|
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ समाक्षक डॉ. रणधीर शिंदे. मंचावर (डावीकडून) पल्लवी कोरगावकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अविनाश भाले. |
|
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ समाक्षक डॉ. रणधीर शिंदे. |
कोल्हापूर, दि. १६
सप्टेंबर: सायबर समाजाच्या वाढत्या प्राबल्यामुळे मानवाचा तसेच
परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो आहे. त्यातून एकांगी समाजनिर्मितीचा धोका आज
महाराष्ट्रासह एकूणच मानवतेसमोर उभा आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर
शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या
वतीने आयोजित प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेमध्ये ‘महाराष्ट्रातील समाजजीवन व परिवर्तन’ या विषयावर ते बोलत होते. मानव्यशास्त्र
सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक तथा वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते, तर पल्लवी
कोरगावकर प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. शिंदे म्हणाले, डिजीटल, संगणकीय व स्मार्टफोनसारख्या संवाद माध्यमांच्या
अफाट उपलब्धतेमुळे आजची पिढी सायबर समाज बनली आहे. खऱ्या, खोट्या माहितीच्या
सैरभैर करणाऱ्या भोवतालामध्ये समाजाचा अवकाश मर्यादित होत चालला आहे.
भास-आभासांच्या दुनियेमध्ये स्वमग्न समाज निर्माण होऊ पाहतो आहे. अनुत्पादक समाज
निर्मितीमागे भांडवलदारी षडयंत्र कार्यरत आहे की काय, अशी शंका येण्याइतपत वातावरण
गढुळले आहे. मानवाच्या बौद्धिकतेवर संशय व्यक्त व्हावे, इतके कृत्रिम बुद्धिमत्तेकडे
आपण वळलो आहोत. यामुळे एकूणच मानवी सर्जनशीलता धोक्यात आली आहे. एकच सूर मोठा होऊ
पाहात असताना बहुआवाज मात्र नष्ट होत आहेत. यामुळे एकूणच सामाजिक चळवळींचा अवकाश
आक्रसत चालला आहे. परिवर्तनवादास खीळ बसली की त्यातून सामाजिक अनारोग्याचा धोका
निर्माण होतो. त्या धोक्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.
डॉ. रणधीर शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आपल्या व्याख्यानात साद्यंत
वेध घेतला. ते म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज
आणि संतपरंपरेच्या पुरोगामी विचारसरणीच्या पायावर महाराष्ट्राची उभारणी झाली आहे.
महात्मा फुले यांनी मनुवादी व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस दाखविले,
तर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन करून तेच पुगोमागित्वाचे सूत्र अधिक विस्तृत केले.
त्यांचा संपूर्ण लढा हा समतेसाठी, मानवी अधिकारांसाठी होता. सामाजिक, राजकीय
स्वातंत्र्यासाठीचा झगडा होता. साठच्या दशकात यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या
पुनर्घटनेत योगदान दिले, तेच मुळी फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स यांच्या
दृष्टीकोनातून विकास करण्याचे स्वप्न बाळगून. भौतिक जीवनात उन्नती साधत असतानाच
त्याच्याशी साहित्यिक, सांस्कृतिक मिलाफ आवश्यक आहे, याचे भान त्यांच्या ठायी
होते. म्हणूनच तर ते कधी कोयना धरणाची सफर ते कवी, साहित्यिकांना घडवित, तर सांस्कृतिक
केंद्र हे महाराष्ट्राचे ऊर्जाकेंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत.
साठोत्तरी कालखंडात उदयास आलेल्या अनेक सामाजिक चळवळींचा मागोवा घेताना डॉ.
शिंदे म्हणाले, साठोत्तरी कालखंडात साठ ते ऐंशीचे दशक आणि ऐंशी ते दोन हजार असे
टप्पे येतात. द्वंद्वात्मक समाजाची आवश्यकता अधोरेखित करणारा हा झंझावाती कालखंड
होता. याच काळात दलित पँथरसारखी जातशोषणाविरुद्ध बुलंद आवाज घेऊन उभी राहिलेली
चळवळ होती, युक्रांद होती. साहित्याच्या क्षेत्रात दलित साहित्य चळवळ,
लघु-नियतकालिक चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्रीवादी चळवळ आणि तेथून पुढे
जागतिकीकरणाचा सामाजिक-आर्थिक चळवळींचा अवकाश मर्यादित करणारा कालखंड असे टप्पे
आहेत. या चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून
साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे
द्वंद्वात्मक चळवळींची समाजाचे प्रवाहीपण टिकविण्यासाठी आवश्यकता असते. मात्र,
चळवळींमध्ये एकारलेपण अथवा एकांगीपण येणे मात्र एकूण सामाजिक आरोग्याला हानीकारक
असते, याची जाणीव ठेवून सुदृढ समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी
चळवळींचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करीत राहणे महत्त्वाचे आहे. ‘मी माणसाचे गीत गात आहे,’ या कवी नामदेव ढसाळ यांच्या
कवितेने त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
‘कोरगावकरांचे दातृत्व आदर्शवत’
प्रभाकरपंत कोरगावकर यांनी सत्पात्री दान कसे असावे, याचा आदर्श आपल्या
स्वतःच्या उदाहरणातून घालून दिला. पडद्यामागे राहून अत्यंत विरक्त वृत्तीने त्यांनी
बाबा आमटे यांच्यापासून माधवराव बागल, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, प्र.के.
अत्रे, गो.नी. दांडेकर यांच्यापर्यंत अनेकांना मदत केली. काहींना तर वार्षिक
स्वरुपात आर्थिक मदत दिली, पण त्याची कोठेही वाच्यता केली नाही. दुष्काळाच्या
कालखंडात कोल्हापूरकरांना बार्शीहून ज्वारी आणून वाटली. ‘प्रभाकरपंतांची जोंधळ्याची रांग’ म्हणून ती प्रसिद्ध झाली. अत्यंत
विरक्त वृत्तीने त्यांनी लोकांना मदत केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू भा.शं.
भणगे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे अनुबंध होते, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. महाजन म्हणाले, समाजाची वाटचाल होत असताना सकारात्मकता
व नकारात्मकता यांमधील द्वंद्व आवश्यक असते. विविध दृष्टीकोनांचा परस्परपूरक
साकल्याने विचार करून त्याचा सामाजिक विकासासाठी वापर करणे आवश्यक असते.
महाराष्ट्राने सातत्याने परिवर्तनवादाला बळ दिलेले आहे. यातूनच त्याचे
महाराष्ट्रपण विकसित झालेले आहे. त्याला बाधा येणे कोणालाही परवडणारे नाही. सद्यस्थितीत
सामाजिक स्वमग्नतेतून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याबरोबरच स्वातंत्र्य,
समता, बंधुता या मूल्यांचे अस्तित्व टिकविण्याचेही आव्हान आपल्यासमोर उभे असल्याचे
त्यांनी सांगितले.
कोरगावकर व्याख्यानमालेअंतर्गत अनेक मान्यवर वक्त्यांची व्याख्याने झाली आहेत.
त्या व्याख्यानांचे संपादित ग्रंथरुपात प्रकाशन करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न
करेल, असे त्यांनी सांगितले.
पल्लवी कोरगावकर यांनी प्रभाकर कोरगावकरांनी आपली सर्व संपत्ती ट्रस्टच्या
माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी दिल्याचे सांगितले. प्रभाकरपंत कोरगावकरांच्या
दातृत्वाचा वारसा सांभाळण्यासाठी आम्ही सारे कुटुंबिय वचनबद्ध असल्याचे त्यांनी
सांगितले. त्याचप्रमाणे सदर व्याख्यानमालेसाठी आणखी सव्वालाख रुपयांचा निधी लवकरच
कुलगुरूंकडे सुपूर्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सुरवातीला डॉ. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर
डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास आजीवन अध्ययन विभागाचे डॉ.
रामचंद्र पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ.
औदुंबर सरवदे, डॉ. प्रभंजन माने, भरत शास्त्री यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.