Wednesday, 11 October 2023

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणारे तेजस्वी व्यक्तीमत्व - ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस

 डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पहिल्या चर्चासत्राचे विद्यापीठामध्ये आयोजन

कोल्हापूर, दि.11 ऑक्टोबर - डॉ.पंजाबराव देशमुख हे गोरगरीब शेतकऱ्यांविषयी तळमळ बाळगणारे कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणारे तेजस्वी व्यक्तीमत्व होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले.

                शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभाग, गांधी अध्यासन केंद्र, कॉ.दत्ता देशमुख अध्यासन आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिविभागामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख : व्यक्ति, विचार आणि कार्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्राच्या उद्धाटन सत्रामध्ये बीजभाषक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गवस बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन होते.  अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीज भाषणामध्ये पुढे बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस म्हणाले, आज, ज्ञानाची साधने वाढून नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. परंतु, आपली माणसे आपणांस अनोळखी झालेली आहेत.आपल्या माणसांची ओळख नसणे आणि आपण ज्ञान व्यवहारात वावरतो असे सांगणे हे उचित नाही.ज्ञान व्यवहारामध्ये प्रचंड काही घडत आहे असे वाटत असले तरी बहुजनांची संख्या कोठेच दिसत नाही. बहुजन समाजातील उत्तमोत्म गोष्टी आजही आधोरेखीत झालेल्या नाहीत. त्यामुळेच, सर्वांगीण चरित्र लिहिण्याचे दुष्काळ पडलेला आहे.  अशा दुष्काळी काळामध्ये या चर्चासत्राचे आयोजन खुप मोठी गोष्ट आहे.सर्व शिक्षण संस्थेमध्ये बहुजनांची मुले शिकली पाहिजेत त्यांच्या घरात शिक्षण गेले पाहिजे असे विचार बाळगणारे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे डॉ.पंजाबराव देशमुख होय.किमान आपण व्यक्ती आकलनाची पध्दती, शास्त्र विकसित करणे आवश्यक आहे.डॉ.देशमुखांनी प्रचंड उंचीचे काम केलेले आहे यांची प्रेरणा काय आहे, हे शोधणे आवश्यक आहे.देशाचे शिक्षण सल्लागार म्हणून कार्य करणारे एक रूपया मानधन घेणारे डॉ.जे.पी.नाईक आणि डॉ.देशमुख यांनी सर्व खेडयापाडयांचे परिवर्तन कसे करावयाचे यासाठी शिक्षणातून ग्रामीण पुनर्रचना आणि ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण याचे फलीत म्हणून रूरल इन्स्टिटयूट अशी कल्पना पुढे आणली. क्रांतीसिंह नाना पाटलांशी असलेली त्यांची मैत्री हे अजब रसायन म्हणावे लागेल.या सगळया प्रयत्नांमध्ये डॉ.देशमुखांचे व्यक्तीमत्व सजग आणि सावधपणे होते.आपल्याला काही तरी करावयाचे आहे म्हणून त्यांनी काही ठिकाणी सहकार्य घेतले पण बाजू योग्य पाहूनच.विचारधारा एक असूनही त्यांनी सावध अंतर ठेवले होते. प्रसंगी त्यांनी स्वजातीयांशी विद्रोह केला.  यामुळे त्यांचा शोध सरळ रेषेत घेता येत नाही.तमाम शेतकऱ्यांची उन्नती हे डॉ.देशमुखांच्या आयुष्याचे ध्येय होते.ते एका विशिष्ट जातीच्या शेतकऱ्यांविषयी कधीच बोलले नाही.ते भारतातील सर्व शेतकऱ्यांविषयी बोलले आणि काम केले.शेतकऱ्यांना मदत करणारे हे सगळे मिळून शेतकरी ही कृषी जननांची व्यवस्था पहिल्यांदा त्यांनी आधोरेखीत केलेली आहे.शेतकऱ्यांना सगळया बाजूने मदत करणारे सगळे बलुतेदार हे शेतकरी आहेत.  यामुळे शेतकरी शब्दाचा अर्थ विस्तृत झाला आणि संपूर्ण ज्ञानाच्या व्यवहारात गुणवत्तेचा आग्रह त्यांनी सातत्याने धरला.संपूर्ण समाजाची तळमळ त्यांना होती.त्यांनी बहुजनांच्या प्रगतीचे राजकारण केले जातीचे राजकारण केले नाही.गोरगरिबांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी कार्य करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा त्यांना मिळत गेली.

याप्रसंगी बोलताना अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख म्हणाले,भाऊसाहेब ऊर्फ डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जडणघडणीमध्ये कोल्हापूरच्या छ.शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून त्यांनी पुढील जीवनामध्ये भरीव कार्य केले.छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि भाऊसाहेब यांच्या त्रिवेणी संगमाच्या रूपात आज शिवाजी विद्यापीठामध्ये देशाचे पहिले कृषी मंत्री, कृषी रत्न, शिक्षण महर्षी, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर 125 व्या जयंती निमित्त पहिल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन म्हणाले, हृदयस्त व्यक्तीमत्व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्य आणि देश पातळीवर विचारांची मैफल सुरू आहे. त्यामध्ये पहिले चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित केले, याचे सर्वांना आनंद आहे. विद्यापीठामध्ये फुले, शाहू, आंबेडकर सप्ताह साजरा केला जातो.  त्यावेळेस, आवर्जुन कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांनी दिलेल्या योगदानाची माहिती येथील विद्यार्थ्यांना दिली जाते. भारताच्या कृषक क्रांतीचे जनक डॉ.देशमुख यांच्या व्यक्ती


आकलनामधील प्रेरणा शोधण्याची गरज आहे आणि हे कार्य या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये होणे आवश्यक आहे.  छ.शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची प्रेरणा त्यांनी घेतलेली दिसते.  कोल्हापूरला वसतीगृहांची जननी म्हटले जाते आणि डॉ.देशमुखांनीही वसतीगृहांवर भर दिलेला आहे.छ.शाहू महाराजांनी या ठिकाणी असलेल्या मंदिरांच्या आणि दर्ग्यांच्या उत्पन्नाचा खर्च शिक्षणावर केलेे होते.  शेतकऱ्यांना शेतीचे अद्यावत ज्ञान व्यवसायाचे महत्व पटावे म्हणून डॉ.देशमुख यांनी 92 दिवसांचे जागतिक कृषी प्रदर्शन दिल्लीमध्ये आयोजित केले होते. सर्वाधिक प्रतिष्ठा मिळवणारे स्वतंत्र भारतातील पहिले भव्य कृषीप्रदर्शन होते.हया प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी आजही कोल्हापूरमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते.डॉ.देशमुखांना जाती-पातीचे अवडंबर पुसून टाकण्याची प्रेरणा छ.शाहू महाराज यांचेकडून मिळालेली आहे.संशोधकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांवरही प्रकाश टाकला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'इंडीपेंडंट लेबर पार्टीचे' डॉ.पंजाबराव देशमुख हे सचिव होते.देशाला आधुनिक विचारांची दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.आजच्या तरूण संशोधकांनी गवस शैलीत व्यक्तीच्या आकलनाची शास्त्रीय पध्दत विकसित केली पाहिजे, असे वाटते.  माणसाचा शोध सरळ रेषेत घेता येत नाही.त्याला वेगवेगळे आयाम असतात ते समजावून घेण्याची आपली पात्रता तयार करावी लागते आणि त्यानंतरच ते आपणांस समजवून घेणे शक्य होते.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रविंद्र भणगे यांनी केले.मान्यवरांचा परिचय राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ.नेहा वाडेकर यांनी केले तर डॉ.सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.यावेळी, अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप हंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक आणि संशोधक मोठया संख्येने उपस्थित होते.

------


No comments:

Post a Comment