शिवाजी विद्यापीठात न्या. अमित बोरकर यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत विद्यापीठाचे अधिकारी. |
न्या. अमित बोरकर यांना ग्रंथभेट देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. |
न्या. अमित बोरकर यांचा शिवाजी विद्यापीठात सत्कार
कोल्हापूर, दि. २६
मे: शिवाजी विद्यापीठाचे
माजी विद्यार्थी असलेल्या अमित बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून
नियुक्ती होणे, ही विद्यापीठ परिवाराबरोबरच समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत
अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अमित बोरकर यांचा आज शिवाजी विद्यापीठाच्या
वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन
परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या
न्या. बोरकर यांनी विद्यापीठाच्या वकीलांच्या पॅनलवरही अत्यंत प्रभावी पद्धतीने
काम केले. आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्यांनी न्यायमूर्ती पदापर्यंत झेप घेतलेली
आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा विद्यापीठ परिवारास अभिमान वाटतो.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाचे वकील
म्हणून काम केल्यानंतर पुढे न्यायमूर्ती होण्याची एक परंपरा निर्माण झालेली आहे.
अगदी सर्वोच्च न्यायालयही त्यास अपवाद राहिलेले नाही. त्यातही न्या. बोरकर हे कोल्हापूरचेच आणि
विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा आनंद वेगळा आहे.
न्या. बोरकर सत्कारास उत्तर देताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा
अभिमान सदैव माझ्या मनात आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचा वकील म्हणून काम करण्याची
संधी लाभली, ही बाबही महत्त्वाची ठरली. हे काम करीत असताना विद्यापीठ प्रशासनाचे
आणि सर्वच अधिकाऱ्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. विद्यापीठाप्रती निष्ठा,
प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती हे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गुणवैशिष्ट्य मला
भावले. विद्यापीठाच्या या चमूने यापुढील काळातही अशाच पारदर्शकतेने कार्यरत
राहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते न्या. बोरकर यांचा शाल, श्रीफळ,
विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी केले. जनसंपर्क
अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विधी अधिकारी अॅड. अनुष्का कदम
यांनी आभार मानले.
कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी
संचालक गजानन पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी श्रीमती विभा अंत्रेडी यांच्यासह
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment