Tuesday, 31 October 2023

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना

 

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यापीठ संघास शुभेच्छा प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह अन्य अधिकारी.

कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: इंदौ (मध्य प्रदेश) येथील अहिल्यादेवी विद्यापीठात येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी सदर संघाला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या व सुयश चिंतले. कबड्डी संघात मार्गदर्शक म्हणून डॉ. रमे भेंडिगरी, डॉ. डी. बी. बिरनाळे आणि अजित शेळके संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

विद्यापीठाचा कबड्डी संघ असा: साईप्रसाद तुकराम पाटील (शाहू कॉलेज, कोल्हापू), वैभव साताप्पा रबाडे (शाहू कॉलेज, कोल्हापूर), प्रतिक शामराव पाटील (शाहू कॉलेज, कोल्हापू), सौरभ तानाजी फगरे (नाईट कॉलेज, इचलकरंजी), दिपक पांडुरंग पाटील (नाईट कॉलेज, इचलकरंजी), वैभव अधिकराव वाघमोडे (नाईट कॉलेज, इचलकरंजी), षिके विलास जाधव (बी. एम. कॉलेज, रहिमतपू) शुभम माणिक पाटील (बी.एम. कॉलेजरहिमतपूर)

विद्यापीठस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघास विजेतेपद

 आदित्य सावळकरची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्यापीठस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत सर्वसाधारण विजेत्या संघाचे अभिनंदन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व डॉ. प्रल्हाद जाखले


कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या बीए-स्पोर्ट्सचा विद्यार्थी आदित्य मुकुंद सावळकर याने स्पर्धे वैयक्तिक प्रथम क्रमांक पटकावून आंतरविभागीय स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला. विजेत्या संघाचा सत्कार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. विजयी संघामध्ये आदित्य मुकुंद सावळकर याच्यासह सत्यजीत सुरेश माने, राहुल मरगु लोखंडे आणि श्रीधर शिवाजी निंबाळकर यांचा समावेश आहे.

यानंतर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे दि. २७ ते २९ क्टोबर या कालावधीत पार पडलेल्या आंतरविभागीय बुध्दिबळ स्पर्धे आदित्य मुकुंद सावळकर याने चतुर्थ क्रमांक पटकावला. त्याची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सरदार पटेल जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात एकता दौड

 इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

शिवाजी विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात एकता दिनानिमित्त एकता व अखंडतेची शपथ घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह उपस्थित अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात एकता दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एकता रॅली काढण्यात आली. फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

 

कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने या महान नेत्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत एकता दौड आयोजित करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विद्यापीठ प्रांगणात मुख्य प्रशासकीय भवनापासून एकता दौड आय़ोजित करण्यात आली. कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. शिंदे यांनी फ्लॅग-ऑफ करून एकता दौडीचे उद्घाटन केले. दौडीनंतर सर्व उपस्थितांना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकता व सद्भावना यांची शपथ देण्यात आली.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. किरण कुमार शर्मा, कार्यक्रम अधिकारी अमोल कुलकर्णी यांच्यासह अधिविभागाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि एनएसएस विभागाचे कर्मचारी व शंभरहून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते.

Monday, 23 October 2023

विद्यापीठात ‘अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहा’चे उद्घाटन

 दिवंगत मुलीप्रती प्रेमाचे, ज्ञानाप्रती आस्थेचे चिरंतन प्रतीक: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या आणि रजनी व पंडित मारुलकर या दांपत्याच्या हस्ते कोनशिला अनावरणाने झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीत फीत कापून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, पंडित मारुलकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, रमेश पोवार, डॉ. रघुनाथ ढमकले, रजनी मारुलकर, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. जगदीश सपकाळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले.


कोल्हापूर, दि. २३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृह हे आईवडिलांचे आपल्या दिवंगत मुलीप्रती प्रेमाचे आणि ज्ञानाप्रती आस्थेचे चिरंतन प्रतीक म्हणून ओळखले जाईल, अशी भावपूर्ण अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे माजी सहाय्यक कुलसचिव पंडित सदाशिव मारुलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रजनी मारुलकर यांनी त्यांची दिवंगत कन्या अस्मिता हिच्या स्मरणार्थ विद्यापीठास दिलेल्या ३५ लाख रुपयांच्या निधीमधून विद्यापीठात उभारण्यात आलेल्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अस्मिता मारुलकर हिच्या स्मृतींचा गहिवर तिच्या आईवडिलांसह या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनी दाटलेला होता. त्यामुळे मारुलकर कुटुंबियांच्या सत्पात्री दानातून साकार झालेला हा उद्घाटन समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वसतिगृहाच्या रुपाने अस्मिताचे भव्य आणि चिरंतन स्मारक विद्यापीठात उभे राहिल्याचे समाधान मारुलकर दांपत्याच्या मनी दाटून आले. एका डोळ्यांत तिच्या आठवणींचे आसू, अन् दुसऱ्यात समाधानाचे हसू अशी त्यांची अवस्था झाली होती.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मारुलकर दांपत्याने शिवाजी विद्यापीठास दिलेला ३५ लाखांचा निधी हा आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने व्यक्तीगत पातळीवर दिलेला सर्वाधिक निधी आहे. यातून त्यांनी विद्यापीठाशी चिरंतन नाते जोडले आहे. या त्यांच्या दातृत्वातून केवळ हे एकच वसतिगृह साकार झाले आहे, असे नाही; तर यातूनच लोकवर्गणीतून विद्यार्थिनींसाठी लोकस्मृती वसतिगृह निर्माण करण्याची संकल्पना साकार झाली असून त्या दृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी संशोधक विद्यार्थिनींच्या गरजा लक्षात घेऊन या वसतिगृहाची विचारपूर्वक उभारणी केल्याचे लक्षात येते, असे सांगितले. यावेळी पंडित मारुलकर यांनी अस्मिता हिच्या स्मृतींना उजाळा दिला आणि विद्यापीठाने सव्वा वर्षाच्या विक्रमी कालावधीत या वसतिगृहाची देखणी इमारत उभी केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ प्रशासनास धन्यवाद दिले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, रजनी मारुलकर, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. केदार मारुलकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, रमेश पोवार, अभियांत्रिकी उपकुलसचिव रणजीत यादव, विद्यार्थिनी वसतिगृह मुख्य अधीक्षक डॉ. प्रतिमा पवार, डॉ. माधुरी वाळवेकर, अमित कांबळे यांच्यासह अभियांत्रिकी व विद्युत विभागाचे कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृह

वसतिगृहाविषयी थोडक्यात...

अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची इमारत तळमजला व पहिला मजला (प्रत्येकी १७५० चौरस फूट असे एकूण ३५०० चौरस फूट बांधकाम) अशी दुमजली आहे. इमारतीमधील आठ प्रशस्त खोल्या स्वच्छतागृह संलग्न असून प्रत्येक मजल्यावर पॅन्ट्री, वेटिंग फॉयर यांची सुविधा आहे. इमारतीसमोर पेव्हिंग ब्लॉक्स बसविले आहेत. या इमारतीचे आरसीसी डिझाईन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने केलेले आहे.

मारुलकर दांपत्याच्या दातृत्वास विद्यापीठाचा सकारात्मक प्रतिसाद

अस्मिता मारुलकर या आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्याची तरतूद म्हणून रजनी व पंडित मारुलकर या दांपत्याने सुमारे ३५ लाख रुपयांची बचत केलेली होती. तथापि, तिच्या अकाली निधनानंतर अस्मिताचाच अधिकार असलेला हा निधी स्वतःसाठी न वापरता समाजासाठी वापरण्याचा निर्णय या ज्येष्ठ दांपत्याने घेतला आणि शिवाजी विद्यापीठाकडे गतवर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी ३५ लाखांचा निधी सुपूर्द केला. त्यातून विद्यापीठाने १५ दिवसांत कमवा व शिका विद्यार्थिनी वसतिगृहाच्या शेजारील जागा निश्चित करून ३० ऑगस्ट रोजी मारुलकर दांपत्याच्याच हस्ते संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची पायाभरणी केली. त्यानंतर अवघ्या सव्वा वर्षांच्या कालावधीत अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची देखणी इमारत उभी राहिली आणि तिचे उद्घाटनही झाले. विद्यापीठाच्या या सकारात्मक कृतीचे मारुलकर कुटुंबियांनी मनापासून कौतुक केले.

Sunday, 22 October 2023

पर्यावरणपूरकतेकडे जागतिक समुदायाचा कल वाढणे गरजेचे: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

 शिवाजी विद्यापीठामध्ये ग्यान कार्यशाळेचा समारोप

शिवाजी विद्यापीठात पाच दिवसीय 'ग्यान' कार्यशाळेच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे स्वागत करताना रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनावणे. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. महादेव देशमुख, डॉ. पी.पी. वडगावकर, डॉ. जी.बी. कोळेकर आणि डॉ. केशव राजपुरे.


कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: अक्षय ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरकता जपण्याकडे जागतिक समुदायाचा कल वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पाचदिवसीय ग्यान कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी (दि. २०) झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथील वरिष्ठ संशोधक डॉ. पी. पी. वडगावकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, पदार्थ व ऊर्जा (मटेरियल अँड एनर्जी) हे दोन्ही घटक केवळ एखाद्या देशाच्या नव्हे, तर अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. खनिज उर्जासाधनांच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होत असलेले बदल रोखण्याकरिता अक्षय उर्जेचा वापर विविध कार्यात्मक पदार्थांच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.  त्यातूनच कार्बन-डायऑक्साईड व इतर हरित वायूंचे प्रमाण कमी होईल. त्यासोबतच हायड्रोजन वायूआधारित संशोधनाकडे संशोधकांनी भर देणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. वडगावकर म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा मिळेल. त्यातून साकारणारे संशोधन समाजोपयोगी असेल.

यावेळी समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी या कार्यशाळेचा आढावा घेतला. रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. जी. बी. कोळेकर यांनी आभार मानले.

 

प्रा. पी.व्ही. कामत यांचे सर्वंकष मार्गदर्शन

अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठातील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. पी.व्ही. कामत यांनी पाच दिवसीय ग्यान कार्यशाळेत शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान यांविषयी सर्वंकष माहिती विविध व्याख्यानांतून दिली. अगदी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अनुषंगानेही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. कामत यांनी कार्यात्मक पदार्थ व ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन संशोधन व तंत्रज्ञानाविषयी व्याख्याने दिली. कार्यात्मक पदार्थांमध्ये प्रामुख्याने धातू व धातू ऑक्साईड संमिश्रे, कार्बन संमिश्रे, नॅनो संमिश्रे, इत्यादींचा वापर करून कमी खर्चिक व अधिक उपयुक्त सौरघट, ग्रीन हायड्रोजन निर्मिती, प्रदूषके नियंत्रित करण्यासाठीच्या प्रक्रिया यांवर त्यांनी भर दिला. तसेच, जागतिक स्तरावरील नेट कार्बन झिरो, मिशन ग्रीन हायड्रोजन, प्रदूषके नियंत्रित करण्यासाठीची विविध धोरणे  इत्यादी विषयांवर त्यांनी संशोधकांशी सविस्तर चर्चा केली.

Saturday, 21 October 2023

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठाची ‘पाण्यासाठी चाला’ रॅली

जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या विशेष रॅलीचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व अन्य सहभागी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी.
 
जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. पी.डी. पाटील व अन्य सहभागी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी.


जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीत 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' या मध्यवर्ती विषयावर पथनाट्य सादर करताना अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

(शिवाजी विद्यापीठाच्या जागतिक अन्न दिन रॅलीचा संपादित व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी रोखणे ही जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने वॉक फॉर वॉटर (पाण्यासाठी चाला) ही विशेष जनजागरण रॅली काढण्यात आली. तिच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू बोलत होते.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठापासून राजारामपुरीतील माऊलीच्या पुतळ्यापर्यंत आणि परत अशी रॅली काढण्यात आली. यंदा 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' असा विषय असल्याने त्या अनुषंगाने प्रबोधन करणारे फलक रॅलीत होते. पाणी वाचवा-जीवन वाचवा, पाणी वाचवा-पृथ्वी वाचवा असे पाणीबचतीचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' याच विषयावर शिवाजी विद्यापीठ परिसर, माऊली पुतळा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली.

यावेळी रॅलीत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. इराण्णा उडचण, डॉ. अमोल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉ. अभिजीत गाताडे, हर्षवर्धन कांबळे आणि स्नेहल खांडेकर यांनी रॅलीचे यशस्वी संयोजन केले.


पथनाट्यातून जलसंवर्धनाचा संदेश

यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी जलबचत व संवर्धनाचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याचे व त्यातील गीतांचे डॉ. अभिजीत गाताडे यांनी लेखन व दिग्दर्शन केले. यामध्ये सिमरन कदम, श्रेयश पाटील, रेवती भोसले, प्रज्ञा कांबळे, सुप्रिया निकम, यश पाटील, साक्षी गंगवाणी, ओंकार म्हेत्रे, ऋतुजा पाटील, वरद रायबागे, वैष्णवी बिवाल, राधा शिंदे, साक्षी कदम, अनुष्का जाधव, वरदा पटवर्धन, ज्योती गुरव, आदिती मगर, दिगंबर मगदूम, ऋषीकेश म्हमाने, निशा लटके, शालिक राठोड आणि शिवानी गजबर यांनी भूमिका केल्या. विभागाच्या विद्यार्थ्यांनीच गीतगायन केले.