Wednesday, 4 May 2022

‘जागर शाहू कर्तृत्वाचा’ व्याख्यानमालेत उद्या

कुलगुरू, प्र-कुलगुरूही देणार महाविद्यालयांत व्याख्याने

शंभर व्याख्यानांतील मुख्य व्याख्यान होणार शिवाजी विद्यापीठात





कोल्हापूर, दि. ४ मे: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या, गुरूवारी (दि. ५ मे) सकाळी ११ वाजता जिल्ह्यात जागर शाहू कर्तृत्वाचा या शीर्षांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले आहे. या विशेष व्याख्यानमालेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे सुद्धा सक्रिय सहभागी होणार असून उद्या संलग्नित महाविद्यालयांत व्याख्यान देणार आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता आयोजित या विशेष व्याख्यानमालेमध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांच्या योगदानाविषयी व्याख्यान देणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे चंदगड येथील आर.बी. माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान देणार आहेत.

या व्याख्यानमालेतील मुख्य व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात होणार आहे. ख्यातनाम अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात हे यावेळी राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान देणार असून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानानंतर तेथेच दुपारी १२ वाजता सिद्धनेर्ली येथील शाहीर सदाशिवराव निकम हे लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा पोवाडा सादर करतील.

या सर्व व्याख्यानांचा शाहूप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment