३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)
शिवोत्सवात गर्दीचा
कळसाध्याय; उद्या समारोप समारंभ
कोल्हापूर, दि. १३
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अखेरीस आज सायंकाळी लोकनृत्याच्या स्पर्धेत देशभरातील
स्पर्धकांनी दर्शकांना वैविध्यपूर्ण व संपन्न भारतीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.
गेल्या तीन दिवसांत
उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या महोत्सवात गर्दीचा कळसाध्याय लोकनृत्याच्या
स्पर्धेने पाहिला. केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर कोल्हापुरातील अनेक रसिक
प्रेक्षक या लोकनृत्यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबियांसह उपस्थित राहिले. विद्यापीठाच्या
लोककला केंद्रात पाच हजारांहून अधिक जणांचा समुदाय या निमित्ताने जमला होता. जागा मिळेल
तिथे उभे राहून महोत्सवात सादर होणाऱ्या लोकनृत्य व आदिवासी नृत्यांचा आबालवृद्ध
आस्वाद घेत होते. सादरकर्त्या संघांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद व प्रोत्साहन
देत होते.
या लोकनृत्य व
आदिवासी नृत्याच्या स्पर्धेत रायपूर, म्हैसूर, थिरुअनंतरपुरम्, मछलीपट्टणम्,
गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, मणिपूर, नागपूर, चंदीगढ, ग्वाल्हेर, जालंधर,
राजस्थान, हजारीबाग-झारखंड आदी ठिकाणच्या विद्यापीठांनी सहभाग घेतला. अत्यंत दमदारपणे
त्यांनी आपापल्या राज्यांच्या लोकसंस्कृतीचे नृत्याच्या माध्यमातून दर्शन घडविले. पारंपरिक
तालवाद्ये, चर्मवाद्यांचा वापर हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. सर्पम थुल्लाल, दांडिया
रास, डप्पू नृत्य, लांगुरिया, भवाई, रायबेन्शे, हरियाणवी, डोल्लू कुनिथा, बरसाती
नृत्य, दक्षिण गुजरातच्या डांग व कपरडा भागातील आदिवासी नृत्य, मणिपुरी शिम लाम
नृत्य, राजस्थानचे मंजिरा नृत्य, कोळी नृत्य आणि पंजाबी भांगडा आदी लोकनृत्य
प्रकारांचा आस्वाद स्पर्धकांनी उपस्थितांना दिला.
तत्पूर्वी,
वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या मिमिक्री स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी
विविध पशुपक्षी, वाहने, निसर्ग, अभिनेते, राजकीय नेते व अन्य मान्यवरांच्या
आवाजाच्या नकला केल्या.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या समारोप
शिवाजी
विद्यापीठाच्या परिसरात दि. १० फेब्रुवारीपासून रंगलेल्या ‘शिवोत्सव-२०१७’चा समारोप समारंभ उद्या,
मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कोल्हापूरचे
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर.
मोरे असतील. गेल्या चार दिवसांत झालेल्या स्पर्धांचे अंतिम निकाल यावेळी जाहीर
करण्यात येतील आणि विजेत्यांना पारितषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात
येणार आहे.
No comments:
Post a Comment