'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ संघाने भारतीय लोकवाद्यवृंद सादर केला. |
'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत त्रिवेणी लोकवाद्यवृंद सादर करताना पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा संघ. |
'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमांतर्गत सादर झालेल्या 'मैं. पंजाब बोलदा' या लघु-सांगितिकेमधील एक दृष्य. |
कोल्हापूर, दि. ३० मे:
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आज अक्षरशः पंजाबी लोकसंस्कृती
अवतरली आणि तिने कोल्हापूरवासीयांना नादावून सोडले तर अखेरच्या क्षणी अगदी गहिवरुनही
सोडले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह कोल्हापूरवासीयांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. कोविड-१९ साथीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर विद्यापीठाचे हे सर्वाधिक क्षमतेचे सभागृह प्रथमच प्रेक्षकांनी तुडुंब भरले.
निमित्त होते ‘महाराष्ट्र
के रंग, पंजाब के संग’
या विशेष सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमाचे. आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी
विद्यापीठाचा हिरकमहोत्सव या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ आणि फगवाडा (पंजाब)
येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला आहे.
आज या उपक्रमाच्या औपचारिक उद्घाटन समारंभानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणास सुरवात झाली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने 'राग यमन कल्याण'मधील विविध रचनांचे अत्यंत श्रवणीय सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरेल सुरवात केली. लव्हली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘नूर-ए-ईश्क’ हा कव्वाली कार्यक्रम सादर केला. प्रेमाची विविध रुपे दाखविणाऱ्या अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कव्वालांच्या आवाजाने अजरामर केलेल्या कव्वालींचे फ्युजन सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आणि कार्यक्रमात सुरवातीलाच अनोखा रंग भरला. त्यानंतर पारंपरिक पंजाबी लोकनृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कृषीसंस्कृतीशी असणारे या नृत्याचे जवळचे नाते त्यांनी याद्वारे उलगडून दाखविले.
त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लोकवाद्यवृंद सादर केला. यामध्ये महाराष्ट्र व पंजाबसह राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांतील विविध वाद्ये, नृत्ये आणि गीते असे तिहेरी सादरीकरण केले. या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर पंजाबच्या संघानेही त्रिवेणी लोकवाद्यवृंद सादर केला. यामध्ये पंजाबी गीते, वाद्ये आणि नृत्य असा तिहेरी संगम साधला आणि या पंजाबी संस्कृतीशी उपस्थित मनाने जोडले गेले. पंजाबच्या संघाने त्यानंतर ‘दिल दा मामला’ या प्रहसनपर लघुनाटिकेतून आजच्या वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकून उपस्थितांना हसवता हसवता अंतर्मुख केले. शिवाजी विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी आणि गणेश चिंचकर यांनी नक्कल अर्थात मिमिक्री सादर केली.
अखेरीस ‘मैं पंजाब बोलदा’ या लघु-सांगितिकेच्या माध्यमातून
पंजाबचे अत्यंत अप्रतिम आत्मवृत्त विद्यार्थ्यांनी सादर केले. पंजाबच्या या
कहाणीमध्ये त्याच्या निर्मितीपासून ते धर्मनिरपेक्ष भारताच्या जडणघडणीमधील त्याचे
योगदान, पंजाबने सोसलेल्या फाळणीच्या वेदना, १९८४च्या दंगलीच्या झळा आणि त्यातून
पुन्हा उभा राहिलेला पंजाब अशा अनेक बाबींचा समावेश होता. या सादरीकरणाने सर्व
उपस्थितांचे अंतःकरण हेलावून गेले.
मुंबई विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. नीलेश सावे आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे हितेंद्र सिंग यांच्या नेटक्या आणि माहितीपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रम रंजक झाला.
उद्या (दि. ३१ मे), या उपक्रमाच्या अंतिम दिवशीचे सादरीकरण होणार आहे. या
कार्यक्रमाचा कोल्हापूरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी कल्याण संचालक
डॉ. आर.व्ही. गुरव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment