Thursday 11 October 2018

राजर्षी शाहूंचे महिलांसाठीचे कार्य अलौकिक

ऑक्सफर्डच्या प्रथम महिला कुलगुरू लुईस रिचर्ड्सन यांचे मत

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरू लुईस रिचर्ड्सन यांना प्रदान करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


कोल्हापूर, दि. ११ ऑक्टोबर: ज्या काळात जगभरातील महिलांमध्ये नुकतीच सक्षमीकरणाची जाणीव मूळ धरण्यास सुरवात झालेली होती, त्या काळात महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करणाऱ्या कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य अलौकिक स्वरुपाचे आहे, असे मत जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रथम महिला कुलगुरू लुईस रिचर्ड्सन यांनी नुकतेच मुंबई येथे व्यक्त केले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या आठशे वर्षांच्या इतिहासात श्रीमती रिचर्ड्सन यांच्या रुपाने कुलगुरूपद भूषविण्याची संधी एका महिलेस प्रथमच मिळाली आहे. त्या नुकत्याच भारत दौऱ्यावर आले असता मुंबईतील ब्रिटीश कमिशनरेटमध्ये भारतातील शिक्षण क्षेत्रातील निवडक मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा समावेश होता. या भेटी दरम्यान कुलगुरू डॉ. शिंदे यांनी श्रीमती रिचर्ड्सन यांना शाहू महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याविषयी त्यांना माहिती दिली. ही माहिती ऐकून त्या चकित झाल्या.
त्या म्हणाल्या, भारतातील एखाद्या महान समाजसुधारक राजाविषयी मला भेट मिळालेले हे पहिलेच पुस्तक आहे. शाहू महाराजांचे कार्य हे काळाच्या पुढचे आहे. सामाजिक विषमता दूर करून शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविण्याचे त्यांचे कार्य तत्कालीन भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरले. हा संपूर्ण ग्रंथ मुळापासून वाचण्याची आता ओढ लागली आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मानद प्रोफेसर असून गतवर्षी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात तेथील शास्त्रज्ञांसमवेत सुमारे महिनाभर संशोधनकार्य केले. त्यावेळी त्यांनी कुलगुरू रिचर्ड्सन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. तेथील संशोधन कार्याविषयीही यावेळी उभयतांत चर्चा झाली.


No comments:

Post a Comment