पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कणेरीमठास भेट |
न्यू पॅलेससमोर पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी |
कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध चप्पल लाईन येथे कोल्हापुरी चप्पल खरेदी करताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी. |
पंजाबी विद्यार्थ्यांची कोल्हापूर दर्शनानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया
कोल्हापूर, दि. २९ मे: 'भाई, त्वाडा कोल्हापूर कित्ता चंगा सी !' अर्थात आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर 'भावा, तुमचं कोल्हापूर लै भारी' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पंजाबी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित 'महाराष्ट्र के रंग पंजाब की संग' हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरात पाच दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झालेल्या पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी काल (शनिवारी) दिवसभरात कोल्हापुरातील विविध ठिकाणी भेट देऊन कोल्हापुरी संस्कृती आणि पाहुणचाराचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी कणेरीमठ, न्यू पॅलेस, अंबाबाईचे मंदिर, रंकाळा आणि कोल्हापूर चप्पल लाईनला भेट दिली.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे खाजगी विद्यापीठ असून विविध राज्यांतील आणि देशांतील मुलं इथे शिकायला येतात. शिवाजी विद्यापीठातील या उपक्रमासाठी पंजाब, हरियाणा, उ. प्रदेश, ओडिशा, हिमाचल, बिहार, मध्यप्रदेश, त्रिपुरा, आसाम, प. बंगाल आदी विविध राज्यातील विद्यार्थी कोल्हापुरात आलेली आहेत. कोल्हापुरचे दर्शन घेऊन येथील विविध ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. या प्रवासाचा त्यांनी मनमुराद आनंद घेतला.
कोल्हापुरी चपलांचे खास आकर्षण
कोल्हापूरला दिलेल्या भेटीची आठवण आणि घरच्यांसाठी करावयाच्या खरेदीमध्ये पाहुण्या विद्यार्थ्यांनी खासकरून कोल्हापुरी चपलांना पसंती दिली. याशिवाय हस्तकलेने युक्त अशा पर्स, पिशवी आणि कोल्हापुरी दागिने यांचीही खरेदी करण्यास त्यांनी पसंती दिली. कोल्हापूरी चटपटीत मिसळ, भेळपुरी, वडापाव यांवर पंजाबी मुलांनी ताव मारला. महाराष्ट्राच्या डोंगरांवर पिकणाऱ्या काळी मैना अर्थात करवंदांची चव त्यांनी प्रथमच चाखली. ती त्यांनी खूप आवडीने खाल्ली.
उद्यापासून दोन दिवस या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाकारीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
No comments:
Post a Comment