Tuesday, 24 May 2022

महाराष्ट्र के रंग; पंजाब के संग!

 

पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा २७पासून सांस्कृतिक दौरा

कोल्हापूर, दि. २४ मे: आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव या संयुक्त निमित्ताने विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संघ येत्या २७ मे पासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजादी का अमृत महोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव या निमित्ताने विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रम घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत यापूर्वी दि. ७ एप्रिल २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा एक संघ पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला. १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान  झाले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देवी तालाब मंदिर तसेच करतारपुर येथील जंग ए आजादी मेमोरियल, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग व वाघा बॉर्डर अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. याशिवाय शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा असलेले लोकनृत्य, लावणी, सुगम गायनमूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड आदी महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित पंजाबमधील विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले.

या सांस्कृतिक आदानप्रदानाचा पुढचा टप्पा म्हणून आता पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा संघ येत्या २७ मे रोजी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात येत आहे. दि. २७ ते ३१ मे २०२२ या काळात ही टीम शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच येथील परंपरा आदींचा अभ्यास करणार आहे. पंजाबमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शिवाजी विद्यापीठात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. पंजाबच्या टीममध्ये ५१ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये विद्यार्थी, तज्ञ प्रशिक्षक आणि विद्यापीठाचे अधिकारी यांचा समावेश आहे. विद्यापीठातील चार दिवसाच्या वास्तव्यामध्ये हे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परिसर, कणेरी मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मोतीबाग तालीम, कोल्हापुरी चप्पल लाईन, रंकाळा आदी परिसरात भेटी देऊन कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भांची माहिती जाणून घेणार आहेत. याशिवाय पंजाबची लोकसंस्कृती, लोकनृत्य, लोकगीते तसेच पारंपारिक कला प्रकार येथील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजावेत यासाठी पंजाबचे विद्यार्थी तेथील स्थानिक कलाप्रकार विद्यापीठात सादर करणार आहेत. यातून कोल्हापूरकरांना पंजाबच्या लोककलेची, लोकपरंपरेची आणि लोकसंस्कृतीची ओळख होण्यास मदत होणार आहे.  याचबरोबर शिवाजी विद्यापीठ संघाने पंजाबमध्ये सादर केलेला कलाविष्कार  विद्यापीठातील विद्यार्थी,  शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, शहरवासीय यांना पाहता यावा यासाठी महाराष्ट्राची लोकधारा, मुकनाटय, देशभक्तीपर लघुनाटिका,  महाराष्ट्रीयन वाद्यवृंद, भारतीय वाद्यवृंद, राग यमन कल्याण मधील विविध गायकांनी गायलेल्या विविध गाण्यांचे मुखडे असलेला कार्यक्रम इ. सादरीकरण शिवाजी विद्यापीठाचा संघ सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण दि. ३० व ३१ मे, २०२२ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये  केले जाणार आहे.


या उपक्रमाचा सविस्तर कार्यक्रम असा-








No comments:

Post a Comment