Friday 20 May 2022

शिवरायांच्या प्रेरणेने देश महासत्ता होईल: केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. योगेश जाधव, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.


कोल्हापूर, दि. २० मे: नीतीमत्तेच्या बळावर भारताची विश्वगुरू म्हणून वाटचाल सुरू आहे. भारत महासत्ता म्हणून उदयाला येईलच; पण, त्याला अन्य महासत्तांप्रमाणे आर्थिक आणि लष्करी शोषणाचे अंग नसेल. छत्रपती शिवाजी महाराज हेच या महासत्ता बनण्यामागील प्रेरणास्रोत राहतील, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 'पुढारी'कार कै. डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत 'भारत: एक जागतिक महासत्ता' या विषयावर श्री. माहुरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. मंचावर दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक डॉ. योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित होते.

 

माहिती आयुक्त माहुरकर म्हणाले, कोणताही देश जगाची महासत्ता होताना अनेक निकषांचा विचार होतो. त्या अर्थनीती, जागतिक पातळीवर सामना करावा लागणारा दहशतवाद आणि हवामानातील बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी वापर अशा काही प्रमुख बाबींचा समावेश होतो. त्याशिवाय काही अशा गोष्टी असतात की, त्याचा फार मोठा नैतिक प्रभाव पडत असतो. त्यामध्ये भारतीय योगाचे फार मोठे महत्त्व आहे.

सन २०२७ मध्ये पाच ट्रिलियन टप्पा गाठणार

भारतात २०१२ ते २०१९ या काळात लाखो लोक दारिद्रयरेषेच्या वर आल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, भारताने महासत्ता होण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या सात-आठ वर्षात या दिशेने जोमाने वाटचाल सुरू आहे. दोन वर्षापूर्वी कोरोना आला नसता तर भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्स एवढी असती. आज ती तीन ट्रिलीयन डॉलर्स एवढी आहे. पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा आपण २०२७ पर्यंत गाठणार आहोत. चीनने महासत्ता होण्यासाठी दारिद्रयरेषेखालील लोकांना त्या रेषेच्या वर आणले आणि महासत्तेच्या दृष्टीने एक भक्कम पाऊल टाकले. आज भारत याच दिशेने वाटचाल करीत आहे.

भारताच्या डिजिटायझेशनने जगाला थक्क करून सोडल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, युरोपातील दोन मोठे उद्योग स्कोडाचे भारतात पार्टनर आहेत. यावरून युरोपियन देश या डिजिटायझेशनने किती थक्क झाले आहेत हे दिसून येते. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात हे घडून येते आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. हे होण्यामागे अनेक कारणे आहेत. १९७० पर्यंत देशात अनेक गोष्टी योग्य प्रकारे घडत होत्या. त्यानंतर मात्र उत्तरदायित्व आणि पारदर्शकता यांचा अभाव पहिल्यांदा राजकारणात दिसला आणि तो पाझरत प्रशासनातही आला. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागले.

ते म्हणाले, सत्तरच्या दशकापासून नेत्यांना माझयाशी निष्ठावंत कोण आहे, याचे महत्त्व वाटू लागले. त्यातून राजकारण आणि प्रशासन बिघडत गेले. त्यातूनच अनेक चुकीच्या गोष्टी घडत गेल्या. १९८० नंतर याला वेग आला. या काळात प्रत्येकवेळी काही आर्थिक व्यवहाराशी संबंधित गोष्टी घडल्या असे नाही. पण ते राजकीय असो किंवा प्रशासकीय असो, त्याच्याकडून आपल्याला हवे तसे काम करून घेणे सुरू झाले.

उत्तरदायित्व आणि पारदर्शकता या दोन चाकांवर भारतीय महासत्तेचा रथ दौडत असल्याचे सांगताना माहुरकर म्हणाले की, प्रत्येक खात्याचा एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला. त्यावर तुम्हाला त्याच संबंधित खात्याची आजची काय अवस्था आहे, हे त्याच क्षणी कळते. ही पारदर्शकता प्रशासनात आणण्याचे मोठे काम भारतीय पंतप्रधानांनी केले आहे. देशात कोणत्या खात्याने किती काम केले याची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्यात येते. पंतप्रधान आवास योजनेत कोणत्या गावात किती घरे दिली, किती घरांचे काम सुरू आहे याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला तर काय सकारात्मक बदल होतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

 

सरकारी खर्चात बचत

आज शासनात ज्या काही गोष्टी किंवा सेवांची गरज लागते, त्या सर्व गोष्टी गव्हमेंट ई-मार्केटिंग या पोर्टलवरून घेतल्या जातात. ज्यांच्याकडे वस्तू सेवा उपलब्ध आहेत, ते यावर नोंदणी करतात आणि ज्यांना त्याची गरज आहे, अशी सरकारी खाती येथून त्या वस्तू सेवा मिळवितात. यामुळे सरकारी खर्चात दहा ते वीस टक्के बचत झाल्याचा दावा माहुरकर यांनी केला.

