कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार
कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: सहकारी संस्था आणि शिवाजी
विद्यापीठ यांच्यादरम्यान सहकार्य वृद्धी करीत असताना केंद्रस्थानी विद्यार्थीच
राहिला पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता लक्षात आणून
देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी सहकारी क्षेत्रात काम करण्यासाठी यावे,
यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज
येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी
असोसिएशन यांच्या दरम्यान आज सकाळी सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने सामंजस्य करार
करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा आणि
परिसरातील सहकारी क्षेत्राचा स्थापनेपासून सौहार्द आहे. विद्यापीठ प्रांगणातील
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सहकारी क्षेत्राच्या सहकार्यातून उभा करण्यात
आला आहे. विद्यापीठाच्या अनेक उपक्रमांना परिसरातील सहकारी संस्थांचे सहकार्य
वेळोवेळी लाभत असते. सामंजस्य करारामुळे शैक्षणिक तसेच बँकिंग क्षेत्रातील
सहकार्याचा मार्ग अधिक विस्तारतो आहे, ही बाब महत्त्वाची आहे. यापुढील काळात
सहकारी क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या
दृष्टीने अभ्यासक्रमात समावेश करता येऊ शकेल. सहकारी क्षेत्रातील संधींबाबत
विद्यार्थी अनभिज्ञ असतात. त्यांना त्याबाबत अवगत करून या क्षेत्रात येण्यास
प्रोत्साहित करता येईल. शिकत असतानाच इंटर्नशीपची संधी देऊन प्रात्यक्षिकीय अनुभव
घेण्याची संधी देता येईल. विशेषतः विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या
माध्यमातून अनेक महिला वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनाही या
इंटर्नशीपमध्ये कसे सामावून घेता येईल, या दृष्टीनेही विचार करण्याची गरज आहे.
संयुक्त प्रकल्प व योजनांवर काम करीत क्षमता संवर्धनावर भर देणेही आवश्यक आहे.
नजीकच्या काळात सांगली व सातारा या विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्ह्यांतील नागरी
बँकिंग संघटनांपर्यंत सुद्धा या सहकार्याचा विस्तार करून त्या विभागातील
विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रात कामाच्या, अनुभवाच्या संधी देण्याच्या दृष्टीने
प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
यावेळी निपुण कोरे म्हणाले, युवकांचा सहकार चळवळीत
सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार खूप
महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंगची माहिती, अनुभव देण्याच्या
दृष्टीने या करारांतर्गत निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. त्यातून या क्षेत्राला
चांगले मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अधिसभा सदस्य संजय परमणे म्हणाले, सहकार क्षेत्रातही करिअरच्या
उत्तम संधी आहेत, हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत
सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्रातील चांगली कामे
मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून त्यांची निर्गत करण्यासाठी एक चांगली
परिसंस्था, वातावरण निर्माण करू या, असे आवाहन केले.
यावेळी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष श्री. कोरे यांनी
तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सामंजस्य करारावर
स्वाक्षरी केल्या. यावेळी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे,
वीरशैव सहकारी बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, बँकिंग तज्ज्ञ शंकरराव
मांगलेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासन व
गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ
यांनी स्वागत केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण
महाजन यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, कुरुंदवाडच्या स्वातंत्र्यसेनानी
श्रीपाल आलासे बँकेचे संचालक अरुण आलासे आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment