Saturday, 18 February 2017

ऑक्सफर्डच्या ज्ञानपंढरीत जाऊन ज्ञानमय झालो:

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची प्रांजळ भावना


ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. लुईस रिचर्ड्सन यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. मार्क मलोनी यांच्या संशोधक टीमसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


मूळचे हंगेरी येथील व ऑक्सफर्डच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. इम्रे बांगा यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: ऑक्सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके चालू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत एक महिना राहून मी ज्ञानमय झालो, अशी प्रांजळ भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे हे युरोपियन युनियनच्या नमस्ते प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक महिना संशोधन करून नुकतेच परतले. त्यांच्या ऑक्सफर्ड येथील अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळावा, यासाठी विद्यापीठाच्या कॉलोक्वियममध्ये कुलगुरूंचे विशेष व्याख्यान राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरसह शिवाजी विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर करण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिंदे यांचा विद्यापीठ परिवारातर्फे शाल, श्रीफळ व छत्रपती शिवरायांचा पुतळा देऊन बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुमारे तीन तास उपस्थितांना खिळवून ठेवणारे अभ्यासपूर्ण व विविध निरीक्षणांनी परिपूर्ण असे भाषण कुलगुरूंनी या प्रसंगी केले. ते म्हणाले, एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात ऑक्सफर्डमधील कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे. संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे की, त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५०हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार निर्माण झाले. ऑक्सफर्डमध्ये आणि एकूणच इंग्लंडमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो, त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी मी असतो. या मीपणापासून मुक्ती मिळविण्याची शिकवण ऑक्सफर्डने दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरूंनी ऑक्सफर्डच्या स्थापनेपासूनच्या म्हणजे साधारणतः सन १०९६पासूनच्या तेथील विविध शैक्षणिक-सांस्कृतिक प्रथा-परंपरांची साद्यंत माहिती दिली. या ज्ञानपंढरीला दरवर्षी जगभरातील ७० लाख लोक भेट देतात, ते केवळ या शैक्षणिक पंढरीच्या दर्शनासाठी. २२ हजार विद्यार्थी, १३ हजार कर्मचारी, १७,००० रोजगार, ४६०० व्यवसाय आदींच्या माध्यमातून अब्जावधी पौडांची उलाढाल या विद्यापीठात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इथल्या समृद्ध ग्रंथालयांनी आपण सर्वाधिक प्रभावित झाल्याचे सांगताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, दीड लाख लोकवस्तीच्या ऑक्सफर्ड गावात सुमारे १२५ ग्रंथालये आहेत. जगातले सर्वात मोठे ग्रंथभांडार येथे एकवटले आहे. जमिनीच्या वर जितकी इमारत दिसते, तितकेच ग्रंथागार जमिनीच्या खालीही असून भूमिगतरित्या ही ग्रंथालये एकमेकांशी जोडलेली आहेत. येथील मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे एक कोटी वीस लाख ग्रंथ असून सन १६२०पासून प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. इतक्या प्रचंड संग्रहातील कोणतेही पुस्तक अवघ्या तीन मिनिटांत वाचकाला उपलब्ध करण्यात येते. या भेटीदरम्यान आपण केवळ २२ ग्रंथालयांना भेट देऊ शकलो, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू पदावरील व्यक्तीने संशोधनासाठी म्हणून ऑक्सफर्डला येण्याचा भारताच्या तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग असल्याची माहिती ऑक्सफर्डच्या कुलगुरू प्रा. लुईस रिचर्ड्सन यांनी आपल्याला दिल्याचे कुलगुरूंनी सांगितले. याचे श्रेय या स्कॉलरशीपचे महत्त्व ओळखून दौऱ्यास अनुमती देणारे कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांच्यासह युरोपियन युनियन, राज्य शासन तसेच परराष्ट्र मंत्रालयाचेही कुलगुरूंनी आभार मानले.
सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑक्सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची रंजक माहिती दिली. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीमती नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment