Thursday 5 May 2022

युवकांनी शाहू विचारांचा अंगिकार करावा: डॉ. यशवंतराव थोरात

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात. मंचावर (डावीकडून) डॉ. व्ही.एन. शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, डॉ. भारती पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात. समोर उपस्थित श्रोते.


कोल्हापूर, दि. ५ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. शंभर वर्षांपूर्वीच्या तत्कालीन परिस्थितीत त्यांनी समतेसाठी लढा दिला. त्यांच्या एकूणच सामाजिक, सर्वांगीण विचारांचा युवकांनी अंगिकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता जिल्ह्याभरात जागर शाहू कर्तृत्वाचा या शीर्षांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले. या विशेष व्याख्यानमालेतील प्रमुख व्याख्यानाअंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती-जीवन कार्यया विषयावर डॉ. थोरात बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते.

यावेळी व्यासपीठावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. भारती पाटील आदी उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होणारे राजे म्हणून, शाहू महाराजांचा उल्लेख करावा लागेल. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते, असे सांगून महाराजांच्या तत्कालीन समाज विषयक धोरणाचा समाजावर काय प्रभाव पडला आहे, यावर संशोधकांनी, अभ्यासकांनी जरुर प्रकाश टाकावा, असे आवाहन डॉ. थोरात यांनी उपस्थितांना केले. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाल्याचे सांगून आजही शाहू महाराजांचे विचार हे मनुष्यत्वाला, माणुसकीला पोषक असल्याचा उल्लेख करुन महाराजांच्या एकूणच सामाजिक विचारांचा प्रसार आणि प्रचार सध्याच्या तरुणांनी करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे, मानवतावादाचे, समाजविषयक विचार थांबता कामा नये. ते विचार प्रत्यक्ष कृतीत यावेत. केंद्र व राज्य सरकारने शाहू विचारांवर कार्यरत राहावे. तीच महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी, सत्तेचा राजदंड खऱ्या अर्थाने बहुजनांच्या उत्थानासाठी वापरला. हा राजदंड वापरणारे ते एकमेवाद्वितीय राजे होते. महाराजांच्या अंगी साधुत्व होते. तत्कालीन सामाजिक नकाशा बदलण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू विचारांवर आपण स्वत: नखशिखांत पोसला गेलो असल्याचेही त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. बहुजन समाजाचे आत्मभानशाहु महाराजांनी जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे लोकमान्यअसल्याचे उद्गार महाराजांनी काढल्याची आठवण सांगून काय घडलेआणि का घडलेहे सांगणारे इतिहासकारांचे दोन प्रकार असल्याचे सांगून डॉ. थोरात हे का घडले? हे सांगणारे इतिहासकार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

शंभर नव्हे, ३५० व्याख्याने!

एकाच वेळी शहरात आणि जिल्ह्यात शंभर ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. तथापि, शाहू महाराजांच्या प्रेमापोटी तब्बल ३५० ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी दिली.

शिवाजी विद्यापीठ व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले, तर कुलसचिव डॉ. व्ही.ए. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर सिद्धनेर्ली येथील शाहीर सदाशिव निकम यांनी शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment