Monday, 27 February 2017

बाबासाहेबांमुळेच सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार: डॉ. तापती बसू यांचे प्रतिपादन



शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ


Dr. Tapati Basu

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ जोमात असताना सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार प्राप्त करून देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारतीय समाजावर त्यांचे हे थोर उपकार आहेत, असे प्रतिपादन कोलकता विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रा.डॉ. तापती बसू यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागातर्फे आजपासून आयसीएसएसआर पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वृत्तपत्रीय दृष्टीकोन आणि त्याचे वर्तमानकालीन प्रयोजन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. बसू बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर काशी बनारस विश्वविद्यालयाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. राम मोहन पाठक, शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. वीरबाला अग्रवाल, आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. गिरीजा शंकर, पुणे विद्यापीठाचे माजी वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ. किरण ठाकूर, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. विजय धारूरकर, म्हैसूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ.बी.पी. महेशचंद्र गुरू, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. सुरेश पुरी, खुल्ताबाद येथील चिस्तीया महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणी पटेल उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये सांगताना डॉ. बसू म्हणाल्या, बाबासाहेबांच्या प्रत्येक वृत्तपत्राच्या नावातच त्यांच्या मनाशी असलेले हेतू सामोरे येतात आणि त्याचबरोबर देशाच्या सामाजिक न्यायाची होत जाणारी किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी प्रगतीही दृष्टोत्पत्तीस येते. पहिला मूकनायक हा दलित, शोषित, पिडित जनतेचा अर्थात ज्या समाजाला स्वतःचा आवाज नव्हता, अशा समाजाला स्वतःचा आवाज मिळवून देणारा हा मूकनायक होता. बहिष्कृत भारतहा भारतामधील एक षष्टमांश बहिष्कृत जनतेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. त्यानंतर जनतामधून भारतीय जनतेमध्ये एकता व एकात्मतेची जाणीव पेरण्याचा प्रयत्न होता, तर अखेरच्या प्रबुद्ध भारतमधून त्यांचे प्रज्ञाशील भारताचे स्वप्न अधोरेखित होते. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही अशा प्रकारे देशाच्या सामाजिक न्याय प्रस्थापनेमधील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे.
त्या म्हणाल्या, भारतातील पत्रकारितेचा इतिहास म्हणजे काँग्रेसने चालविलेल्या वृत्तपत्रांचा इतिहास आहे. या काँग्रेसवादी वृत्तपत्रांचा विरोध पत्करून बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्याचा संघर्ष अथकपणे चालविला. टिळक हयात असताना केसरी वृत्तपत्राने बाबासाहेबांनी पैसे देण्याची तयारी दाखवूनही मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला. दलित वृत्तपत्राच्या जाहिरातीला सुद्धा अस्पृश्यतेची वागणूक देण्याच्या काळात बाबासाहेबांनी ज्या प्रखर ध्येयनिष्ठेने आपली पत्रकारिता चालविली, तिला देशाच्या इतिहासात तोड नाही. बंगाली पत्रकारिता बाबासाहेबांच्या पत्रकारितेची सदैव प्रशंसक राहिली असल्याचेही त्यांनी या प्रसंगी नमूद केले.
मराठी पत्रकारिता ही हिंदी पत्रकारितेसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगून यावेळी डॉ. राम मोहन पाठक म्हणाले, बंगाली व मराठी पत्रकारितेचे हिंदी पत्रकारितेमध्ये सामाजिक प्रेरणा निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. यामध्ये बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे योगदान मोलाचे आहे. बाबासाहेब भाषिक पत्रकारितेचे महत्त्व जाणून होते. समाजातल्या अशिक्षित, दलित, शोषित जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक मराठी पत्रकारिता केली. त्यांच्या या पत्रकारितेनेच देशातील दलित पत्रकारितेला कृती कार्यक्रम देण्याचे काम केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. राम मोहन पाठक, डॉ. वीरबाला अग्रवाल, डॉ. किरण ठाकूर आणि डॉ. विजय धारूरकर यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ.ओंकार काकडे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. वासंती रासम, डॉ. ज.रा. दाभोळे आदी उपस्थित होते.

