श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेते सचिन
खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर, दि. ८
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात येत्या
शुक्रवार (दि. १०) पासून ३२व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा
महोत्सवास (शिवोत्सव-२०१७) प्रारंभ होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन श्रीमंत शाहू
छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर आणि
भारतीय विद्यापीठ महासंघाचे (ए.आय.यू.) सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांची प्रमुख
उपस्थिती असेल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी आज
येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. मोरे म्हणाले,
महोत्सवाच्या समारोप समारंभास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी प्रमुख
पाहुणे असतील, तर प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
ए.आय.यू.कडून निरीक्षक म्हणून हिंदू बनारस विश्वविद्यालयाचे प्रा. एस.के. शर्मा
उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन व समारोप समारंभ विद्यापीठाच्या लोककला केंद्र
सभागृहात होतील. उद्घाटन समारंभ १० फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता, तर समारोप
समारंभ १४ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता होईल.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, या
महोत्सवांतर्गत होणाऱ्या विविध २७ कलाप्रकारांत देशभरातील ६६ विद्यापीठांच्या
संघांनी आतापर्यंत नोंदणी केली असून सुमारे १०२० विद्यार्थी-विद्यार्थिनींसह १२२
संघ व्यवस्थापकांचा यात समावेश आहे. दि. ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत
विद्यापीठाच्या लोककला केंद्र, भाषा भवन सभागृह, नीलांबरी सभागृह, मानव्यविद्या
सभागृह व संगीत अधिविभाग सभागृह या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून विविध स्पर्धा होतील.
महोत्सवासंदर्भात अधिक
माहिती देताना विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव म्हणाले, विविध कलाप्रकारांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना राष्ट्रीय
पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एआययू आणि
केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय
आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव घेण्यात येतो. गेल्या वर्षी म्हैसूरमध्ये महोत्सव झाला होता. यंदाचा ३२वा महोत्सव शिवाजी विद्यापीठात होणार आहे. त्यात संगीत, गायन, फाईन आर्टस्, नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, लघुनाटिका, मूकनाट्य, एकांकिका, अशा विविध २७ कलाप्रकारांमध्ये महोत्सवात स्पर्धा होतील. देशातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती विभागातील महोत्सवातील विविध कलाप्रकारांमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या विद्यापीठांचे संघ ‘शिवोत्सव’मध्ये सहभागी होतील.
शिवाजी विद्यापीठात
होणाऱ्या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ समित्या गठित करण्यात आल्याचे सांगून
डॉ. गुरव म्हणाले, उद्घाटन समारंभापूर्वी आयोजित करण्यात आलेली शोभायात्रा हे
समारंभाचे मुख्य आकर्षण असेल. ‘रोकडविरहित आर्थिक व्यवहार: भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण’ या विषयावर ती आधारित असेल. तसेच, उद्घाटन समारंभानंतर संध्याकाळी यजमान
विद्यापीठाकडून महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनींसह
परीक्षक आणि मान्यवरांची निवास व्यवस्था अनुक्रमे विद्यार्थी, विद्यार्थिनी
वसतिगृह तसेच विद्यापीठ अतिथीगृहात करण्यात आली आहे. भोजन व्यवस्था मुख्य
प्रशासकीय इमारत व जोड-इमारतीच्या मधील भागात करण्यात आली असून विद्यापीठाच्या
नूतन आर.ओ. जलशुद्धीकरण केंद्रातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार
आहे.
पत्रकार
परिषदेत स्वागत व प्रास्ताविक प्रसिद्धी समितीच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार
यांनी केले. कुलसचिव डॉ. विलास नांडवडेकर यांनी आभार मानले.
महोत्सवाचे
स्वतंत्र वेबपेज व ॲप-
या युवा महोत्सवाची सविस्तर
माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने एक स्वतंत्र वेबपेज निर्माण केले असून
विद्यापीठाच्या वेबसाइटवर ‘शिवोत्सव-२०१७’
ते होस्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महोत्सवाचे ‘शिवोत्सव-२०१७’ (SHIVOTSAV-2017) नावाने ॲन्ड्रॉइड ॲप्लीकेशनही निर्माण करण्यात आले आहे. ते गुगल प्ले
स्टोअरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे ॲप प्रथमच तयार करण्याचा बहुमान
शिवाजी विद्यापीठास प्राप्त झाला आहे. संगणकशास्त्र अधिविभागाचे प्रा. कबीर खराडे
यांनी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेबपेज निर्माण केले
आहे, असे डॉ. गुरव यांनी यावेळी सांगितले.
डॉ.
गुरव म्हणाले, राष्ट्रीय महोत्सवाचे ॲन्ड्रॉईड ॲप्लीकेशन ईझी ॲन्ड युजफुल कंपनीने
तयार केले आहे. कार्यक्रमांचे वेळापत्रक, कार्यक्रम स्थळांचे गुगल नकाशे,
स्पर्धकांची राहण्याची सोय दर्शविणारे गुगल नकाशे, रेल्वे व एसटी बसस्थानकाचे
वेळापत्रक, शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर परिसराचे गुगल नकाशे, युवा महोत्सवाच्या
सर्व समिती सदस्यांची नावे व संपर्क आदी आवश्यक माहिती त्यात आहे. त्यामुळे
देशभरातून कोल्हापुरात येणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धास्थळी पोहोचेपर्यंत व संपूर्ण
कार्यक्रम पार पडेपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. या ॲपमध्ये कोल्हापूर शहराची
ओळख, शहरातील व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची नावे, छायाचित्रे व गुगल नकाशे, तसेच
कोल्हापुरी खाद्यसंस्कृती, कोल्हापुरी वस्तू अशा वैशिष्ट्यांची माहितीही देण्यात
आली आहे.
--00--
No comments:
Post a Comment