‘शिवोत्सव-२०१७’चे शिवाजी विद्यापीठात जल्लोषात उद्घाटन; देशभरातील ७७ विद्यापीठांचा सहभाग
कोल्हापूर, दि. १०
फेब्रुवारी: मनुष्याला रागावण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, हसत राहण्यासाठी मात्र
अजिबात कष्ट पडत नाहीत. त्यामुळे युवकांनी यश आणि अपयश अशा दोन्ही परिस्थितीत हसत
राहायला शिकले पाहिजे, असा बहुमोल सल्ला प्रतिभावंत अभिनेते सचिन खेडेकर यांनी आज
येथे दिला.
शिवाजी विद्यापीठात
आज सायंकाळी ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ युवा महोत्सवाचे (शिवोत्सव-२०१७) मोठ्या
जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते संबोधित
करीत होते. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर भारतीय
विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन प्रमुख उपस्थित होते. प्रभारी
कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. या महोत्सवात देशभरातील ७७
विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत.
प्रत्येकाच्या
आयुष्यातील गुरूचे स्थान अधोरेखित करताना सचिन खेडेकर म्हणाले, आज अनेक समाजमाध्यमे
युवकांना सहज उपलब्ध आहेत. त्यावरुन अनेकविध गोष्टींची माहिती त्याला होत असते.
याठिकाणी कोणतीही कला, विषय शिकता येऊ शकतो, तिचा सरावही करता येऊ शकतो. मात्र
त्या माहितीलाच ज्ञान समजण्याची चूक आपल्या हातून होत असते. ही उसनवारी अत्यंत
चुकीची व घातक ठरू शकते. म्हणूनच माहितीचे ज्ञानात रुपांतर करून विद्यार्थ्याला
प्रज्ञावान बनविणाऱ्या गुरूचे आपल्या आयुष्यातील स्थान आजच्या या समाजमाध्यमांच्या
युगातही अबाधित आहे.
आपल्या कारकीर्दीची
सुरवातही आंतर-विद्यापीठीय महोत्सवातील वादविवाद स्पर्धेपासून झाली असल्याची आठवण
सांगून श्री. खेडेकर म्हणाले, केवळ त्या विद्यापीठीय स्पर्धेमुळेच आज मी अभिनेता
म्हणून माझे स्थान निर्माण करू शकलो आहे. आज त्या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली
असली तरी त्या स्पर्धेने दिलेला जोष मात्र आजही कायम आहे.
यावेळी श्रीमंत शाहू
छत्रपती महाराज म्हणाले, आजकाल संस्कृतीरक्षक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आपली
संस्कृती इतरांवर लादण्यापेक्षा एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्याची शिकवण अशा
महोत्सवांतून मिळत असते. ती शिकवण विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या अंगी बाणवली
तरच या देशातील विविधतेतील एकता कायम राहील.
डॉ. डेव्हीड सॅम्पसन
म्हणाले, तारुण्य हे सूर्यप्रकाशासारखे लख्ख असते. तारुण्यातच सृजनशीलतेची क्षमता
व प्रमाण सर्वाधिक असते. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला पाहिजे. मानवी व
राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी पूरक असा व्यक्तीमत्त्व विकास युवकांनी
अशा महोत्सवांतून साधला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात
प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गौरवशाली वाटचालीचा
आढावा घेतला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करून
घेण्यासाठी आणि भावी आयुष्यातील वाटचालीच्या दृष्टीनेही अशा महोत्सवांसारख्या
व्यासपीठांचा वापर केला पाहिजे. युवक ही राष्ट्राची शक्ती असून राष्ट्र सक्षम
होण्यासाठी सक्षम युवा शक्तीची नितांत गरज असते, ही बाब लक्षात घेऊन युवकांनी आपले
योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास
पाणी घालून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वृत्तपत्रविद्या व
संवादशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘माध्यमविद्या’ या युवा महोत्सव
विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव
यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. सुप्रिया
पाटील व सुषमा कोंडुस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी व्यासपीठावर
ए.आय.यू.चे निरीक्षक प्रा. एस.के. शर्मा, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.
पी.टी. गायकवाड यांच्यासह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सौ. अनिता
शिंदे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच
महोत्सवासाठी आलेल्या ७७ विद्यापीठांच्या संघातील सदस्य, संघ व्यवस्थापक आदी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर
यजमान शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या समृद्ध
सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
त्यालाही उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला.
उद्याचे कार्यक्रम
उद्या शनिवार, दि.
११ रोजी सकाळी ९.३० वाजता विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणास विद्यापीठाच्या पाच
रंगमंचांवर प्रारंभ होईल. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात सकाळी
९.३० वाजता क्विझ (लेखी) होईल. त्यानंतर तेथेच दुपारी १ वाजता वक्तृत्व स्पर्धा
होतील. लोककला केंद्रात सकाळी १० वाजता वेस्टर्न सोलो गायन प्रकाराची स्पर्धा
होईल. त्यानंतर तेथेच १ वाजता वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धा होईल आणि चार वाजता
लोकसंगीत ऑर्केस्ट्रा स्पर्धा होईल. भाषा भवन सभागृहात सकाळी १० वाजता एकांकिका
स्पर्धा होतील. मानव्यविद्या सभागृहात सकाळी ९.३० वाजता पोस्टर मेकिंग स्पर्धा तर
एक वाजता कोलाज स्पर्धा होतील. तर संगीत अधिविभाग सभागृहात क्लासिकल
इन्स्ट्रुमेंटल सोलो (नॉन-पर्क्युशन) प्रकारातील स्पर्धा सकाळी ९.३० वाजता तर
क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल सोलो (पर्क्युशन) प्रकारातील स्पर्धा दुपारी दोन वाजता
होतील.
No comments:
Post a Comment