Sunday, 12 February 2017

शिवोत्सवातील एक सकाळ सृजनशीलतेची; अभ्यासपूर्ण वादविवादाची!

३२वा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)
Installation


Installation

Installation

Installation

Installation

Installation

Cartooning

Cartooning

Cartooning

Cartooning

Cartooning

टाकाऊ कचऱ्यापासून साकारली मनोहारी स्वप्ने’!
कोल्हापूर, दि. १२ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवामधील आजची सकाळ ही सृजनशीलतेची आणि कॅशलेस इंडियासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सर्वांगीण चर्चा घडवून आणणारा ठरला.
आज सकाळी मानव्यविद्या इमारतीच्या परिसरात इन्स्टॉलेशन स्पर्धा होती. यामध्ये इमारतीच्या परिसरात मिळेल तो कचरा, टाकाऊ वस्तू मिळवून त्यापासून विद्यार्थ्यांना कलाकृती तयार करावयाच्या होत्या. त्यासाठी स्पर्धेत सहभागी सर्व १५ संघांना विषय देण्यात आला होता, माझे स्वप्न. विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टीक बाटल्या, काचा, बल्ब, पालापाचोळा, रिकाम्या प्लेट्स, मोडक्या खुर्च्या, विटा, दगड, फांद्या, कपडे असा मिळेल, त्या प्रकारचा कचरा गोळा केला आणि त्या टाकाऊ वस्तूंमधून मग एकेकाचे स्वप्न टिकाऊ आकार धारण करू लागले. कोणी कल्पनाही करणार नाही, अशा कलाकृती केवळ कचऱ्यातून साकार होत होत्या, त्या केवळ या युवक-युवतींच्या कल्पकतेमुळेच!
महत्त्वाचे म्हणजे यातील कोणाचेही स्वप्न व्यक्तीगत स्वार्थाचे नव्हते, तर प्रत्येक संघाने साकारलेले स्वप्न शाश्वत होते, या पृथ्वीला, पर्यावरणाला सांभाळणारे होते, मानवतावादाची पेरणी करणारे होते. कोणी भ्रष्टाचारविरहित भारताचे, कोणी हरित, संतुलित पर्यावरणाचे, कोणी शांतीचे, कोणी साऱ्याच क्षेत्रांत स्वच्छ भारताचे, कोणी प्लास्टीकमुक्तीचे, तर कोणी देशसेवेसाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या स्मृती कायम तेवत ठेवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून सर्वांना दाखविले. दोन तासांच्या अवधीतच ही सारी स्वप्ने मानव्यविद्या इमारतीच्या परिसरात जणू जमिनीतून तरारून आल्याप्रमाणे साकार झाली. पाहणाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांना सलाम केला. या स्पर्धेत रायपूर, उत्तर प्रदेश, मणिपूर, आसाम, झारखंड, मुंबई, राजस्थान, सोलापूर, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात वादविवाद स्पर्धेलाही जोरदार प्रतिसाद लाभत होता. विद्यार्थ्यांना रोखरहित व्यवहार हा भारतीय अर्थव्यवस्था भरभराटीस आणण्याचा एकमेव पर्याय आहे, असा विषय देण्यात आला होता. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. रोकडविरहित व्यवहारांच्या बाबतीत सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांच्या मांडणीतून उपस्थितांना मिळत होती. ताजा व महत्त्वाचा विषय विद्यार्थी हाताळत असल्याने युवा पिढीचा एका दूरगामी परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही यातून प्रत्ययास येत होता. वादविवाद स्पर्धेनंतर नीलांबरी सभागृहातच प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.
दुपारी मानव्यविद्या सभागृहात झालेल्या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठीही कॅशलेस इंडिया हा विषय देण्यात आला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात वादविवाद स्पर्धेतून शब्दांच्या माध्यमातून या विषयाची चर्चा झाली असताना इथे कुंचल्याच्या फटकाऱ्यातून या विषयावर भाष्य करण्याचे आव्हानही विद्यार्थ्यांनी लीलया पेलल्याचे दिसले. एकच विषय पण, तो मांडण्याची प्रत्येकाची चित्रशैली, भाष्यशैली वेगळी होती. व्यंगचित्राचा हेतूच मुळी चिमटे काढण्याचा असल्याने या विषयाच्या दोन्ही बाजूंवर तिरकस भाष्य करणारी चित्रे कॅनव्हासवर साकारताना पाहणे रंजक ठरले.

No comments:

Post a Comment