Sunday, 12 February 2017

शिवाजी विद्यापीठ संघाने मूकाभिनयात जिंकली मने

मानवाची ओळख युद्धात नव्हे, तर शांतीत असल्याचा दिला संदेश



३२वा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)
Group Song (Indian)

Group Song (Indian)

Group Song (Indian)

Clay Modelling
 
Clay Modelling

Clay Modelling
Clay Modelling

Mime

Mime

Shivaji University's team presenting Mime

Shivaji University's team presenting Mime

Shivaji University's team presenting Mime
Classical Vocal

कोल्हापूर, दि. १२ फेब्रुवारी: माकडापासून बुद्धिवान मानव तयार झाला खरा, पण त्याने त्याची सारी बुद्धी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीकडेच वाया घालवली. मानवाची खरी ओळख ही युद्धात नाही, तर शांतीत आहे, असा प्रभावी संदेश मूकाभिनयाच्या माध्यमातून देऊन शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आज प्रेक्षकांची मने जिंकली.
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात आज सायंकाळी वि.स. खांडेकर भाषा भवन येथे माईमअर्थात मूकाभिनयाच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा संघ असल्याने चाहत्यांची प्रचंड गर्दी सभागृहात झाली होती. आपली मुले राष्ट्रीय स्पर्धेत कसा परफॉर्मन्स देतात, हे पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. त्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची तुडुंब गर्दी भाषा भवन सभागृहात झाली होती. विद्यार्थ्यांनीही उपस्थितांची अजिबात निराशा न होऊ देता, तसेच कोणताही दबाव न घेता हा शब्दाविना संवाद साधला आणि दहशतवादाविरुद्ध एकतेचा व शांततेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले. विद्यापीठाच्या संघाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
मूकाभिनय स्पर्धेत अन्य विद्यापीठांच्या संघांनीही दमदार सादरीकरण केले. विषयांचे वैविध्य हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. पाण्याचे महत्त्व व व्यवस्थापन, सीताहरण, ग्रेट अशोका, भारतीय सैन्यदल व सुरक्षा, सर्जिकल स्ट्राइक असे एकापेक्षा एक अनोखे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
तत्पूर्वी, आज दिवसभरात वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात एकांकिका स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडला. यामध्ये कोईमतूर, आसाम, नागपूर, आंध्र प्रदेश, मिदनापूर, थिरुअनंतपुरम, गुवाहाटी या ठिकाणच्या विद्यापीठांनी परकाया प्रवेश, दुष्यंत-शकुंतला, नातेसंबंध, आर्थिक घोटाळे, बदलते नातेसंबंध व सामाजिक वर्तणूक, मृच्छकटिकम्, आसामचा शूरपुरूष या विषयांवरच्या एकांकिका सादर केल्या.
तत्पूर्वी, लोककला केंद्रातील आजचा दिवस हा भारतीय गायनाचा ठरला. सकाळच्या सत्रात भारतीय सुगम गायनाची स्पर्धा झाली. १५ विद्यापीठांच्या संघांनी येथे नॉन फिल्मी, गीत-गजल, भजन, शाबाद, अभंग आदी गीत प्रकार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सायंकाळच्या सत्रात लोककला केंद्रात भारतीय समूहगायनाची स्पर्धा झाली. यामध्ये स्पर्धकांना देशभक्तीपर आणि लोकगीते किंवा भारतीय प्रादेशिक भाषेतील गीते अशी दोन गीते सादर करण्याची मुभा होती. विद्यार्थ्यांनी काल पाश्चात्य गीतांचे सादरीकरण जितक्या जोरकसपणे केले होते, तितक्याच आत्मीयतेने त्यांनी ओतप्रोत देशभक्तीने भरलेली गीते आणि लोकगीते, प्रादेशिक गीते सादर केली. या दोन्ही स्पर्धांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
सायंकाळी मानव्यविद्या इमारतीमध्ये क्ले मॉडेलिंगच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये बारा विद्यापीठांचे स्पर्धक सहभागी झाले. त्यांना संघर्ष असा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी केवळ मानवाच्याच नव्हे, तर अगदी निसर्ग आणि पशुपक्ष्यांच्या जीवनातीलही रोजचा झगडा आपल्या शिल्पांतून आविष्कृत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिलांचा रोजच्या जीवनातील संघर्ष, मानवाचा आपल्या अस्तित्वासाठीचा झगडा, शेतकऱ्याचा संघर्ष, मानवासह पशुंमध्येही उपजत असलेला सत्तासंघर्ष अशा अनेकविध विषयांना आपल्या क्ले मॉडेलिंगच्या साह्याने मूर्त रुप प्रदान केले.
दरम्यान, संगीत अधिविभागाच्या सभागृहात सायंकाळी उशीरा शास्त्रीय गायनाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. त्यामध्ये सहभागी स्पर्धकांनी मालकंस, वृंदावनी सारंग, बिहाग आदी रागांवर आधारित रचना सादर करून जाणकार श्रोत्यांची वाहवा मिळविली. स्पर्धा उशीरा सुरू होऊनही संगीत अधिविभागाचे सभागृह रसिकांनी पूर्णतः भरून गेले होते.

उद्याचे कार्यक्रम: (सोमवार, दि. १३ फेब्रुवारी २०१७)
सकाळी ९.३० वाजता- स्कीट (वि.स. खांडेकर भाषा भवन), स्पॉट फोटोग्राफी व स्पॉट पेंटिंग (मानव्यविद्या इमारत), रांगोळी (संगीत अधिविभाग),
सकाळी १० वाजता- शास्त्रीय नृत्य (लोककला केंद्र)
दुपारी ३ वाजता- लोकनृत्य/ आदिवासी नृत्य (लोककला केंद्र)
सायं. ५ वाजता- मिमिक्री (वि.स. खांडेकर भाषा भवन)

No comments:

Post a Comment