शिवाजी विद्यापीठात रेशीमशेती इन्क्युबेशन सेंटरच्या माहितीफलकाचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, केंद्र समन्वयक डॉ. ए.डी. जाधव. |
इन्क्युबेशन सेंटरमधील सुविधांची कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह मान्यवरांना माहिती देताना डॉ. ए.डी. जाधव. |
प्राणीशास्त्र अधिविभागात इन्क्युबेशन सेंटरअंतर्गत शेतकऱ्यांसाठी रेशीमशेतीविषयक प्रशिक्षण शिबिराचे उद्घटान करताना कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवर. |
कोल्हापूर, दि. १० ऑक्टोबर: शिवाजी
विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आलेल्या रेशीम शेती इन्क्युबेशन सेंटरमुळे विद्यार्थ्यांचा
आणि शेतकऱ्यांचाही ज्ञानार्जनातून अर्थार्जनाकडील प्रवास सुकर होणार आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे |
विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन
इन सेरीकल्चर या केंद्राचे उद्घाटन सोमवारी (दि. ८) झाले. त्यावेळी कुलगुरू डॉ.
शिंदे बोलत होते. या उद्घाटनाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील ५५
शेतकऱ्यांसाठी दिनांक ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या इन्क्युबेशन केंद्राच्या अंतर्गतच
‘एकात्मिक रेशीम शेती’ या विषयावरील प्रशिक्षण शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही
कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे इनोव्हेशन
अँड इन्क्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत, विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी.
खोत, समृद्धी उद्योग समुहाचे मनिष पाटील, उस्मानाबादचे प्रगतशील रेशीम शेती
उत्पादक बालाजी पवार आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, लाईफ सायन्स या विषयामधील रेशीम शेतीशी निगडित भारतातील
हे पहिले इन्क्युबेशन सेंटर आहे. इन्क्युबेशन सेंटरची योजना अशासाठी असते की,
विद्यार्थी अगर नागरिकांना नोकरीऐवजी स्वतःचा रोजगार सुरू करता यावा आणि त्या
माध्यमातून इतर गरजू लोकांनाही रोजगार देता यावा. त्या दृष्टीने या रेशीम शेती
इन्क्युबेशनमध्ये रोजगार निर्मितीची पुरेपूर क्षमता आहे. स्वकल्पना, स्वावलंबन आणि
स्वाभिमान या त्रिसूत्रीच्या आधारावर प्रगतशील शेतकरी या माध्यमातून निश्चितपणे
आपली प्रगती साधण्यास सक्षम होतील. या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेला योग्य
प्रशिक्षण आणि सुविधा पुरविण्याची जबाबदारी इन्क्युबेशन सेंटर सक्षमपणे पार पाडेल,
असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. उस्मानाबादसारख्या
भागातून रेशीम शेतीचे निवासी प्रशिक्षण घेण्यास अकृषी विद्यापीठात शेतकरी येतात, ही
अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व
मान्यवरांनी इन्क्युबेशन सेंटरमधील सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या एक आठवड्याच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात जमिनीची तयारी,
निवड, खताचे, पाण्याचे महत्व, चॉकी व प्रौढ रेशीम कीटक संगोपन, निर्जंतुकीकरण,
तुती व रेशीम कीटकांचे विविध रोग व किड कोषबांधणी, विक्री, रेशीमशेतीतील
मूल्यवर्धित उत्पादने, धागानिर्मिती, शासकीय योजना अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. मन्ने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम
समन्वयक डॉ. ए. डी. जाधव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment