Tuesday, 17 October 2023

अंत्योदयाकडून सर्वोदयाकडे वाटचालीतूनच सामाजिक समावेशन शक्य: किशोर बेडकिहाळ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ. मंचावर डॉ. श्रीकृष्ण महाजन व अविनाश भाले.


कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: खऱ्या सामाजिक समावेशनासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेला अंत्योदयाकडून सर्वोदयाकडे वाटचाल करण्याचा विचार महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित ‘महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टीकोन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. बेडकिहाळ यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. बेडकिहाळ पुढे म्हणाले, भारतामध्ये भेदाभेदाची परंपरा जात, वर्ण व लिंगावर आधारलेली होती. त्याविरोधात महात्मा गांधींनी संघर्षात्मक पवित्रा घेतला. विकासाची प्रत्येक प्रक्रिया नैतिक असतेच असे नाही. विकासाच्या प्रक्रियेत विस्थापित होणारा प्रमुख घटक हा दलित, आदिवासी आणि स्त्रियाच असतात आणि ही विस्थापनाची प्रक्रियासुद्धा सामाजिक वंचिततेस कारणभूत ठरणारी आहे. परंपरा, सत्तासंबंध, विकासाची प्रक्रिया आणि शासनाची धोरणे या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वंकष स्वरूपाची सामाजिक वंचितता अथवा बहिष्कृतता निर्माण होते. राजकीय चौकटीमध्ये सध्या आपण तत्त्वत: सर्वांना समान संधी दिलेली असली तरी व्यवहारामध्ये मात्र ही भेदाभेद कायम आहे. सध्या प्रतिकात्मक समावेशनाचा विचार मांडला जातो आहे. तसेच, प्रतिकात्मक योजनांद्वारेच लाभार्थी निर्माण केले जात आहेत. अशा प्रकारच्या सामाजिक समावेशानातून वंचित समुदायांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही.

ते पुढे म्हणाले, महात्मा गांधींनी सामाजिक वंचितता संपुष्टात आणण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये हरिजन जोडप्यांना प्रवेश दिला. त्यास विरोध करणाऱ्या स्वत:च्या बहिणीस आश्रमाबाहेर काढले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला.  चरखा संघाच्या कामामध्ये अस्पृश्यांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले आणि त्यांना रोजगार मिळवून दिला. सवर्ण व अस्पृश्य आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. महात्मा गांधींचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक बहिष्कृतता नष्ट करण्यासाठी अहिंसा, आसक्तीमुक्त व सर्वसमान स्पर्श भावना या समभावावर आधारित समाज त्यांना अभिप्रेत होता.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महाजन म्हणाले, सामाजिक समावेशनासाठी राजकीय प्रक्रियेत सहमती व लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गावच्या विकासासाठी नैसर्गिक संसाधने वापर लोकांच्या हातामध्ये असली पाहिजेत. महात्मा गांधी कृतीशील विचारवंत होते. ते आपल्या वैचारिक आयुष्यामध्ये कसे कसे बदलत गेले, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

सुरवातीला डॉ. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. व्याख्यानास दशरथ पारेकर, व्यंकप्पा भोसले, केशव हरेल, डॉ. अरुण शिंदे, अनमोल कोठडिया, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. विद्यानंद खंडागळे,  डॉ. शोभा शेट्ये, डॉ. सुखदेव उंदरे आदी उपस्थित होते. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी शरद पाटील, पल्लवी गिरी-गोसावी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment