शिवाजी विद्यापीठास प्राप्त झालेले क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र. |
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: संशोधनाच्या क्षेत्रात
येथील शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर द्वितिय स्थान पटकावून या
क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात
जागतिक स्तरावर दबदबा असलेल्या ब्रिटीश ‘क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रँकिंगचे भारतीय संस्थांच्या
संदर्भातील मानांकन १५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये शिवाजी
विद्यापीठाची संशोधन क्षेत्रातील आघाडी अधोरेखित झाली आहे.
‘क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’च्या वतीने ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत,
चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांसाठी स्वतंत्र रँकिंग (क्यू.एस. ब्रिक्स इंडिया रँकिंग) घेण्याचे ठरविण्यात आले
आहे. या धोरणानुसार, यंदा प्रथमच भारतातील शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्रपणे
क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी
विद्यापीठाची क्रमवारी ५६-६० अशी आहे; तर, ‘ब्रिक्स’ देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये ही क्रमवारी २५१-२६० अशी
आहे.
ही मानांकने ठरविताना शैक्षणिक
लौकिक (३०%), संस्थेचा लौकिक व परंपरा (२०%), शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर (२०%), पीएचडीधारक शिक्षक (१०%), स्कोपस आकडेवारीनुसार
प्रतिशिक्षक शोधप्रबंध (१०%), ‘स्कोपस’नुसार शोधनिबंधांमधील उद्धृते (साईटेशन्स) (५%), आंतरराष्ट्रीय
विद्यार्थ्यांचे प्रमाण (२.५%) आणि आंतरराष्ट्रीय शिक्षकांचे प्रमाण (२.५%) असे निकष निर्धारित
करण्यात आले होते. यातील संशोधनाशी निगडित निकषांवर शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय
स्तरावर द्वितिय स्थान मिळवून आपल्या संशोधनाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. या
निकषांवर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (आय.सी.टी.) प्रथम स्थान
पटकावले आहे.
या रँकिंगच्या प्रमाणपत्र
प्रदानाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे १५ ऑक्टोबर रोजी झाला. शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि
क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून
गौरविण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन केंद्राचे
तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत उपस्थित होते.
विद्यापीठाच्या संशोधन
परंपरेचा सन्मान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
जागतिक संशोधन संस्थांच्या
क्रमवारीच्या क्षेत्रात ‘थिंक टँक’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रिटनच्या ‘क्यू.एस. वर्ल्ड
युनिव्हर्सिटी’ रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाचा गौरव होणे हा विद्यापीठाच्या
संशोधन परंपरेचा सन्मान आहे. या निमित्ताने विद्यापीठाच्या संशोधन कार्याची नोंद
प्रथमच एका जागतिक क्रमवारी निर्धारित करणाऱ्या यंत्रणेमार्फत घेण्यात आली, याचा
आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवाजी
विद्यापीठातील शिक्षक तसेच संशोधकांनी आपल्या संशोधनपर कार्याचा ठसा जागतिक
स्तरावर उमटविलेला आहे, यावर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांतून
शिक्कामोर्तब झाले आहे. आता या दर्जावर ‘क्यू.एस.’ रँकिंगची मोहोर उमटल्याने याला एक वेगळे
महत्त्व प्राप्त झाले आहे. ही बाब विद्यापीठातील तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील
संशोधकांसाठी अत्यंत प्रेरणादायी स्वरुपाची असून या पुढील काळातही या क्षेत्रातील
विद्यापीठाची आघाडी टिकविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक दर्जेदार संशोधन होत राहील,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या रँकिंगबद्दल विद्यापीठातील संशोधकांसह
सर्वच घटकांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment