Friday, 27 May 2022

विशेष लेख:

महाराष्ट्र-पंजाबचा संस्कृती-संगम

 




 

(दि. २७ ते ३१ मे २०२२ या कालावधीत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमांतर्गत पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संघ शिवाजी विद्यापीठात येतो आहे. याअंतर्गत अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे दर्शन घडणार आहे. या निमित्त एक विशेष लेख...)

 

भारत हा विविधतासमृद्ध देश आहे. अनेकविध भाषा, वेशभूषांसह प्रदेशानुसार बदलणाऱ्या संस्कृतीचे दर्शन इथे घडते. काश्मीरमधील बर्फाळ प्रदेशापासून राजस्थानातील उष्ण वाळवंटापर्यंत, सुंदरबनच्या खारफुटी वनांपासून सह्याद्री आणि आसाम, अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलांपर्यंत आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांपासून ते दख्खनचे पठार आणि तिन्ही बाजूंनी सागराने वेढलेली किनारपट्टी अशी भुरळ पाडणारी ही विविधता आहे. यामुळेच लोकांचा पेहराव, खाद्यसंस्कृती, राहणीमान यांमध्येही वेगळेपण आढळते. यातूनच प्रत्येक राज्याची, प्रांताची स्वतःची अशी स्थानिक लोकसंस्कृती विकसित झालेली आहे. या समग्र संस्कृतींचे काही धागे एकत्र येऊनच हजारो वर्षांच्या काळापासून भारतीय संस्कृती तिच्या विविधतेमध्येही एकता व अखंडता जोपासण्याच्या अंगभूत वैशिष्ट्यासह विकसित झालेली आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाने, विशेषतः तरुणाईने या देशाच्या या वैविध्यपूर्ण संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला हवे. आपल्या प्रांतापेक्षा अन्य प्रांताची संस्कृती कशी वेगळी आहे, हे समजून घेतानाच त्या संस्कृतीशी आपले भारतीयत्वाचे बंध दृढमूल करण्यासाठी प्रयत्न करणे त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. नेमक्या याच उद्देशाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने आपल्या स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष आणि आजादी का अमृत महोत्सवअशा संयुक्त निमित्ताने सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या एकूण ४३ सदस्यांच्या संघाने पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला दिनांक १० ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत भेट दिली. त्यावेळी दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थी कलाकारांनी एकत्रितरीत्या आपल्या कलेचे सादरीकरण केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या सादरीकरणामध्ये लोकधारा (वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड इ.), लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, लावणी, कव्वाली, मूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, सुगम गायन तसेच भांगडा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने देवी तालाब मंदिर, कर्तारपुर येथील जंग-ए-आझादी मेमोरियल, अमृतसर येथील सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग व वाघा बॉर्डर या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. जालियनवाला बाग परिसराला भेट दिली, तो दिवस नेमका बैसाखीचाच होता. सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्याच दिवशी जनरल डायर याने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांवर गोळीबार केला होता. त्यामुळे या भेटीचा प्रसंग अत्यंत हृद्य आणि अविस्मरणीय ठरला. वाघा बॉर्डरची भेटही अशीच महत्त्वाची. भारत-पाकिस्तान सीमेवरील परेड तर विद्यार्थ्यांनी पाहिलीच, पण परत निघण्यापूर्वी सीमा परिसरामध्ये स्वच्छता मोहीमही राबविली.

आता या सांस्कृतिक आदानप्रदानाचा पुढचा टप्पा शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या कार्यक्रमांतर्गत साकार होत आहे. पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा संघ काल २७ मे रोजी रात्री कोल्हापुरात दाखल झाला असून आता उद्यापासून (दि. २८ मे) ३१ मे पर्यंत हा संघ विविध उपक्रमांत सहभागी होणार आहे. कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करणार आहे. या संघात ३५ विद्यार्थी, १४ तज्ज्ञ प्रशिक्षक आणि २ प्रतिनिधी असा ५१ जणांचा समावेश आहे. येथील चार दिवसांच्या वास्तव्यादरम्यान हे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परिसरासह कणेरी मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मोतीबाग तालीम, कोल्हापुरी चप्पल लाईन, रंकाळा आदी ठिकाणी भेटी देणार आहेत.

पंजाबचा संघ दि. ३० व ३१ मे रोजी कव्वाली, त्रिवेणी लोकसंगीत, झुमर, लोकनृत्य, भांगडा यांसारखे पंजाबची ओळख असणारे विविध कलाविष्कार सादर करणार आहे. यातून कोल्हापूरकरांना पंजाबच्या लोककलेची, लोकपरंपरेची आणि संस्कृतीची ओळख होईल.

हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसह नागरिकांना परस्परांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची संधी आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, एकमेकांच्या संस्कृतीतील चांगल्या-वाईट गोष्टी समजून घेत संवेदनशीलता येईल, प्रांतवाद आणि भाषावाद कमी होण्यास मदत होईल. आणि खऱ्या अर्थाने या सांस्कृतिक बंधांमधून भारताची एकता आणि एकात्मतेची भावना दृढमूल होईल. 

उपक्रमाची वैशिष्ट्ये:-

> या उपक्रमाचे मूळ उद्दिष्टच संस्कृतीचे आदानप्रदान करणे, असे आहे. इथे कोणतीही स्पर्धा नसल्याने मुलांना सहजतेने आपल्या संस्कृतीची माहिती देत, त्यांच्या संस्कृतीबद्दलही जाणून घेता येईल. 

> देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन विद्यार्थ्यांना होईल. 

> ‘आजादी का अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही युवा स्पर्धेशिवाय एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यातील विद्यापीठात संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे. 

 

-    प्रिती निकम, प्रथमेश पाटील

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

No comments:

Post a Comment