Monday, 13 February 2017

शास्त्रीय नृत्य, प्रहसन लघुनाटिकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद

३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७):
Skit


Skit

Skit

Classical Dance

Classical Dance

Classical Dance

Classical Dance

Classical Dance

Rangoli

Rangoli

Rangoli

Rangoli

Spot Painting

Spot Painting

Spot Painting

Spot Painting

Spot Painting

Spot Photography

कोल्हापूर, दि. १३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात स्पर्धेच्या अंतिम दिवशी आज सकाळच्या सत्रात शास्त्रीय नृत्य आणि प्रहसनपर लघुनाटिकांनी मोठीच बहार आणली. रसिकांचा दोन्ही स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद लाभला. देशभरातल्या रंगावली संस्कृतीचेही दर्शन या निमित्ताने घडून आले.
आज सकाळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धांना सुरवात झाली. स्पर्धेत नागपूर, केरळ, तिरुपती, मुंबई, वनस्थळी, पटियाळा, मणिपूर, आसाम, छत्तीसगढ, हरियाणा, भोपाळ, पंजाब, पुणे, वाराणसी येथील विद्यापीठातील स्पर्धकांनी शास्त्रीय नृत्याच्या विविध कलाप्रकारांचे शास्त्रोक्त सादरीकरण करून रसिकांची मने जिंकून घेतली. भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कथ्थक, कथकली आदी शास्त्रीय नृत्यप्रकारांचे या विविध प्रांतातील विद्यार्थ्यांनी मनोहारी दर्शन घडविले. विद्यार्थी कसून तयारी करुन स्पर्धेत उतरल्याचे त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून जाणवत होते. भारताच्या एकात्मतेची नाळ ही अशा विविधतेतील एकजिनसीपणात टिकून असल्याची प्रचिती या निमित्ताने आली.
वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये सकाळपासून स्कीट अर्थात प्रहसनपर लघुनाटिकांच्या स्पर्धांना सुरवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या लघुनाट्यांना उत्तम वेशभूषा व पूरक नेपथ्याची जोड देत त्यांच्या एकूणच प्रगल्भ सामाजिक व राजकीय जाणिवांचे दर्शन उपस्थितांना घडविले. हसत-हसवत, कधी एखाद्या व्यंगावर थेट बोट ठेवत तर कधी तिरकस कोपरखळ्या मारत आपला संदेश लोकांच्या गळी उतरविण्याचे विद्यार्थ्यांचे कौशल्य या स्पर्धेतून प्रत्ययास आले. यामध्ये रांची, केरळ, औरंगाबाद, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यांतील विद्यापीठांनी बहाने, व्हेजिटेबल, कब होगी सुबह, दो जासूस, हम नही सुधरेंगे, इन्सान ही इन्सान को मारता है, स्वर्ग-नरक आदी लघुनाट्यांतून नोटाबंदी, संविधानाचे महत्त्व, पैसा व प्रेम यांतील संघर्ष, लोकशाहीचे महत्त्व आदींसह ताज्या सामाजिक-राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
संगीत अधिविभागात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रचलित रांगोळीमधीलच विविधांगी आविष्कार पाहावयास मिळाले. विद्यार्थ्यांनी या सूक्ष्म रजःकणांमधून अद्भुत असे त्रिमितीय आकार साकारलेले पाहताना थक्क व्हायला होत होते. जमिनीवर अंथरलेल्या छोट्या छोट्या दुलयांप्रमाणे त्यांचे रंगरुप भासत होते. पंजाबमधील पारंपरिक रांगोळी, राजस्थानची गेरु-खडियाची पारंपरिक रांगोळी अशा चित्ताकर्षक रांगोळ्या तेरा सहभागी स्पर्धकांनी साकारल्या होत्या.
मानव्यविद्या सभागृहात आज सकाळी स्पॉट पेंटिंग व स्पॉट फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही स्पर्धांत प्रत्येकी पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पॉट पेंटिंग स्पर्धेसाठी आपल्या आसपासचे सर्वसाधारण जीवन असा विषय देण्यात आला होता. विषय सोपा वाटत असला तरी स्पर्धकांच्या विचारशक्तीची परीक्षा पाहणारा ठरला. तथापि, या विषयावरील एकापेक्षा एक सुंदर पेंटिंग विद्यार्थ्यांनी साकारली.

No comments:

Post a Comment