३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)
Dr. Amit Saini |
Veteran Actor Sayaji Shinde |
Prin. Dr. D.R. More |
कोल्हापूर, दि. १४
फेब्रुवारी: अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळावर कारकीर्द घडवा, असा बहुमोल सल्ला
प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशभरातील तरुणाईला आज येथे दिला.
शिवाजी विद्यापीठात
गेल्या १० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ
राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभ श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात संपन्न झाला. यावेळी कोल्हापूरचे
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू
डॉ. डी.आर. मोरे अध्यक्षस्थानी होते.
सयाजी शिंदे यांनी भाषण
करण्याऐवजी उपस्थित तरुणांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून थेट संवाद साधला. देशभरातल्या
तरुणाईला सयाजी शिंदे यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल, त्यांच्या कारकीर्दीबद्दल
तसेच त्यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल जाणून घ्यावयाचे होते. त्यामुळे हा संवाद
उत्तरोत्तर रंगतच गेला.
साताऱ्यावरुन
मुंबईला संघर्ष करण्यासाठी जाताना खिशात वीस पैसे घेऊन गेलो होतो आणि परत येताना यशासोबत
ते वीस पैसे तसेच सोबत घेऊन परतल्याची हृद्य आठवण सांगून सयाजी शिंदे यांनी
उपस्थितांच्या काळजाला हात घातला. ते म्हणाले, एफ.वाय. ते टी.वाय. या कालावधीत
वॉचमनची नोकरी करीत असतानाच मी अभिनेता व्हायचे ठरवले आणि त्याच दिशेने वाटचाल
केली. वयाच्या विसाव्या वर्षी धडपड सुरू केली, तेव्हा कुठे चाळीसाव्या वर्षी यश
लाभल्याचे त्यांनी सांगितले. दादरच्या फूटपाथवर ‘अभिनय साधना’ हे अवघ्या २२ रुपयांचे पुस्तक आपल्या करिअरला
मार्ग दाखविणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयीन जीवनातच आपले लक्ष्य निर्धारित करावे. ते आपल्या मनात निश्चित ठेवून
कोणालाही न सांगता हळूहळू त्या दिशेने वाटचाल करावी. महाविद्यालय ही केवळ एक पहिली
पायरी आहे, जीवनात अशा असंख्य पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. आज तुम्ही आपल्या विद्यापीठाचे
प्रतिधित्व करीत आहात, उद्या जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे,
अशा प्रकारे स्वतःला विकसित करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुष्यात लहान-मोठा,
गरीब-श्रीमंत असे काही नसते. आई आणि वृक्ष या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक
जन्म देते आणि दुसरे श्वास देते, या दोन्ही गोष्टींची उतराई कोणत्याही पद्धतीने
शक्य नसल्याचेही सयाजी शिंदे म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.
अमित सैनी म्हणाले, शिवाजी विद्यापीठात झालेल्या या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये
सादर झालेल्या कलाप्रकारांचा दर्जा अत्यंत उच्च होता. विद्यार्थ्यांनी आपल्यातले
अंगभूत गुण पुढे आयुष्यभर जोपासावेत, त्यांचा विकास करावा. आपले कलागुण कधीही हरपू
देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातल्या
दुष्काळग्रस्त माण व खटाव तालुक्यांत केलेल्या वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचेही त्यांनी
मनापासून कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात
प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या संयोजनात
मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून आभार मानले. देशभरातून विद्यापीठात
दाखल झालेले विद्यार्थी कोल्हापूर आणि विद्यापीठाबद्दल चांगल्या आठवणी येथून सोबत
घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आयुष्यात हा महोत्सव म्हणजे एक टप्पा
आहे. तेवढ्यावरच समाधान न मानता पुढे वाटचाल करा, असा संदेशही त्यांनी उपस्थित
विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय विद्यापीठ
महासंघाचे निरीक्षक प्रा. एस.के. शर्मा यांनी विद्यापीठाने राष्ट्रीय महोत्सवाचे
नेटके संयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीवर सादरीकरण
करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली, ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी
सांगितले.
यावेळी तेजपूर
विद्यापीठाच्या संघ व्यवस्थापक भूपाली कश्यप आणि मुंबई विद्यापीठाचे नीलेश सावेकर
यांनी महोत्सवाच्या संयोजनाबद्दल अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त केल्या. विशेषतः
कश्यप यांनी कोल्हापुरी लोक, त्यांचे आदरातिथ्य, इथली परंपरा, विद्यापीठातील हिरवाई,
राष्ट्रीय पक्ष्याचे पदोपदी होणारे दर्शन, उत्स्फूर्त प्रेक्षकगण आणि बाजरीची
भाकरी आपण कधीही विसरू शकणार नाही, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली.
विद्यार्थी कल्याण
संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी महोत्सवाचा अहवाल सादर केला. नोंद झालेल्या एकूण
८२ विद्यापीठांपैकी ७९ विद्यापीठांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले. ८७० विद्यार्थी,
५४२ विद्यार्थिनींसह संघ व्यवस्थापक, परीक्षक आदी असे सुमारे १५०० लोक विद्यापीठात
दाखल झाले. कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेत सहभागी विद्यापीठे आणि स्पर्धक
या दोहोंची संख्या यंदा विक्रमी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठास
या महोत्सवाच्या संयोजनात आर्थिक साह्य करणाऱ्या महाविद्यालये व शिक्षण संस्थांचा
सत्कार करण्यात आला. यामध्ये भारती विद्यापीठ, कोल्हापूर, रयत शिक्षण संस्था,
सातारा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,
कोल्हापूर,, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे, डीकेटीई, इचलकरंजी,
जे.जे. मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर, आट्र्स अन्ड कॉमर्स महाविद्यालय, सातारा,
जनता शिक्षण संस्था, आजरा यांचा समावेश होता.
कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार
मानले. विद्यानंद खंडागळे, वैशाली भोसले, संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर डॉ. अभयकुमार साळुंखे, डॉ. हणमंतराव कदम, क्रीडा अधिविभाग डॉ.
पी.टी. गायकवाड, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के.
गायकवाड यांच्यासह महोत्सव संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला
मान्यवरांसाठी युवा महोत्सवात सहभागी झालेल्या निवडक संघांचे चित्ताकर्षक सादरीकरण
झाले. यामध्ये लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाबच्या संघाने पाश्चिमात्य समूहगीत,
बनस्थळी विद्यापीठ, राजस्थानच्या संघाने समूह लोकनृत्य, आय.के. गुजराल पंजाब
टेक्निकल विद्यापीठ, जालंधरचा विद्यार्थी गुरप्रीत सिंग याने मिमिक्री तर आंध्र
प्रदेशच्या कृष्णा विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने लोकवाद्यवृंद सादर केला.
No comments:
Post a Comment