Monday, 23 May 2022

राजर्षी शाहूंविषयीच्या चित्रप्रदर्शनातून कोल्हापूर स्कूलचा जागतिक दर्जा अधोरेखित: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित 'राजर्षी शाहू चित्र प्रदर्शन व स्पर्धे'तील विजेत्यांसमवेत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. भारती पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, हर्षवर्धन मणिपद्म आदी.


चित्रकला स्पर्धेत इचलकरंजीची सोनाली पोवार प्रथम

 

कोल्हापूर, दि. २३ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सप्ताहाअंतर्गत आयोजित चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूर स्कूलचा जागतिक दर्जा अधोरेखित झाला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठात २ ते ६ मे २०२२ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आयोजित राजर्षी शाहू महाराजांविषयीच्या चित्रकला प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण आज व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत इचलकरंजीच्या ललित कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली पोवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सदर प्रदर्शनातून तरुण कलाकारांच्या अभिव्यक्तीची ताकद समजून आली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांनी विद्यापीठ परिसराचे त्यांना आवडेल, त्या पद्धतीचे चित्रण त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून करावे. त्या संदर्भातील स्पर्धेची सविस्तर घोषणा लवकरच करू, मात्र या स्पर्धेतील विजेत्यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात येत आहे. त्यांनी या उपक्रमात आपला सहभाग जरुर नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये कोल्हापूर परिसरातील ललित कला महाविद्यालयांतील एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले. त्याशिवाय, दहा प्रतिथयश कलाकारांची चित्रेही प्रदर्शनात होती. या प्रदर्शनास डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते. विद्यापीठातर्फे या प्रदर्शनात सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विजेत्यांनाही कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली. या स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे-

प्रथम- सोनाली पोवार, ललित कला महाविद्यालय, इचलकरंजी

द्वितिय- सुप्रिया सुतार, कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर

तृतीय- सत्यम शिंगारे, रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर

याशिवाय पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. ती अशी- अवधूत मृदंगे (कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर), सुप्रिया पाटील (रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर), साक्षी पांगिरे (दळवीज् आर्ट्स, कोल्हापूर), रोहित गायकवाड (दळवीज् आर्ट्स कोल्हापूर) आणि समृद्धी मंडलिक (रा.शि. गोसावी कलानिकेतन, कोल्हापूर)

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, हर्षवर्धन मणिपद्म आणि श्री. हृषिकेश यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी सप्ताह समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर संयोजक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

No comments:

Post a Comment