Tuesday 24 May 2022

‘नॅनोसायन्स’च्या दोन विद्यार्थिनींना

परदेशांत पीएच.डी. संशोधनाची संधी

 

रेश्मा शिंगटे
अपराजिता कदम


दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांकडून भरघोस विद्यावेतनासह निवड

कोल्हापूर, दि. २४ मे: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील अपराजिता ज्ञानेश्वर कदम (रा. अपशिंगे, सातारा) आणि रेश्मा शिवाजी शिंगटे (रा. जैनवाडी, सोलापूर) या विद्यार्थिनींची अनुक्रमे दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया येथील जागतिक क्रमवारीत अव्वल विद्यापीठांमध्ये पीएच.डी. संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यासाठी त्यांना भरीव विद्यावेतनही मिळणार आहे.

जगातील कोविड-१९चा प्रलयकारी संसर्ग ओसरत असताना विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची कवाडे आता पुन्हा नव्याने खुली होत आहेत. विद्यापीठाच्या नॅनोसायन्स अधिविभागातील अपराजिता कदम आणि रेश्मा शिंगटे या विद्यार्थिनींनी सन २०२१मध्येच त्यांची एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना ही परदेशी संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. अपराजिता यांची दक्षिण कोरियातील जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या सुंगक्युनक्वान विद्यापीठात (Sungkyunkwan University) वार्षिक अब्ज ५६ लाख कोरियन वोन (अंदाजे रुपये १० लाख) इतक्या विद्यावेतनासह तर रेश्मा यांची ऑस्ट्रेलियातील जागतिक क्रमवारीत १९३व्या स्थानी असलेल्या वोलन्गाँ विद्यापीठामध्ये (University of Wollongong) वार्षिक २८,८५४ ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे रुपये १६ लाख) इतक्या भरघोस विद्यावेतनासह पीएच.डी. संशोधनासाठी प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थिनींना त्यांचे अधिविभागातील संशोधन प्रकल्प मार्गदर्शक, डॉ. आरिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. किरणकुमार शर्मा शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment