शिवाजी विद्यापीठाच्या रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळेतील साधनसुविधांची डॉ. अधिकराव जाधव यांच्याकडून माहिती घेताना मंत्री सतेज पाटील. . |
शिवाजी विद्यापीठाच्या रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळेतील साधनसुविधांची डॉ. अधिकराव जाधव यांच्याकडून माहिती घेताना मंत्री सतेज पाटील. शेजारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
कोल्हापूर, दि. १३
मे: रेशीम उत्पादन व
उद्योग क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी नजीकच्या काळात
पद्धतशीर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज
पाटील यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागाने जिल्हा नियोजन मंडळाच्या
सहकार्यातून उभारलेल्या ‘रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळे’चे लोकार्पण आज मंत्री श्री. पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, दैनिक पुढारीचे मुख्य
संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार प्रमुख
उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतीच्या बांधापासून रेशीम निर्मितीपर्यंत असा एक
अनोखा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला. त्यासाठी
शेतकऱ्यांची मानसिकता आणि प्रशिक्षण अशा दोन्ही अंगाने विकास करण्यासाठी खास
शेतकऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम आखून त्याअंतर्गत सातत्याने मार्गदर्शन केले.
त्यातून चांगली फलनिष्पत्ती दिसून आल्यानंतर अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत रेशीम
शेतीचे महत्त्व पोहोचविण्यासाठी आणि रेशीम उत्पादनाची व्याप्ती वाढविण्यासाठी फिरत्या
प्रयोगशाळेची संकल्पना पुढे आली. त्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून
आर्थिक पाठबळ देण्यात आले. या चाकावरील प्रयोगशाळेचे लोकार्पण करीत असताना अत्यंत
समाधान वाटते आहे. या पुढील काळातही विद्यापीठाच्या चांगल्या लोकाभिमुख उपक्रमांना
सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाची राहील, याची ग्वाहीही मंत्री श्री. पाटील
यांनी दिली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, फिरत्या प्रयोगशाळेची एक छोटी
संकल्पना आम्ही मंत्री सतेज पाटील यांच्यासमोर मांडली होती. मात्र, तिचे महत्त्व
लक्षात घेऊन त्यांनी व्यक्तीशः लक्ष घालून तिची पूर्तता केली आहे. त्यासाठी जिल्हा
नियोजन मंडळाच्या माध्यमातून अत्यंत सढळहस्ते मदत देण्याची भूमिका घेतली. या
उपक्रमाचा विद्यापीठ परिक्षेत्रातीलच नव्हे, तर अन्य रेशीम उत्पादन शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठीही निश्चितपणे लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू हवामान बदल केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील
पूरस्थितीच्या अनुषंगाने अंतरिम अहवाल तयार असून तो पुढील आठवड्यात सादर करण्यात
येईल, असेही कुलगुरूंनी सांगितले. त्याचप्रमाणे शैक्षणिक सकल प्रवेश प्रमाण
वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला पद्धतशीर सर्वेक्षणासाठी अथवा
कृती आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठ आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी
दिली.
यावेळी काही रेशीम उत्पादक शेतकरी आणि उद्योजक यांनी आपल्या यशकथा मंत्री
श्री. पाटील यांच्या कानी घातल्या. रेशीमशास्त्रज्ञ डॉ. अधिकराव जाधव यांनी
प्रास्ताविक केले, तर डॉ. माधुरी वाळवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तत्पूर्वी, मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळेचे नामफलक
अनावरण आणि फीत कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदयांनी आधुनिक
सुविधा आणि माहितीने सुसज्ज अशा या प्रयोगशाळेची फिरुन पाहणी केली. डॉ. अधिकराव
जाधव यांनी त्यांना तपशीलवार माहिती दिली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के.
कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, व्यवस्थापन
परिषद सदस्य डॉ. संजय जाधव, प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. ए.ए. देशमुख,
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे
संचालक डॉ. एम.एस. देशमुख यांच्यासह प्राणीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सायबर लढाईसाठी सज्ज होणे आवश्यक’
यावेळी मंत्री सतेज पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सायबर सुरक्षा केंद्राच्या
इमारतीचे उद्घाटन झाल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, सध्याच्या युगात रस्त्यावरील
लढाई कालबाह्य झाली असून आपण सारे सायबर लढाईच्या युगात वावरतो आहोत. त्यामुळे
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सुसज्जता आणि प्रशिक्षण या बाबींना अतिशय महत्त्व आले
आहे. डिजीटल सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाचे सायबर सुरक्षा केंद्र महत्त्वाची
भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील पूरस्थितीच्या अनुषंगाने विद्यापीठाने तयार केलेला अहवाल आणि नवीन
शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सकल प्रवेश प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीनेही बैठका
घेऊन चर्चा करण्याची आवश्यकताही त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे व्यक्त
केली.
वन्यरेशमापासून निर्मित शाल प्रदान
या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांना
वन्यरेशमापासून निर्मित शाल आणि सौ. प्रियांका जाधव यांनी रेशीमकोशांपासून बनविलेले
विशेष हार प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांना तुतीची रोपे, फळे आणि
तुतीपासून निर्मित चहापूडही देण्यात आली.
No comments:
Post a Comment