डॉ. अनिल काकोडकर |
कोल्हापूर, दि. १९
ऑक्टोबर: वर्तमान परिस्थितीमधील भारताच्या सामाजिक, राजकीय स्थित्यंतरांचा शास्त्रीयदृष्ट्या
आढावा घेऊन भविष्याचा साक्षेपी वेध घेणाऱ्या संशोधनाला विद्यापीठांनी चालना देणे
आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर
यांनी आज येथे केले.
डॉ. अनिल काकोडकर |
थोर इतिहासकार डॉ.
बाळकृष्ण लिखित आणि डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘शिवाजी द ग्रेट’ या चौ-खंडात्मक शिवचरित्राच्या नूतन आवृत्तीचे
प्रकाशन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन
सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे होते, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. काकोडकर
म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा साद्यंत वेध घेतलेला
आहे. हा महाग्रंथ शिवरायांच्या समकालीन परकीय वस्तुनिष्ठ संदर्भांच्या आधारे
त्यांनी साकारलेला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सद्यस्थितीतील
राजकीय, सामाजिक उत्क्रांतीच्या कारणांचा शोध व वेध घेण्यासाठी अशा ऐतिहासिक
दस्तावेजांचे योगदान मोलाचे आहे. डॉ. बाळकृष्णांनी अथक संशोधनांती अत्यंत परिश्रमातून
हा महाग्रंथ साकारला आहे. इतके मोठे शिवचरित्र मी प्रथमच पाहतो आहे. इतिहास
संशोधकांच्यासह सर्वसामान्य शिवप्रेमींच्या दृष्टीनेही या ग्रंथाचे मोल मोठे आहे.
यावेळी श्रीमंत
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, छत्रपती शिवरायांचे आपण सारे नाव घेतो, मात्र
त्यांचा विचार घेत नाही. या देशातील जनतेने या न्यायप्रिय राजाच्या चरित्रापासून
दिशादर्शक प्रेरणा घेण्याची गरज आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे |
कुलगुरू डॉ. शिंदे
यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या
संशोधन कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. पवार यांनी या वयातही ज्या उत्साहाने
आणि जोमाने आपले संशोधनाचे कार्य अखंडितपणे चालविले आहे, त्याचा मला प्रचंड विस्मय
वाटतो. सामाजिक विज्ञानामध्ये संशोधनाला मर्यादा आहेत, असे म्हणणारा आणि मानणारा
एक मोठा संशोधक वर्ग आपल्याकडे आहे. एका संकुचित परिप्रेक्ष्यातून जर तुम्ही या
अतिव्यापक विषयाकडे पाहात राहाल, तर एकही विषय संशोधनासाठी हाती लागणार नाही.
संशोधकाने सर्वप्रथम आपला हा संकुचितपणा सोडून देऊन व्यापक दृष्टीने भूतकाळाकडे,
वर्तमानाकडे पाह्यला हवे आणि त्यातून त्याने भविष्याचा वेध घ्यायला हवा. सामाजिक
संशोधनाच्या या निकषांमध्ये अत्यंत समर्पित भावनेने डॉ. पवार यांनी कार्य
चालविल्यानेच त्यांचे संशोधन अनमोल आहे. डॉ. बाळकृष्ण यांनी लिहीलेल्या
शिवचरित्राचे पुनरुज्जीवन करून या महाराष्ट्रावर त्यांनी मोठे उपकार केले आहेत,
असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिवाजी महाराज यांचे
चरित्र म्हणजे सामान्यत्वापासून असामान्यत्वाकडील प्रवासाचे ज्वलंत उदाहरण आहे. युगानुयुगे
त्यांचे चरित्र प्रेरणा देत राहील, अशी भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली.
डॉ. जयसिंगराव पवार
यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. बाळकृष्णांनी मृत्यूशय्येवर असतानाही शिवचरित्राचा
ध्यास घेऊन ते कसे पूर्ण केले, याचे मर्मग्राही विवेचन केले. शिवाजी विद्यापीठाची
स्थापना हे डॉ. बाळकृष्ण आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे स्वप्न होते. ते पूर्ण
करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. हा इतिहास तरुण पिढीने लक्षात घेण्याचे
आवाहन त्यांनी केले. ‘शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथाच्या माध्यमातून शिवरायांना वैश्विक स्तरावर
नेण्याची कामगिरी डॉ. बाळकृष्ण यांनी केली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी
मान्यवरांच्या हस्ते ‘शिवाजी द ग्रेट’ या महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment