कोल्हापूर, दि. २५ ऑक्टोबर: कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा चर्मवस्तु उत्पादक
संघाशी झालेल्या सामंजस्य कराराद्वारे तरुण उद्योजक निर्माण करण्याबरोबरच जुन्या
उद्योगांचे क्षमतावर्धन करण्याची संधी निर्माण झाली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ
इनोव्हेशन, इनक्युबेशन, जागतिक लिंकेजिस आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सर्वतोपरी सहाय्य
करेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचा आज जिल्हा
चर्मवस्तु उत्पादक, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर प्रा.लि. यांच्या समवेत आज सामंजस्य
करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद
सभागृहात झालेल्या या सामंजस्य करारप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के,
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, रसायनशास्त्र अधिविभाग
प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी, डॉ. गजानन राशिनकर, क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड
यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने
उपस्थित होते. यावेळी सामंजस्य करारावर प्रभारी कुलसचिव डॉ.
शिंदे आणि श्री. गायकवाड यांनी स्वाक्षरी केल्या.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापुरी चप्पलचे जागतिक
स्तरावर नाव असले तरी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून वाढत्या
स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्थानिक उद्योजकांशी सज्ज होण्याची गरज आहे. कोल्हापुरी
चप्पलचे भौगोलिक स्थाननिश्चिती (जीआय) मानांकन झाले असले तरी त्याची गुणवत्ता
सिद्ध करून देणे, विद्यापीठातील तज्ज्ञांचे दर्जावृद्धीबाबत मार्गदर्शन मिळवून
देणे याबाबत विद्यापीठ सकारात्मकपणे प्रयत्न करील. आधुनिक जैवतंत्रज्ञान,
नॅनोतंत्रज्ञान यांच्या सहाय्याने या चप्पलचा दर्जा, गुणवत्ता व टिकाऊपणा
वृद्धिंगत करण्यासाठी संशोधन करता येईल. मेडिकल चप्पलच्या अनुषंगानेही संशोधन
करण्याची मोठी संधी आहे. त्याला परदेशी पर्यटकांचीही मोठी पसंती लाभेल, असे मत
त्यांनी व्यक्त केले.
अशोक गायकवाड म्हणाले, शहरी व ग्रामीण भागामध्ये जे छोटे उद्योजक पिढ्यान् पिढ्या पारंपरिक पद्धतीने उत्पादन करुन विक्री करतात. असे उद्योजक खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकाव धरु शकत नाहीत, अशा उद्योगांकरिता नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, कच्च्या मालापासून दर्जेदार कोल्हापुरी चप्पलची निर्मिती करणे, देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठेत उत्पादकांना सर्व सोयीनिशी योग्य दर मिळवून देणे आणि नवीन उद्योजक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान निर्माण करणे हा क्लस्टरचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. पी.एन. भोसले यांनी
कोल्हापुरी चप्पलच्या संशोधन व संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या
कामाची माहिती दिली. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र आदी विभागातील संशोधक व प्राध्यापकांचे सहकार्य घेऊन या उद्योगाला सर्वंकष सहाय्य
करण्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजनेबाबत...
कोल्हापूर जिल्हा चर्मवस्तू उत्पादक कोल्हापुरी चप्पल क्लस्टर प्रा.लि. ही क्लस्टर योजना लागू झाल्यामुळे दर्जेदार कोल्हापुरी चप्पलचा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात मोठा वाटा असणार आहे. कोल्हापुरी चप्पलची ख्याती देशात व परदेशात सर्वदूर पोहोचली आहे, ती या चप्पलच्या कलाकुसरीच्या अंगभुत गुणधर्मामुळे. कोल्हापुरी चप्पलचा रांगडेपणा व सौंदर्य फुलविणाऱ्या कलाकुसरीमुळे. ज्या कोल्हापुरी चप्पलने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणले, ती हस्तकला नामशेष होत चालली आहे. ती ऐतिहासिक हस्तकला, कलाकुसर जिवंत ठेवण्यासाठी कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या अडचणीवर मात करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा, देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने आर्थिक सुधारणा, आवश्यक आधुनिक प्रशिक्षण, कॉमन फॅसिलिटी सेंटर, कच्च्या मालाचा डेपो, खेळत्या भांडवलाची गरज, क्वालिटी कंट्रोल, लेदर टेस्टिंग लॅब, आधुनिक उपकरणे, उद्योगासाठी जागा या सर्व बाबींवर विचार करुन कोल्हापूर जिल्हयातील कोल्हापुरी चप्पल उद्योगाचे स्थान व ब्रँण्ड विचारात घेऊन चप्पल कारागिरांचा सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून पारंपरिक कुटीर उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची व संशोधनाची जोड देवून व व्हॅल्यू ॲडिशन, रंगसंगतीसह नैसर्गिक बाज कायम ठेवून उत्कृष्ट दर्जाची कोल्हापुरी चप्पल बनविणे आवश्यक आहे. उद्योजक, कारागिरांचे जीवनमान उंचावून कोल्हापुरी चप्पलला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या एमएसएमई सीडीपी या योजनेअतर्गंत कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूर जिल्हा चर्मवस्तू उत्पादक विक्रेता संघटनेस कोल्हापुरी चप्पल क्लस्टर म्हणून २४ जुलै २००८ला पत्र दिले आणि जि.उ.के./क्लस्टर/बी-२९१६२ या पत्राद्वारे मंजुरी दिली.
प्राथमिक निदानात्मक अहवाल (डायग्नोस्टीक स्टडी) मिटकॉन या संस्थेने पूर्ण करुन लघु उद्योग मंत्रालयाला सादर केला होता तो मंजुर होऊन शासनाने कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारणीसाठी रु. १५ कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे.
कोल्हापुरी चप्पल कारागिरांचे कसबी हात, हस्तकला, कलाकुसर अशा स्वबळावर विकासाची वाटचाल करणाऱ्या कोल्हापुरी चप्पल उद्योगाला या क्लस्टर योजनेमुळे भविष्यात प्रगतीची झेप घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. राज्याच्या व देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठेत आपल्या नाविन्यपूर्ण गुणधर्मामुळे कोल्हापुरी चप्पल हे नाव कमावलेल्या आणि स्वत:च्या प्रगतीबरोबरच देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी या क्लस्टर योजनेचा उपयोग होणार आहे.
तसेच आरोग्याच्या दृष्टीने गुडघेदुखी, पायाची जळजळ, डोळे रखरखणे, डायबेटिज (शुगर), ब्लड प्रेशर, सुरळीत रक्ताभिसरण यासाठी सुद्धा कॉपर सर्किट, मॅग्नेट व कुशनिंगचा वापर करुन डॉक्टर कोल्हापुरी चप्पलची निर्मिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्याचा मुख्य उद्देश आहे. कापशी, कुरुंदवाडी, मेहरबान, सहावेणी, पंचिंगपट्टा, खास कोल्हापुरी चप्पलला आधुनिक व आरोग्यपूर्ण बनविण्याचा प्रश्न असणार आहे.
क्लस्टर योजनेतुन मिळणा-या सेवा सुविधा
Ø अद्यावत कॉमन फॅसिलिटी सेंटर (प्रात्यक्षिक व डेमोसाठी मॉडेल युनिट)
Ø तांत्रिक कमतरता ओळखून दर्जा व गुणवत्तेची नव्याने मांडणी करणे.
Ø आधुनिक कलाकुसर (हस्तकला) यासाठी कारागिरांना प्रशिक्षण देणे. (व्हॅल्यु ॲडेड प्रॉडक्ट तयार करणे)
Ø आतापर्यंत बनत असलेल्या कोल्हापुरी चप्पलबरोबर नावीन्यपूर्ण नवीन अनेक डिझाईनमध्ये आकर्षक कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे प्रशिक्षण देणे.
Ø महिला कारागिरांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणे.
Ø बैठका, चर्चासत्रे संवादाद्वारे स्थानिक गरजासाठी प्रयत्न करणे.
Ø कारागिरांनी बनविलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठा मिळवून देणे.
Ø कोल्हापुरी चप्पलची देशात व परदेशात वेबसाईटवरून प्रसिध्दी करणे.
Ø शिवाजी विद्यापीठ अधिविभागामार्फत ॲनॅलिसिस मार्केटींगसाठी चर्चासत्रे, लॅबोरेटरी, लायब्ररी संशोधनासाठी सुविधा पुरविणे.
Ø कोल्हापुरी चप्पलसाठी स्वामित्व (पेटंट) साठी प्रस्ताव सादर करणे.
Ø कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या विकासासाठी व तरुण कारागीर उद्योजक तयार होण्यासाठी व स्वयंरोजगारासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस (सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा) एक व दोन सत्राचे (सेमिस्टर) चालू करणे.
No comments:
Post a Comment