Thursday 5 May 2022

शिवाजी विद्यापीठात ‘शाहू चित्र प्रदर्शना’स प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित शाहू चित्र प्रदर्शनातील चित्रकृती पाहताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. भारती पाटील आदी.

प्रदर्शनातील काही चित्रकृती



कला विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींचा समावेश

कोल्हापूर, दि. ५ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सप्ताहांतर्गत शाहू चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. कला विद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग हे या चित्र प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूरसह ठिकठिकाणच्या सहा कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात कोल्हापुरातील रा. शी. गोसावी कलानिकेतन, दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूट, कलामंदिर यांसह सांगलीचे कला महाविद्यालय, शिणोली येथील कला महाविद्यालय आणि इस्लामपूर कला महाविद्यालय यांचा समावेश आहे. येथील विद्यार्थ्यांच्या निवडक ६० चित्रकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्र प्रदर्शनात काही स्थानिक कलाकारांसह आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय आचरेकर, मिलींद मुळीक, संजय शेलार यांच्यासारख्या प्रथितयश चित्रकारांची चित्रेही पाहावयास मिळतात.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. देविकाराणी पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मानसिंग टाकळे आणि प्रा. हर्षवर्धन मणीपद्म यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दरम्यान, डॉ. जयसिंगराव पवार यांनीही या प्रदर्शनास भेट देऊन राजर्षी शाहूंविषयीच्या वैविध्यपूर्ण चित्रकृतींचे आणि चित्रकर्त्यांचेही कौतुक केले.

सदरचे प्रदर्शन १२ मे पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत पाहण्यास खुले राहणार आहे. तरी, कलाप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment