शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित पथनाट्य सादर करताना विद्यार्थी. |
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद
कोल्हापूर, दि. ४ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज
स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित सप्ताहांतर्गत आज शाहू
महाराजांच्या कार्यावर आधारित विशेष पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या
पथनाट्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करणारे पथनाट्य
विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केले. या पथनाट्यात शाहू महाराजांच्या समग्र
जीवनकार्याचा आढावा अत्यंत कल्पकतेने घेण्यात आला. शाहू महाराजांनी शेतीच्या
विकासासाठी केलेली राधानगरी धरणाची निर्मिती, शिक्षणासाठीचा कायदा, अस्पृश्यता निवारणासाठीचे
त्यांचे भरीव योगदान यांची मांडणी पथनाट्याद्वारे प्रत्ययकारकतेने करण्यात आली.
गंगाराम कांबळे यांना सत्यसुधारक हॉटेल काढून देण्याचा आणि तेथे स्वतः जाऊन चहा
पिण्याचा प्रसंग विद्यार्थ्यांनी उत्कटतेने सादर केला.
सदर पथनाट्याची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन प्रा. अमोल मिणचेकर यांनी केले.
प्रा. उमेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादरीकरण झाले.
पथनाट्यात तुषार कदम, आदिती निल्ले, आर्यदीप कांबळे, प्राजक्ता गायकवाड, अक्षय
काळभोर, गजानन सोनवणे, किशोरी कांबळे, ऋतुजा इनामदार, सपना तरटे, शिवानी पाटील,
सिद्धी देशपांडे, वर्षा तरटे, चंद्रकांत दंडवते, सिद्धी देशिंगे, राहुल पिसाळ,
मोनिका पाटील, प्रियंका माने, प्रार्थना पिसे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
महाराज स्मृती शताब्दी वर्ष सप्ताह समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, डॉ. संजय
जाधव यांच्यासह अधिकार मंडळांच्या उपस्थित सदस्यांनी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट
सादरीकरणाबद्दल अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment