Wednesday, 10 October 2018

नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

रत्नागिरी येथे स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे स्वागत करताना जयू भाटकर. सोबत (डावीकडून) मंजिरी साळवे, डॉ. कद्रेकर, संजय ससाणे, संजीव सुर्वे.

रत्नागिरी, दि. ९ ऑक्टोबर : ‘विद्यार्थी नापास झाला की त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम नातेवाईक, शेजारी करतात. मग व्यवस्थेलाही दोषी ठरवले जाते. नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढवू नका. अपयशाची कारणे शोधून यश मिळवा. स्वराज्य संस्था सकारात्मकता निर्माण करून समाज घडवण्याचे कार्य करत आहे,’ असे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी रविवारी (दि. ७) येथे केले.

स्वराज्य संस्थेच्या वतीने (कै.) आर. एस. सुर्वे अभ्यासवर्गातील शिक्षकांचा गौरव कार्यक्रम सात ऑक्टोबरला पटवर्धन हायस्कूल येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, स. रा. देसाई अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजिरी साळवी, कल्याण येथील परिवहन अधिकारी संजय ससाणे, सुर्वे यांचे सुपुत्र संजीव सुर्वे, दूरदर्शनचे सहायक संचालक जयू भाटकर, कन्या पद्मा भाटकर, स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शिवगण, मरीनर दिलीप भाटकर आणि सुर्वे कुटुंबिय उपस्थित होते.


डॉ. शिंदे म्हणाले, ‘स्वराज्य संस्थेने राबवलेला वर्ग खरोखरच स्तुत्य आहे. शिवाय आज सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार केला आणि १०३ वर्षीय वांदरकर गुरुजींचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य. मीसुद्धा एक पोलिस हवालदाराचा मुलगा. बीएस्सीला असताना मला १४ किमी चालत कॉलेजला जावे लागत होते. शाळेतील जाधवर नावाच्या शिक्षकांनी माझ्या वडिलांना सतत पत्र पाठवले आणि देवानंदला शिकायचे आहे, त्याला शिकू द्या, असे सकारात्मक विचार पेरले. आई-वडिलांमुळेच मी पुढे शिकू शकलो.’

‘या अभ्यासवर्गासाठी नगरपालिकेने शाळा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या आठ वर्षांत येथून ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नववीपर्यंत परीक्षेत नापास झालेल्या मुलांसाठी मार्गदर्शन केले जाते,’ असे जितेंद्र शिवगण यांनी सांगितले. 

या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना विनामोबदला शिकवणारे शिक्षक नितीन मुझुमदार, सुवर्ण चौधरी, सोनाली डाफळे, दिपाली डाफळे, कुशल जाधव, शाल्मली गाडेकर, पल्लवी पवार, अपेक्षा नागवेकर-पाटील यांचा गौरव करण्यात आला; तसेच सफाई कामगार विजय कांबळे आणि वंदना शिंदे, वांदरकर गुरुजी यांचाही सन्मान करण्यात आला.
या अभ्यासवर्गामार्फत रत्नागिरीत रात्रशाळा व व्यावसायिक शिक्षण वर्ग सुरू करण्याचा विचार मरीनर भाटकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘बोटीवरील नोकरीत स्थानिक कमी आहेत. त्यामुळे समुद्रातले अभ्यासक्रम शिकवून तरुणांना रोजगार देता येईल. सुर्वेकाका हे इंजिनीअरिंग जगले. लेलँडचे इंजिन बोटीला लावून बोटही चालवली. वालचंद कॉलेजला मी शिकत होतो तेव्हा सुर्वेकाका सांगलीचे आरटीओ होते.’

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे म्हणाले, ‘सुर्वे हे हिर्‍याला पैलू पाडणारे व प्रशासकीय गुरु अशा आठवणी सांगत उजाळा दिला. सांगली आरटीओ कार्यालयात नोकरीच्या पहिल्याच दिवशी आर. एस. सुर्वे यांनी वडिलांनी आजपासून मी संजयचा पालक असे सांगितले. त्यांची कठोर शिस्त, प्रशासकीय मार्गदर्शन यामुळेच आज वरच्या पदावर पोहाचलो.’

(बाईट्स ऑफ इंडिया वरुन साभार.)

No comments:

Post a Comment