Friday, 24 February 2017

शिवाजी विद्यापीठाचा ५३वा दीक्षान्त समारंभ उत्साहात

शिक्षण व विकासाची सांगडच देशास प्रगतीपोषक: डॉ. अनिल काकोडकर


Dr. Anil Kakodkar


Granth Dindi

Granth Dindi

Granth Dindi

Dr. Anil Kakodkar
कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: नवसंशोधन, शैक्षणिक संस्थांमध्ये सहसंबंधांची प्रस्थापना आणि विकासाच्या संधींचा अव्याहत शोध या त्रिसूत्रीच्या बळावर देशाचा शैक्षणिक व सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणणे शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे केले. शिक्षण आणि विकास यांचा अन्योन्यसंबंध आहे. त्यांची योग्य सांगड घातली गेल्यास ते प्रगतीपोषक ठरते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
भारतीय उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील संधी आणि आव्हानांचा आपल्या भाषणात सविस्तर वेध घेताना डॉ. काकोडकर म्हणाले, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाशक्ती होण्याची क्षमता भारताकडे आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तथापि, अद्यापही तंत्रज्ञानासाठी आपण अन्य देशांवर अवलंबून आहोत. हे अवलंबित्व कमी करीत जाणे आवश्यक आहे. भारतात नवसंशोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संशोधनाचे तंत्रज्ञानात रुपांतर केले जाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यासाठी संधींचे मोठे अवकाश आपल्यासाठी खुले आहे. देशातील शहरी व ग्रामीण भागातील दरी सांधण्यासाठीही संशोधन व विकासाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायला हवा. अनेक सामाजिक समस्यांची उकल सुद्धा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येणे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कृषी आणि ग्रामीण विकासाचा दर वाढविण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. काकोडकर म्हणाले, सन २०११च्या जनगणनेनुसार, १२१ कोटी भारतीयांपैकी सुमारे ८३.३ कोटी म्हणजे ६८.८ टक्के भारतीय ग्रामीण भागात राहतात. भारतीय अर्थव्यवस्थेला आपल्या उत्पादकतेच्या बळावर चालना देणाऱ्या ग्रामीण भागातील या घटकांचे उत्पन्न शहरी भागाच्या निम्मे आहे. सन २०११च्या सामाजिक-आर्थिक व जातिगणनेनुसार, सर्वसाधारण शारिरीक श्रम (५१ टक्के) व उत्पादकता (३० टक्के) या घटकांच्या बळावर ग्रामीण भागाचे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. अवघ्या ९.७ टक्के इतक्या ग्रामीण कुटुंबांना नियमित वेतन मिळते, तर सुमारे ५६ टक्के ग्रामीण नागरिक भूमीहीन आहेत.  त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीचा संघर्ष मोठा आहे. या ग्रामीण भारताचे कृषी क्षेत्राच्या पलिकडे जाऊन उद्योग, उत्पादन व सेवा क्षेत्रांमध्ये समावेशन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी ग्रामीण विकासाचा सुधारित प्रारुप आराखडा निर्माण करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या कामी उच्च शिक्षण क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ग्रामीण युवकांत क्षमता संवर्धनाच्या जाणीवा पेरुन त्यांना कार्यप्रवण करण्याची जबाबदारी या क्षेत्राने घ्यावयास हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण व शहरी भागातील संधींच्या अवकाशामधील दरी कमी करण्याची गरज व्यक्त करून दुर्गम आणि ग्रामीण भागाच्या गरजा भागविण्यासाठी अल्प खर्चात अत्युच्य क्षमतेचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत आणि एकूणच विकसनशील राष्ट्रांनी प्रयत्न करण्याची गरजही डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली.
भारतीय उच्चशिक्षण पद्धती समाजाचा विकास व वृद्धी प्रक्रियेसाठी सक्षम असल्याचे सांगून डॉ. काकोडकर म्हणाले, या प्रक्रियेमध्ये आपण केवळ बहुस्तरीय अध्ययन प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. यामध्ये विविध विषयांतील ज्ञानधारकांसाठी संशोधनाला पूरक व पोषक वातावरण निर्मिती करणे, देशातील सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक गतिविधींना चालना देण्यासाठी दर्जेदार कौशल्य निर्मिती करणे आणि मूलभूत मानवी मूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी समाजात पोषक वातावरण निर्माण करणे या बाबींचा समावेश होतो. मात्र, सध्याच्या अध्यापन प्रक्रियेत नेमक्या या महत्त्वाच्या बाबींचाच अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारतात शालेय जीवनापासूनच संशोधनाची गोडी विद्यार्थ्यांत निर्माण करण्याची गरज असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधकीय व शैक्षणिक सहसंबंध निर्माण करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण व विकेंद्रीकरण करण्याची नितांत गरज असल्याचे सांगून डॉ. काकोडकर म्हणाले, अब्जावधी डॉलर्सच्या स्टार्ट-अप कंपन्या स्थापन करण्यात स्थलांतरित भारतीय जागतिक स्तरावर आघाडीवर आहेत. उच्चशिक्षणाच्या बाबतीतही हे साधणे शक्य आहे. संशोधन आणि नवनिर्मितीला पोषक वातावरण तयार करणे हे आपल्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग बनायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत युवकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून डॉ. काकोडकर म्हणाले, उच्चशिक्षणाची बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी युवकांनी तत्पर असले पाहिजे. नवनिर्मिती, नवसंशोधन व नवतंत्रज्ञान यांचा वापर करण्याचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. तरुणांच्या संघटित प्रयत्नांतूनच जगाचा विकास होणार आहे. शिक्षणाच्या निरंतर प्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षण संस्था, उद्योग व समाज यांना एका समान धाग्यात बांधून ज्ञानविस्तार करण्याचा निश्चय करावा. युवकांनी रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माते बनावे, असा संदेशही त्यांनी या प्रसंगी दिला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये विद्यापीठाच्या गत वर्षभरातील प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विविध आघाड्यांवर विद्यापीठाने बजावलेल्या सरस कामगिरीचा वेध त्यांनी यावेळी घेतला. आपल्या पदवीसह ज्ञानाच्या व स्पर्धेच्या नव्या युगात प्रवेश करीत असताना स्नातकांनी नवकौशल्ये व तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगतीची शिखरे काबीज करावीत, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठात कै. ग.गो. जाधव अध्यासन स्थापन करण्यात आल्याची घोषणा कुलगुरूंनी यावेळी केली. पत्रकारिता विभागात सुरू होणारे हे राज्यातील एकमेव अध्यासन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सोनाली अजय बेकनाळकर या विद्यार्थिनीस राष्ट्रपतींचे सुवर्णपदक तर स्नेहल शिवाजी चव्हाण या विद्यार्थिनीस कुलपतींचे मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी एकूण ८७ विद्यार्थ्यांना १०० पारितोषिके प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ४२ स्नातकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्या.
सुरवातीला विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षान्त मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत विविध विद्याशाखा समन्वयक यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापरिषद सदस्य व स्नातक सहभागी झाले. मेजर रुपा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली व मिरवणुकीस सन्मानपूर्वक दीक्षान्त मंडपापर्यंत नेले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पदव्यांचे वाचन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, नंदिनी पाटील व आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सुरवात तर वंदे मातरम्ने समारोप झाला.
दरम्यान, आज सकाळी कमला महाविद्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. जनता बझार-राजारामपुरी-आईचा पुतळा-सायबर चौक या मार्गे ग्रंथदिंडी विद्यापीठ प्रांगणात दाखल झाली. लोककला केंद्र येथे दिंडीचे विसर्जन झाले. तत्पूर्वी, मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर पथनाट्ये सादर केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Thursday, 23 February 2017

शिवाजी विद्यापीठ ५३वा दीक्षान्त समारंभ:

तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवास उत्साहात प्रारंभ












कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या दीक्षान्त समारंभानिमित्त तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवास आज सकाळपासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते डॉ. एम.एस. रंगनाथन व बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले.
अनेक नामवंत प्रकाशकांचा सहभाग असलेला हा ग्रंथ महोत्सव शिक्षक, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून त्याचा दीक्षान्त समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रसंगी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे दरवर्षी दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ प्रांगणात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी विविध दर्जेदार प्रकाशकांबरोबरच वाचकांचाही याला प्रतिसाद लाभत असतो. यंदाही सुमारे ५० प्रकाशक ग्रंथ महोत्सवात सहभागी झाले असून दहा उपाहारगृहांचे स्टॉल लावण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी या प्रसंगी दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे व ग्रंथपाल डॉ. खोत यांच्यासह बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. ए.बी. गुरव यांनी सर्व स्टॉलना भेटी दिल्या व सहभागी प्रकाशक, उपाहारगृह चालक यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. यावेळी उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहायक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर यांच्यासह ग्रंथालयातील सर्व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा ग्रंथ महोत्सव दि. २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

शाहीरांनी मांडला प्रबोधनाचा जागर
या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने शाहीर आझाद नायकवडी यांचा लेणं महाराष्ट्राचं!’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर नायकवडी यांनी आपल्या खड्या आवाजात महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविले. पोवाडा सादर करीत असतानाच विद्यार्थ्यांना देशाप्रती, समाजाप्रती त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत होते. या त्यांच्या प्रबोधनाच्या जागराचे सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय करून देणारा हा कार्यक्रम सुमारे दीड तास रंगला. संग्राम भालकर यांच्या टीमने या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीची दर्शन घडविणारी नृत्ये सादर केली.