आयकर क्षेत्रात बदल

आयकराच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, प्रामाणिक करदात्यांवर खूप मोठा विश्वास ठेवण्यात आला. पूर्वीच्या सरकारने सरकारी लाभांचे थेट हस्तांतरण ही योजना आणली खरी. मात्र ती प्रत्यक्षात राबविण्यासाठी संबंधित व्यक्तींची बँ खाती नव्हती. आता सर्वसामान्यांची जनधन खाती बँकेत उघडण्यासाठी खास योजना हे. यामुळे सरकारी योजनांचे लाभ आज ४२ कोटी खात्यांमध्ये थेट जमा होतात. हे सर्वात मोठे यश आहे. यापूर्वी अशा योजनांचे लाभ घेण्यासाठी चेकचे व्यवहार होत आणि चेक देणारा क्लार्क पाच हजारच्या रकमेसाठी दोनशे रूपयांपासून ते पाचशे रूपयांपर्यत मागणी करीत असे. मात्र ही सारी व्यवस्था मोडीत काढून पारदर्शकता आली. त्याचा लाभ सर्वसामान्य अशा ४२ कोटी कुटुंबांना झाला, हे केवढे मोठे यश आहे. यूपीआय या सेवेमुळे पैशाची देवाणघेवाण सहजपणे करता येतो. हे सर्वात मोठे तंत्रज्ञानाचे यश आहे.

सन २०७० पर्यंत आपल्याला कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणायचे आहे. यासाठी फार मोठे नियोजन भारत करीत आहे. यामध्ये भारतच जगाचा विश्वगुरू होणार आहे. त्याचबरोबर विजेच्या क्षेत्रातही आपण क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. शंभर गिगावॅट 450 गिगावॅटपर्यंत मजल आपल्याला मारायची आहे. त्यासाठी सौरऊर्जा महत्त्वाची आहे. ज्या देशात सूर्यप्रकाश सर्वाधिक उपलब्ध, अशा राष्ट्रांच्या सहाय्याने भारत या क्षेत्रातही नेतृत्व करीत आहे आणि त्यासाठी योग्य प्रकारे पावले टाकली जात आहेत. दहशतवादाच्या मुद्यावरही भारताने पाकिस्तानला तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या अन्य संघटनांना जागतिक पातळीवर एकाकी पाडले आहे, हे फार मोठे यश भारताने मिळविले आहे.

 

सॉफ्टवेअरमध्ये दबदबा

विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी वापर करण्याचे सरकारचे ध्येय आहे. याचा सर्वाधिक वापर भारत करीत आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारताचा जगात दबदबा आहे. त्यासाठी अनिवासी भारतीयांना प्रोत्साहित करण्याचे काम होत आहेत. जेथे जातील तेथे ते भारताची विविध क्षेत्रांतील प्रगती आवर्जून सांगतात. यामध्ये एकाच वेळी १०४ उपग्रह आपण अवकाशात सोडू शकलो याचाही उल्लेख करतात. या सर्व प्रगतीमागे भारताने केलेली आर्थिक प्रगती याचाही उल्लेख असतो, असेही ते म्हणाले.

जागतिक पातळीवर ज्या आयटीचा दबदबा आहे, त्याचे नेतृत्व सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांच्यासारखे भारतीय करीत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक तरूण हात त्यामागे राबत आहेत. म्हणूनच या क्षेत्रातही भारत विश्वगुरू म्हणावा लागेल, असेही माहुरकर म्हणाले.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपण चीनला घाबरून सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. डोकलाममधील समस्या ही त्याचा परिणाम असल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, त्यावेळी हे केले असते तर ही समस्या उद्भवली नसती. आता हे काम सुरू केल्याने चीनचा जळफळाट झाला आहे.

ते म्हणाले, ही सगळी वाटचाल करीत असताना त्यामध्ये काही अडथळे येत आहेत. यातील सर्वात मोठा अडसर आपल्याला इतिहासाचे कमी ज्ञान असणे हा आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांवर ज्या बीभत्स पोस्ट येतात, त्यामुळे आपल्या तरूणाईचे फार मोठे नुकसान होत आहे. मात्र याविरोधात कोणी उभे राहात नाही, याची खंत वाटते.

 

सम्राट छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण सम्राट असाच उल्लेख केला पाहिजे. कारण त्यांच्या मृत्यूनंतरही हे त्यांचे कार्य त्यांच्या मावळ्यांनी सुरू ठेवले. शिवाजी महाराजांचे साम्राज्य गुजरातच्या वलसाडपासून ते तमिळनाडूतील जिंजीपर्यंत 1600 कि. मी. एवढे विस्तीर्ण होते. विजयगिरीचे साम्राज्य 700 कि. मी. होते. इतके मोठे साम्राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणूनच सम्राट म्हटले पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे हिरकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांनी १९३३-३४ मध्ये साप्ताहिक 'सेवक' मधून शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरण्यासाठी तीस वर्षांचा काळ गेला. त्यांचे विद्यापीठ स्थापनेत मोलाचे योगदान राहिले. डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात देशातील पहिले पत्रकारिता अध्यासन सुरू करण्यासाठी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यापीठाची प्रगती संगीत नाटयशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभागाच्या उभारणीत डॉ. जाधव त्यांचा मोलाचा वाटा आहे.

प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी करून दिला. निवेदक विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, बाळ पाटणकर, डॉ. सुमेधा साळुंखे, कॉ. दिलीप पोवार, मधुकर पाटील, डॉ. भारत खराटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment