कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन
स्पर्धेसाठी निवड
![]() |
नवी मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत सहभागी झालेला शिवाजी विद्यापीठाचा संघ डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि डॉ. नेहा जोशी यांच्यासमवेत. |
कोल्हापूर, दि. ३१
जानेवारी: नवी मुंबई येथील
डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या ‘पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन
स्पर्धा २०२४-२५’ मध्ये
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला
येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये स्थान प्राप्त केले
आहे.
नवी मुंबईच्या
डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ३० व ३१ जानेवारी अशी दोनदिवसीय पश्चिम विभागीय
अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५ पार पडली. आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
झाला. त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या दोन गटांत शिवाजी
विद्यापीठाने प्रथम क्रमांक आणि मूलभूत विज्ञान गटात तृतीय क्रमांक मिळविला.
कृषी व संलग्न
क्षेत्रे या गटात विघ्नेश उत्तम पाटील, ताहीर निसार मुल्ला आणि दीक्षा निवास
घोसरवाडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांनी शेती व्यवस्थापनासह जनावरांची
देखभाल करणारा ‘कृषी
रोबोट’ सादर केला. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात शुभम
गिरीगोसावी, बालाजी प्रकाश पाटील आणि रोहित गणपती गवळी यांनी प्रथम क्रमांक
प्राप्त केला. धरणाच्या भिंतीला धोका झाल्यास संभाव्य जीव व वित्तहानी टाळण्यासाठी
आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणालीचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केले. मूलभूत
विज्ञान गटात सुषमा राजीव देशमुख व अनुष्का रॉय यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
त्यांनी दुर्मिळ वनस्पती घटकांपासून औषध निर्मितीचा प्रकल्प सादर केला.
विजेत्यांना भारतीय विद्यापीठ महासंघाच्या (ए.आय.यू.) संशोधन विभागाचे संचालक डॉ.
अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे
प्राचार्य डॉ. एम.डी. पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संशोधकांना त्यांचे प्रकल्प आता मार्चमध्ये अंबाला येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
स्पर्धेच्या सामाजिक विज्ञान व
मानव्यशास्त्रे, आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे, मूलभूत विज्ञान व उपयोजित
विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व संलग्न क्षेत्रे आणि आंतरविद्याशाखीय
संशोधन या सहा संशोधन गटांमध्ये विद्यापीठाचा
१४ जणांचा संघ सहभागी झाला. संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र
अधिविभागातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि सांगली येथील विलिंग्डन
महाविद्यालयाच्या डॉ. नेहा जोशी यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील
विजेत्यांसह सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग
संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह आविष्कार समन्वयक डॉ. डी. एच. दगडे,
जीवरसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी. के. पवार आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे डॉ.
एस. डी. जाधव यांनी अभिनंदन केले आहे.