Saturday 14 October 2023

शिवाजी महाराजांनी प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्मिले

डॉ. जयसिंगराव पवार यांचे शिवजागर परिसंवादात प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सदानंद मोरे.



शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सदानंद मोरे, डॉ. गणेश राऊत आणि अनिल पवार.



शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनिश पाटील, डॉ. अशोक चौसाळकर,  डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. गणेश राऊत आणि अनिल पवार. 


कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर: छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवर नव्हे, तर प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र, कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवजागर या विशेष परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, शिवराज्याभिषेकाचे हिंदुस्थानच्या इतिहासात अतिशय मोलाचे स्थान होते. राज्याभिषेकाची संकल्पना शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांना सुचणे हीच मुळी क्रांतीकारक बाब होती. स्वतंत्र राज्य निर्मितीबरोबरच त्यामध्ये सार्वभौमत्वाच्या संकल्पनेला मोठे स्थान महाराजांनी त्यात दिले होते. कारण देवगिरीचे राज्य संपुष्टात येऊनही सुमारे ३५० वर्षे त्यावेळी उलटली होती. मराठे विविध शाह्यांबरोबरच मानसिक गुलामगिरीत अडकून पडले होते. त्यांना महाराजांनी स्वराज्य दिले, ही मूलगामी बदल होता. राज्याभिषेक झाले असतील, पण राज्याभिषेकाची जाहीर घोषणा होणे हा भारताच्या इतिहासातील अपवादात्मक क्षण होता.

डॉ. पवार पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या मनात स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाच्या बरोबरीनेच दिल्ली काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा होती, याचे पुरावे आहेत. पण, अकाली निधनामुळे ते शक्य झाले नाही. त्यांच्या माघारी स्वराज्याची व्यापक संकल्पना त्यांच्या वंशजांना पेलली नाही, किंबहुना समजलीच नाही, याची मोठी खंत वाटते. स्वराज्याचा विस्तार निश्चितपणे झाला, मात्र त्यांना सार्वभोमत्वाचा विसर पडला होता. सार्वभोमत्व सोडले नसते, तर या भारतात वेगळे चित्र दिसले असते. नंतरच्या राज्यकर्त्यांना खरे शिवाजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान समजलेच नाही. ते समजून घेण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, शिवराज्याभिषेक ही इतिहासाचा प्रवाह बदलणारी घटना होती आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे इतिहास नायक होते. त्यांच्या नायकत्वावर शिक्कामोर्तब करणारा हा दिवस आहे. औरंगजेबासारख्या बादशहाने निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाहीसारख्या मोठ्या शाह्या संपविल्या, पण त्याच्या दृष्टीने टीचभर असणारे मराठ्यांचे स्वराज्य मात्र त्याला अखेरच्या क्षणापर्यंत संपविता आले नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून ते महाराणी ताराराणी यांच्यापर्यंत मराठ्यांनी त्याला चांगलेच झुंजवित ठेवले. त्याला स्वराज्य जिंकता आले नाही, याला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. मराठ्यांमुळेच पुढे दिल्ली वाचली, हे मराठ्यांचे भारतावर थोर उपकार आहेत. अन्यथा या भारतावर अफगाणांचे वर्चस्व प्रस्थापित झाले असते आणि पुढला इतिहास काही निराळाच निपजला असता. या सर्व घडामोडींमागे शिवराज्याभिषेकाचे फार मोलाचे योगदान आहे, हे अभ्यासांती लक्षात येते.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शिवाजी महाराजांच्या राजसत्तेला अधिमान्यता मिळवून देणे, हा शिवराज्याभिषेकामागील प्रमुख हेतू होता. हा राज्याभिषेक करवून घेत असताना महाराजांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये मातब्बर सरदार-दरकदारांपासून ते धार्मिक सनातनी प्रवृत्तींचा समावेश होता. त्यातूनही धर्मशास्त्रातील अडथळे दूर करीत महाराजांनी हा राज्याभिषेक घडवून आणला. मोठे ध्येय साध्य करावयाचे असल्यास छोट्या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करावयास पाहिजे, या न्यायाने त्यांनी अनेक बाबींकडे काणाडोळा केला. कायदेनिष्ठ अथवा वलयांकित अधिमान्यतांच्या खेरीज काही प्रसंगी पारंपरिक अधिमान्यतेला महत्त्व देणे अगत्याचे ठरते, याचे भान महाराजांच्या ठायी होते. त्यातूनच त्यांनी राज्याभिषेकाला महत्त्व दिले. महाराजांच्या या राज्याभिषेकाच्या निर्णयामुळेच पुढे भारताचा राजकीय नकाशा बदलला. मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकला, यामागे महाराजांचीच प्रेरणा होती, हे नाकारता येणार नाही.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवराज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. शिवजागर या उपक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात निश्चितपणे यश येईल. शिवाजी विद्यापीठानेही या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे. शिवाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व आणि त्यांच्या प्रेरणा समजून घेऊन त्यांचे समकाळाच्या माध्यमातून उपयोजन करणे याची मोठी गरज आज आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. इतिहास अधिविभागप्रमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल पवार यांनी शिवराज्याभिषेक या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रेरणा व भूमिका विषद केली. चेतन कोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. गणेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवर इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विद्यापीठ परिक्षेत्रातील वीसहून अधिक महाविद्यालयांचे इतिहासाचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment