शिवाजी
विद्यापीठात पाच दिवसीय ‘ग्यान’ कार्यशाळेस प्रारंभ
शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय 'ग्यान' कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठाचे डॉ. पी.व्ही. कामत. |
कोल्हापूर, दि. १६
ऑक्टोबर: संपूर्ण जगभरात
ऊर्जेचे संकट भेडसावत आहे. जगाला स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे पर्याय शोधण्याची निकड
भासत आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे शास्त्रज्ञ व अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.
पी.व्ही. कामत यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडेमिक नेटवर्क’ अर्थात ‘ग्यान’
उपक्रमांतर्गत आयोजिलेल्या पाचदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत
होते. या उपक्रमात डॉ. कामत ‘अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स अन्ड ग्रीन एनर्जी स्ट्रॅटेजीस्’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्याने
देणार आहेत. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.
माणिकराव साळुंखे, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.
डॉ. कामत म्हणाले, नजीकच्या काळात वाढत्या उर्जेची गरज भागविण्यासाठी
पर्यावरणीयदृष्ट्या आपल्याला स्वच्छ उर्जेचे पर्याय शोधावे लागणार आहेत. त्यासाठी
पायाभूत सुविधांपासून ते हरित उर्जा निर्मितीपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये
नवसंशोधनाची गरज निर्माण झाली आहे. जगभरातील संशोधन या दिशेने केंद्रित झालेले आहे.
आपल्या विद्यार्थ्यांनाही येथे संशोधनाची पुरेपूर संधी आहे. ती त्यांनी घेतली
पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांची उत्तरे प्राप्त
करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, जागतिक स्तरावर शाश्वत विकासाच्या
प्राधान्यक्रमावर स्वच्छ उर्जा हा विषया सातव्या स्थानी आहे. जी-२० परिषदेने
मानवजातीसमोरील समस्यांचे नव्याने अधोरेखन केले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी
धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने संशोधकांमधील संशोधन विषयांच्या दरी
संपुष्टात आणून बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन दिले पाहिजे.
त्याद्वारे हरित ऊर्जाविषयक संशोधन व्हावे, जेणे करून या समस्येचे निराकरण शक्य
होईल.डॉ. माणिकराव साळुंखे
डॉ. दिगंबर शिर्के |
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून
कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी
स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. कैलास
सोनावणे यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यापीठाचे ‘ग्यान’
समन्वयक डॉ. केशव राजपुरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment