Wednesday 4 October 2023

कविता जगण्याचे अवमूल्यन रोखते: डॉ. राजन गवस

विद्यापीठात कवठेकर, सोळंकी यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

 

शिवाजी विद्यापीठात काळसेकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. मंचावर (डावीकडून) आदित्य काळसेकर, नारायण कुलकर्णी-कवठेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, वर्जेश सोळंकी व डॉ. नंदकुमार मोरे.


शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर यांना प्रदान करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, आदित्य काळसेकर, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, वर्जेश सोळंकी व डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठाचा ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार कवी वर्जेश सोळंकी यांना प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, आदित्य काळसेकर, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, नारायण कुलकर्णी-कवठेकर व डॉ. नंदकुमार मोरे.


कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: माणसाने कितीही प्रगती केली, तरी त्याच्या सांस्कृतिक विकासासाठी कवितेची आवश्यकता असते. यंत्रे माणसाची किंमत कमी करतात, तर कविता जगण्याचे अवमूल्यन रोखते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२३च्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारांच्या प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी- कवठेकर यांना काव्य क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर प्रसिद्ध कवी वर्जेश सोळंकी यांना आश्वासक कवितालेखनासाठीचा ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार डॉ. गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप अनुक्रमे २१ हजार रुपये व १० हजार रुपये आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह असे आहे.

डॉ. गवस म्हणाले, कोणत्याही संस्कृतीचा विकास करण्यामध्ये कविता हातभार लावत असते. कविता जगणे निर्मळ व नितळ करते. आयुष्यातून कविता वजा करून जगणे अजिबात शक्य नाही. कविता माणसाला, संस्कृतीला उन्नत करते. कवितेतील आवर्तने माणसाला जगे करून विचारप्रवण करतात. ही कवितेची ताकद आहे. अशा ताकदीने नारायण कुलकर्णी-कवठेकरांनी आपली कविता उभी केली आहे. त्यांच्या कवितेकडे जाण्याचे धाडस करणारे मराठी साहित्य वर्तुळात आज समीक्षक नाहीत. त्यांची कविता कोणत्याच पारंपरिक साच्यात बसत नाही. ती तडजोडवादी तर नाहीच, शिवाय माणसांच्या प्रश्नांवर बोलता बोलता त्यांना खडबडून जागे करणारी आहे. स्वतःच्या मूलभूत सिद्धांतांना घट्ट पकडून राहणारी त्यांची कविता आहे. त्याचप्रमाणे वर्जेश ईश्वरलाल सोळंकी यांचीही आपल्या शब्दांवर प्रचंड हुकूमत असून त्या बळावर त्यांची कविता एक सक्षम मानवतावादी रुप घेऊन आपल्यासमोर अवतरते.

सतीश काळसेकरांचा कोल्हापूरशी, विशेषतः शिवाजी विद्यापीठाशी ऋणानुबंध होता, त्यातूनच त्यांच्या कुटुंबियांनी विद्यापीठास पुरस्कारासाठी निधी आणि त्यांची ग्रंथसंपदाही विश्वासाने सुपूर्द केली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. कवठेकर म्हणाले, कवितेमधून त्या त्या संस्कृतीची, जीवनाची ओळख होत असते. कवितेच्या माध्यमातून वास्तव सौम्य करीत जाणारा कवी अप्रामाणिक असतो.

श्री. सोळंकी यांनी यावेळी सतीश काळसेकर हे मराठी साहित्यातील अभेद्य व अजातशत्रू भिंत असून त्यांचे आपल्या जीवनात मोठे स्थान असल्याचे सांगितले. या दोन्ही कवींनी काळसेकर पुरस्कार प्रदान केल्याबद्दल विद्यापीठाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आपल्या काही कवितांचे सादरीकरणही केले.

कुलगुरू डॉ. शिर्के आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कविता वाचणे हे चांगलेच आहे, मात्र त्याहूनही कविता कळणे हे खूप महत्त्वाचे आहे. कवीला दिसणारे वास्तव तो शब्दरुपात वाचकांसमोर सादर करतो. मात्र, ती केवळ वाचून वाचकाची भूमिका संपत नाही, तर वाचकानेही सामाजिक दुःख, वेदना मी करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. कवितेला तेव्हा खरे पूर्णत्व लाभते.

यावेळी काळसेकर कुटुंबियही उपस्थित होते. त्यांच्या वतीने आदित्य काळसेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. रणधीर शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, महेश लीला पंडित, डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. औदुंबर सरवदे, डॉ. अवनिश पाटील, डॉ. पंकज पवार आदी उपस्थित होते. सुस्मिता खुटाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment