कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती
शाहू महाराज स्मृती शताब्दी सप्ताहास आज सायंकाळी विशेष ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने उत्साही
प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि ज्येष्ठ शाहू संशोधक डॉ. जयसिंगराव
पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारात राजर्षी शाहू
संशोधन केंद्राच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले असून यामध्ये एकूण ११५
ग्रंथ समाविष्ट आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची चरित्रे, कागदपत्रे,
छायाचित्रे आणि शाहू महाराजांशी निगडित अनेक दुर्मिळ ग्रंथांचा यात समावेश आहे. शिवाजी
विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स’चे ९ खंड, राजर्षी शाहू केंद्रामार्फत सुरू करण्यात
आलेल्या राजर्षी शाहू साहित्य मालेअंतर्गत प्रकाशित झालेली पुस्तके, शाहू
महाराजांची विविध संशोधकांनी लिहीलेली बहुविध भाषांतील दुर्मिळ चरित्रे,
महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित राजर्षी शाहू चरित्राची साधने यांचा समावेश सदर
प्रदर्शनात आहे. ‘डॉ.
जयसिंगराव पवार यांची शाहू चरित्र साधना’
हे विशेष दालन डॉ. पवार यांच्या समग्र शाहूंविषयीच्या कार्याला समर्पित असे आहे.
यामध्ये त्यांनी शाहू महाराजांविषयी लिहीलेली, संपादित केलेली तसेच देशीविदेशी
भाषांत अनुवादित झालेली पुस्तके समाविष्ट आहेत. सदरचे प्रदर्शन ७ मेपर्यंत सकाळी
११ ते ५ या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.
व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र
कांकरिया, डॉ. भारती पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलांबरी जगताप यांच्यासह
अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment