Friday, 20 May 2022

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे

शिवाजी विद्यापीठात स्वागत

 


केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन शिवाजी विद्यापीठात स्वागत करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. अक्षय सरवदे.

कोल्हापूर, दि. २० मे: केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या वतीने स्वागत केले.

विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुढारीकार पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेमध्ये भारत: एक महासत्ता या विषयावर श्री. माहूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी नवी दिल्लीहून बेळगावमार्गे आज सकाळी त्यांचे शिवाजी विद्यापीठाच्या अतिथीगृहात आगमन झाले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. जाधव यांच्या पत्रकारितेवरील ग्रंथ श्री. माहूरकर यांना भेट देण्यात आला. त्यावेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्या पत्रकारितेविषयी उपस्थितांकडून अधिक जाणून घेतले. इतिहासावर आपले निरतिशय प्रेम असून या विषयामध्येच मी सर्वाधिक रमतो, असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच शिक्षक व अधिकाऱ्यांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली.

यावेळी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे डॉ. अक्षय सरवदे, डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. पी.एस पांडव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment