Thursday, 5 May 2022

राजर्षी शाहूंच्या कार्यातील मानवतावादी मूल्ये समजावून घेणे आवश्यक: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

रुकडी येथील महाविद्यालयात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, यतिराज भंडारी, डॉ. गिरीष मोरे, डॉ. खंडेराव शिंदे आदी.

रुकडी येथील महाविद्यालयात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. 

रुकडी येथील महाविद्यालयात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. 

समोर उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. ५ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यातील मानवतावादी मूल्ये आजच्या पिढीने समजावून घेतली पाहिजेत आणि ही मूल्ये सोबत घेऊनच आयुष्यात वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय येथे केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता जिल्ह्याभरात जागर शाहू कर्तृत्वाचा या शीर्षांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले. या विशेष व्याख्यानमालेअंतर्गत कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते.

डॉ. शिर्के म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची व्याप्ती ही खूप मोठी होती. त्यांनी केवळ बहुजनांसाठी काम केले, असे नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकाच्या उत्थानाची आस त्यांच्या मनी होती. समाजाच्या दुःखाशी एकरुप होऊन ती दुःखे दूर करणारा हा राजा होता म्हणूनच ते लोकराजा आणि राजर्षी म्हणून लोकमान्यता पावले. अस्पृश्यतेसह कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यांच्या मनी आणि दारी नव्हता. म्हणूनच मानवतावादाचे एक चिरंतन प्रतीक म्हणून ते अजरामर झाले.

कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात आणि २८ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत एखादा राजा किती उच्च प्रतीची कामगिरी करू शकतो, याचे शाहू महाराज मूर्तीमंत उदाहरण होते. शिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि आर्थिक विकास या क्रमवार त्रिसूत्रीच्या आधाराने आपल्या जनतेचे कल्याण करण्यासाठी ते प्रतिबद्ध होते. त्यातही शिक्षणाच्या सर्वदूर आणि सार्वत्रिक प्रसारासाठी त्यांनी केलेले पराकाष्ठेचे प्रयत्न हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. ज्ञानदानाचा कधीही न विझणारा असा ते दीप होते. शिक्षणाखेरीज तरणोपाय नाही आणि उद्धारही शक्य नाही, हे त्यांना उमगले होते. त्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे योजनाबद्ध प्रयत्न केले. शिक्षणासाठी त्या काळी एक लाख रुपयांची तरतूद या द्रष्ट्या राजाने केलेली होती. शिक्षणाप्रसारासाठी विविध कायद्यांपासून ते वसतीगृह चळवळीच्या उभारणीपर्यंत त्यांनी काम केले. रुकडीमध्येही त्यातील एक वसतीगृह साकारले. महत्त्वाचे म्हणजे ही चळवळ केवळ कोल्हापूरपर्यंत मर्यादित न राहता सर्वदूर तिचे लाभ प्रसृत झाले. त्यामुळेच बॅ. पी.सी. पाटील यांच्यापासून ते पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक महनीय व्यक्तीमत्त्वे त्यातून घडली. शिक्षणाखेरीजही शाहू महाराजांनी कला, क्रीडा, संस्कृती, कुस्ती, कृषी, सहकार, जलसिंचन इत्यादी क्षेत्रांची भरीव पायाभरणी केली. आजचे आपले अस्तित्व हे शाहू महाराजांमुळे आहे, याची जाणीव आपण सदैव बाळगणे आवश्यक आहे. त्यावेळी या विविध क्षेत्रांतील कामगिरी महाराजांनी केली नसती, तर आपण आणखी किमान ५० वर्षांनी मागे राहिलो असतो, इतके त्यांच्या कार्याचे मोल आहे, असे ते म्हणाले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष यतिराज भंडारी, डॉ. अशोक पाटील उपस्थित होते. डॉ. गिरीश मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. खंडेराव शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांवरील ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.

माणगाव स्मृतिस्थळास कुलगुरूंची भेट

रुकडी येथील व्याख्यानानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी माणगाव येथे जाऊन ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या स्मृतीस्थळास भेट दिली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत रुकडी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते. अनिल माणगावकर आणि माणगाववासीय यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment