Thursday 4 October 2018

शिवाजी विद्यापीठाच्या इनक्युबेशन केंद्रासाठी ५ कोटी मंजूर

शिवाजी विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरसाठीचे इरादापत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना  संचालक डॉ. आर.के. कामत. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.



कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: येथील शिवाजी विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुंबई येथे राजभवनमध्ये काल (दि.३) झालेल्या स्टार्ट-अप इंडिया महाराष्ट्र यात्रा उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक प्रा.डॉ. आर.के. कामत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासनाच्या वतीने इरादापत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) प्रदान करण्यात आले.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेद्वारे शासन गावोगावी उद्योगास चालना मिळण्यासाठी उद्योजक घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील इनक्युबेशन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक आणि नवउद्योजकांना सहाय्य करण्याचे धोरण आहे.
त्याविषयी सविस्तर माहिती देताना विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. कामत म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन एन्ड लिंकेजिस (एससीआयआयएल) या केंद्रासाठी समृद्धी इंडस्ट्रीजचे श्री. मनिष पाटील यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. एकूण ११ कोटी रुपयांच्या या प्रस्तावापैकी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे ही मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्राचे कामकाज विद्यापीठ आणि समृद्धी इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने पाहण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत वर्षाला १५ ते वीस स्टार्टअप प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह तळागाळातले संशोधक तसेच सर्वसामान्य लोकांनाही आपल्या अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव सादर करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी समृद्धी उद्योगाच्या सहकार्याने जुगाडफंडा डॉट कॉम हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तसेच, सिंगापूरपॉली या सिंगापूरमधील आघाडीच्या विद्यापीठाच्या सहकार्याने इनोव्हेशन प्रशिक्षण देण्यात येणार असून उद्योग-व्यवसाय कसा सुरू करावा, याविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

वचनपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला, त्यावेळी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर सुरू करण्याचा मनोदय मी जाहीर केला होता. त्या वचनपूर्तीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन केंद्राचा विद्यापीठ परिक्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आणि अभिनव, उपक्रमशील नागरिक यांना मोठा लाभ होईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.



No comments:

Post a Comment