Monday, 27 February 2017

बाबासाहेबांमुळेच सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार: डॉ. तापती बसू यांचे प्रतिपादन



शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ


Dr. Tapati Basu

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ जोमात असताना सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार प्राप्त करून देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारतीय समाजावर त्यांचे हे थोर उपकार आहेत, असे प्रतिपादन कोलकता विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रा.डॉ. तापती बसू यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागातर्फे आजपासून आयसीएसएसआर पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वृत्तपत्रीय दृष्टीकोन आणि त्याचे वर्तमानकालीन प्रयोजन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. बसू बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर काशी बनारस विश्वविद्यालयाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. राम मोहन पाठक, शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. वीरबाला अग्रवाल, आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. गिरीजा शंकर, पुणे विद्यापीठाचे माजी वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ. किरण ठाकूर, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. विजय धारूरकर, म्हैसूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ.बी.पी. महेशचंद्र गुरू, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. सुरेश पुरी, खुल्ताबाद येथील चिस्तीया महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणी पटेल उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये सांगताना डॉ. बसू म्हणाल्या, बाबासाहेबांच्या प्रत्येक वृत्तपत्राच्या नावातच त्यांच्या मनाशी असलेले हेतू सामोरे येतात आणि त्याचबरोबर देशाच्या सामाजिक न्यायाची होत जाणारी किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी प्रगतीही दृष्टोत्पत्तीस येते. पहिला मूकनायक हा दलित, शोषित, पिडित जनतेचा अर्थात ज्या समाजाला स्वतःचा आवाज नव्हता, अशा समाजाला स्वतःचा आवाज मिळवून देणारा हा मूकनायक होता. बहिष्कृत भारतहा भारतामधील एक षष्टमांश बहिष्कृत जनतेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. त्यानंतर जनतामधून भारतीय जनतेमध्ये एकता व एकात्मतेची जाणीव पेरण्याचा प्रयत्न होता, तर अखेरच्या प्रबुद्ध भारतमधून त्यांचे प्रज्ञाशील भारताचे स्वप्न अधोरेखित होते. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही अशा प्रकारे देशाच्या सामाजिक न्याय प्रस्थापनेमधील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे.
त्या म्हणाल्या, भारतातील पत्रकारितेचा इतिहास म्हणजे काँग्रेसने चालविलेल्या वृत्तपत्रांचा इतिहास आहे. या काँग्रेसवादी वृत्तपत्रांचा विरोध पत्करून बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्याचा संघर्ष अथकपणे चालविला. टिळक हयात असताना केसरी वृत्तपत्राने बाबासाहेबांनी पैसे देण्याची तयारी दाखवूनही मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला. दलित वृत्तपत्राच्या जाहिरातीला सुद्धा अस्पृश्यतेची वागणूक देण्याच्या काळात बाबासाहेबांनी ज्या प्रखर ध्येयनिष्ठेने आपली पत्रकारिता चालविली, तिला देशाच्या इतिहासात तोड नाही. बंगाली पत्रकारिता बाबासाहेबांच्या पत्रकारितेची सदैव प्रशंसक राहिली असल्याचेही त्यांनी या प्रसंगी नमूद केले.
मराठी पत्रकारिता ही हिंदी पत्रकारितेसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगून यावेळी डॉ. राम मोहन पाठक म्हणाले, बंगाली व मराठी पत्रकारितेचे हिंदी पत्रकारितेमध्ये सामाजिक प्रेरणा निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. यामध्ये बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे योगदान मोलाचे आहे. बाबासाहेब भाषिक पत्रकारितेचे महत्त्व जाणून होते. समाजातल्या अशिक्षित, दलित, शोषित जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक मराठी पत्रकारिता केली. त्यांच्या या पत्रकारितेनेच देशातील दलित पत्रकारितेला कृती कार्यक्रम देण्याचे काम केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. राम मोहन पाठक, डॉ. वीरबाला अग्रवाल, डॉ. किरण ठाकूर आणि डॉ. विजय धारूरकर यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ.ओंकार काकडे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. वासंती रासम, डॉ. ज.रा. दाभोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment