे'तील विजेत्यांसमवेत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. भारती पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, हर्षवर्धन मणिपद्म आदी.


चित्रकला स्पर्धेत इचलकरंजीची सोनाली पोवार प्रथम

 

कोल्हापूर, दि. २३ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सप्ताहाअंतर्गत आयोजित चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूर स्कूलचा जागतिक दर्जा अधोरेखित झाला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठात २ ते ६ मे २०२२ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आयोजित राजर्षी शाहू महाराजांविषयीच्या चित्रकला प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण आज व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत इचलकरंजीच्या ललित कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली पोवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सदर प्रदर्शनातून तरुण कलाकारांच्या अभिव्यक्तीची ताकद समजून आली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांनी विद्यापीठ परिसराचे त्यांना आवडेल, त्या पद्धतीचे चित्रण त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून करावे. त्या संदर्भातील स्पर्धेची सविस्तर घोषणा लवकरच करू, मात्र या स्पर्धेतील विजेत्यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात येत आहे. त्यांनी या उपक्रमात आपला सहभाग जरुर नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये कोल्हापूर परिसरातील ललित कला महाविद्यालयांतील एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले. त्याशिवाय, दहा प्रतिथयश कलाकारांची चित्रेही प्रदर्शनात होती. या प्रदर्शनास डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते. विद्यापीठातर्फे या प्रदर्शनात सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विजेत्यांनाही कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली. या स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे-

प्रथम- सोनाली पोवार, ललित कला महाविद्यालय, इचलकरंजी

द्वितिय- सुप्रिया सुतार, कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर

तृतीय- सत्यम शिंगारे, रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर

याशिवाय पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. ती अशी- अवधूत मृदंगे (कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर), सुप्रिया पाटील (रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर), साक्षी पांगिरे (दळवीज् आर्ट्स, कोल्हापूर), रोहित गायकवाड (दळवीज् आर्ट्स कोल्हापूर) आणि समृद्धी मंडलिक (रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर)

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, हर्षवर्धन मणिपद्म आणि श्री. हृषिकेश यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी सप्ताह समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर संयोजक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

Saturday, 21 May 2022

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त

शिवाजी विद्यापीठात सामूहिक शपथ

 

 


कोल्हापूर, दि. २१ मे: शिवाजी विद्यापीठात आज दहशतवाद हिंसाचारविरोधी दिनानिमित्त सामूहिक शपथग्रहण कार्यक्रम झाला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू सभागृहाच्या हिरवळीवर हा उपक्रम राष्ट्रीय येवा योजनेतर्फे आयोजित करण्यात आला.

यावेळी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे किरण पवार स्वयंसेवकांनी शपथ वाचन केले.