छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा जरीपटका नाचविताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी. |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा जरीपटका नाचविताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे विद्यार्थी. |
मर्दानी
खेळांच्या सादरीकरणाने भारावले पाहुणे
कोल्हापूर, दि. २८ मे: आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी
विद्यापीठाचा हिरकमहोत्सव या संयुक्त निमित्ताने आयोजित सांस्कृतिक आदान-प्रदान
उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात दाखल झालेल्या फगवाडा-पंजाब येथील लव्हली
प्रोफेशनल विद्यापीठाच्या चमूचे आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी
खेळांच्या सळसळत्या जल्लोषी उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत व सादरीकरणाने
पाहुणा संघ भारावून गेला.
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचे आज सकाळी महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझीम
व झांजपथकाच्या साथीने मिरवणुकीने वाजतगाजत शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आगमन
झाले. त्यानंतर त्यांचे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुंकुमतिलक लावून औक्षण
करण्यात आले व सर्व सदस्यांना पुष्पमाला घालण्यात आल्य़ा. विद्यापीठासमोरील छत्रपती
शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या दर्शनाने पंजाबचे विद्यार्थी
भारावले. मुख्य प्रशासकीय भवनासमोर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
यांनी पंजाबच्या संघाचे औपचारिक स्वागत केले. पंजाब संघाच्या वतीने प्र-कुलगुरू
डॉ. पाटील यांनाही पंजाबी शाल प्रदान करण्यात आली.
या स्वागत सोहळ्यानंतर शिवाजी पेठेतील मर्दानीराजा सुहासराजे ठोंबरे आखाडा आणि
श्री खंडोबा-वेताळ तालीम मर्दानी खेळ पथक यांनी कोल्हापूरभूषण वस्ताद आनंदराव
ठोंबरे आणि संघनायक कृष्णात ठोंबरे व किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन
युद्धकलेचे अर्थात विविधांगी मर्दानी खेळांचे अत्यंत चित्तथरारक व बहारदार सादरीकरण
केले. शाहीर मिलिंदा सावंत यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली. आबालवृद्धांचा
सहभाग असलेल्या या मर्दानी खेळांचे सादरीकरण पाहून पंजाबचे सदस्य अतिशय भारावून
गेले.
यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य डॉ.
व्ही.एम. पाटील, डॉ. नीलेश सावे, डॉ. शिवाजी जाधव, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे बलप्रीत
सिंग, वैशाली कालरा यांच्यासह
शिवाजी विद्यापीठाच्या संयोजन समितीचे सदस्य शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि
विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अत्यंत उत्साही स्वागत समारंभानंतर पाहुणा संघ कोल्हापूर दर्शनासाठी रवाना
झाला.
दरम्यान, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाचे काल रात्री आठ वाजता कोल्हापूरच्या
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आगमन झाले. त्यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी त्यांचे स्वागत केले.
कोल्हापूरची संस्कृती व परंपरा यांचा परिचय करून घ्या: प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यावेळी पाहुण्या संघाला संबोधित करताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, आपण विद्यार्थ्यांनी आपल्या कोल्हापूर भेटीच्या कालखंडात कोल्हापूरला लाभलेला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा आणि त्यातून विकसित झालेली येथील पुरोगामी संस्कृती व परंपरा यांचा जवळून परिचय करून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच, या पुढील काळात लव्हली प्रोफेशनल विद्यापीठासमवेत केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर शैक्षणिक व संशोधकीय बंधही विकसित होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी येथील निवास व भोजन व्यवस्था चांगली झाल्याचे विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांना सांगितले.
पाहुण्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जयघोषात
नाचविला भगवा जरीपटका
शिवकालीन युद्धकलेच्या प्रदर्शनाने पंजाबी विद्यार्थी इतके भारावले की
कार्यक्रमाच्या शेवटी तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत मैदानात
उतरले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत पंजाबच्या विद्यार्थ्यांनी अतिशय
प्रेमाभिमानाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा जरीपटका ध्वज नाचविला. त्याभोवती इतर विद्यार्थी-विद्यार्थिनीही लेझीम
खेळत फेर धरला. यावेळी साऱ्यांचाच उत्साह ओसंडून वाहात होता.
No comments:
Post a Comment