Friday, 10 February 2017

'शिवोत्सव-२०१७'च्या शोभायात्रेत तरुणाईकडून जल्लोषात भारतीय संस्कृतीचे दर्शन



३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)-











कोल्हापूरच्या परंपरांची माहिती देणारा शिवाजी विद्यापीठाचा चित्ररथ ठरला आकर्षण

कोल्हापूर, दि. १० फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आजपासून चार दिवस रंगणाऱ्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ युवा महोत्सवाची तथा शिवोत्सव-२०१७ची सुरवात आज देशभरातील तरुणाईच्या जल्लोषी शोभायात्रेने झाली. रोकडविरहित अर्थव्यवहार: भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण या मुख्य विषयाभोवती गुंफलेल्या या शोभायात्रेत देशभरातून आलेल्या विविध विद्यापीठांच्या संघांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. देशभरातील राज्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने कोल्हापूरकरांना घडले. कोल्हापूरच्या विविध परंपरांसह शिवाजी विद्यापीठाची माहिती देणारा चित्ररथ या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून शोभायात्रेस सुरवात होण्यापूर्वी इमारतीसमोर कोल्हापूर येथील खंडोबा वेताळच्या सुहासराजे ठोंबरे मर्दानी खेळ आखाड्याच्या कलाकारांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. त्याचप्रमाणे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातर्फे एड्सविषयक जगजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून शोभायात्रेस प्रारंभ झाला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, एआययूचे सहसचिव डॉ. सॅम्पसन डेव्हीड, एआययूचे निरीक्षक प्रा. एस.के. शर्मा, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून शोभायात्रा सुरू होऊन दूरशिक्षण केंद्र, सायबर महाविद्यालय, आईचा पुतळा, रेड्याची टक्कर, मालती अपार्टमेंट, विद्यापीठाचे आठ नंबर गेट ते लोककला केंद्र असा शोभायात्रेचा मार्ग होता. 

शोभायात्रेच्या अग्रस्थानी विद्यापीठाचा ध्वज धारण करणारा अश्व आणि त्याच्या पाठोपाठ झांजपथक होते. त्यामागे शिवाजी विद्यापीठाचा चित्ररथ होता. ऑडिओ-व्हिज्युअल स्वरुपातील या चित्ररथामध्ये कोल्हापूरच्या वैविध्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफीतींसह शिवाजी विद्यापीठातील जलवैभव तसेच पुष्प व पक्षीवैभवाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफीती प्रदर्शित केल्या जात होत्या.  
गतवर्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील विजेत्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संघाला शोभायात्रेच्या अग्रस्थानाचा मान देण्यात आला. त्यापाठोपाठ अन्य विद्यापीठांचे संघ आणि सर्वात शेवटी यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ होता. त्या मागोमाग सीपीआरचा तसेच शिवाजी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचा चमू आणि त्यांचा एड्स जगजागृतीविषयक चित्ररथ आदींचा समावेश होता.
दुपारची वेळ असूनही शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. देशभरातून आलेल्या युवा कलाकारांच्या संघाकडे कुतुहलाने पाहून कौतुकाची दाद देत होते. या शोभायात्रेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्या संघांमधूनही तीन विजेत्या संघांची निवड करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment