कोल्हापूर, दि. १७
ऑक्टोबर: भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या
संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेचे आयोजन येत्या
सोमवारपासून (दि. २२ ऑक्टोबर) विद्यापीठात करण्यात आले आहे. या दोन दिवसीय
स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १०.३० वाजता वि.स. खांडेकर भाषा भवनच्या सभागृहात
ए.आय.यु.चे सहसचिव डॉ. सॅम्पसन डेव्हीड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे
यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय
आंतर-विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या कव्वाली संघाने चमकदार कामगिरी करत
विजेतेपद पटकावले होते. लावणी-पोवाड्याची परंपरा असलेल्या या परिसरातील
विद्यार्थ्यांनी हा एक प्रकारे इतिहास घडविला होता. त्यामुळे ही कव्वालीची परंपरा
आणखी जोमाने पुढे जावी आणि स्थानिक विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी,
यासाठी यंदाच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची इच्छा विद्यापीठाने ए.आय.यु.कडे
व्यक्त केली होती. त्यानुसार, ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठात आयोजित केली जात आहे.
स्पर्धेत देशभरातील एकूण आठ संघांनी नोंदणी केली आहे. सर्व स्पर्धा वि.स. खांडेकर
भाषा भवनच्या सभागृहातच पार पडतील. समारोप समारंभ मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ४
वाजता होईल. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
या स्पर्धेचे
समन्वयक तथा विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर व्ही. गुरव या संदर्भात अधिक
माहिती देताना म्हणाले की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांपैकी चार संघ
महाराष्ट्रातील असून हरियाणा, पंजाब, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमधून
प्रत्येकी एक संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५
हजार रुपये रोख, २० हजार रुपये रोख व १५ हजार रुपये रोख आणि चषक व प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ स्तरावर विविध
समित्यांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सर्व कामे मार्गी
लावण्यात येत आहेत. येणारे संघ, त्यांचे व्यवस्थापक, परीक्षक यांच्या निवासाची
व्यवस्था विद्यार्थी भवन, पाच बंगला आणि विद्यापीठ अतिथीगृह या ठिकाणी करण्यात
आली आहे. तर, चहापान व भोजनाची मध्यवर्ती व्यवस्था लोककला केंद्र येथे करण्यात आली
आहे.
अशा प्रकारची
राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा ही कोल्हापूरमध्ये प्रथमच होत असून त्याचा रसिकांनी
मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गुरव यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेस
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन
मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इनोव्हेशन व
इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय
जाधव, अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. रसूल कोरबू, डॉ. प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment